04/10/2022
|| खंडे नवमी ||
आयुध पूजन
भारताच्या क्षात्र परंपरेतील सर्वात महत्त्वाचा दिवस! हा दिवस म्हणजे क्षत्रियांनी आपापली शस्त्रे पुजण्याचा पर्व.
याला खंडे नवमी अथवा आयुध नवमी म्हटले जाते. ही प्रथा महाराष्ट्रात प्रामुख्याने "खंडे नवमी" म्हणून प्रचलित आहे. या दिवशी क्षत्रिय समाजातील राजेरजवाडे, लष्करी अधिकारी आणि सैनिक हे आपापल्या शस्त्रास्त्रांची पूजा करतात.
महाराष्ट्रात या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी आपल्याच नव्हे तर भारताच्या इतिहासाला आपल्या शौर्य आणि परक्रमाने कलाटणी दिली.
महाराष्ट्रातील शस्त्र पूजेची परंपरा खंडे नवमीला कशी होती याचा आपण आज मागोवा घेऊया.
शारदीय नवरात्रात महानवमीला म्हणजे विजयादशमीच्या आदल्या दिवशी शस्त्र पूजा करण्याचा प्रघात महाराष्ट्रात प्राचीन काळापासून आहे. यादव साम्राज्याच्या काळातील संदर्भ ही याची साक्ष देतात.
पण, या परंपरेला अधिक महत्त्व प्राप्त झाले ते मराठेशाहीच्या काळात. नऊ दिवस शक्ती देवतेची - कुलदेवतेची उपासना करून नवमीला शस्त्र पूजा करून सांगता केली जाते.
खंडे नवमी हा शब्द 'खंडा' या शस्त्रापसून उपजला आहे. सदर शब्द हा संस्कृत 'खड्ग' याचा प्राकृत अपभ्रंश आहे. देवीने खड्ग आणि त्रिशूळ हाथी धरून महिषासुराचा वध केला, खड्गाने त्याचा शिरच्छेद केला अशी मान्यता आहे.
हा खंडा म्हणजे महाराष्ट्रात पूर्वापार प्रसिद्ध असून नवरात्रात बळी म्हणून पाड्याचा किंवा बकऱ्याचा बळी दिला जात असे. तेव्हा एकाच घावात मान धडा वेगळी करण्यासाठी सर्वात उपयुक्त शस्त्र म्हणजे खंडा. त्यामुळे, मातब्बर घरण्यांमध्ये बळी दिल्यावर तोच खंडा पुजण्याची प्रथा पडली. म्हणून, शारदीय नवमीस महाराष्ट्रात क्षत्रिय - मराठ्यां मध्ये ही तिथी "खंडे नवमी" म्हटले जाऊ लागले.
खंडे नवमीच्या दुसऱ्या दिवशी विजयादशमी अर्थात दसऱ्याला मराठे सीमोल्लंघन करत म्हणजे मोहिमेवर निघत. त्यामुळे, सदर शस्त्र नवरात्रीत दुरुस्त - स्वच्छ करून, खंडे नवमीस पूजन करून, दसऱ्याला सीमोल्लंघन होत असे.
या विषयावर विस्ताराने पुन्हा कधीतरी!
खंडे नवमी आणि विजयादशमीच्या अनंत स्फूर्तिदायक शुभेच्छा!
📸 सारंग मिरजकर, निपाणी