17/04/2021
"आठवणी आणि अश्रू"
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आत्मचरित्र अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात शिकवले जाते मात्र भारतात ते दुर्लक्षिले गेले आहे! बाबासाहेबांचे १९३५-३६ मध्ये लिहिलेले "वेटिंग फॉर ए वीजा" हे इंग्रजी भाषेतील आत्मचरित्र अमेरिका आणि इतर देशात प्रचंड आदराने वाचले जाते. एवढेच नव्हे तर ते कोलंबिया विद्यापीठात शिकविले जाते आणि भारतात मात्र अनेकांना याबद्दल माहितीही नाही, याचे आश्चर्य वाटते! डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक पुस्तके जगभरात आदर्शवत आणि महत्त्वपूर्ण पुस्तके म्हणून प्रसिद्ध असली तरी आजही भारतात ती दुर्लक्षित आहेत. असेच एक पुस्तक म्हणजे 'वेटिंग फॉर व्हिसा', त्यांचे आत्मचरित्र. या पुस्तकाचा मराठी अनुवाद "आठवणी आणि अश्रू" या शीर्षकाने मी केला आहे. औरंगाबाद येथील आंबेडकरी साहित्याचे प्रख्यात प्रकाशक "आनंद प्रकाशन" यांनी ते प्रकाशित करण्याचा संकल्प हाती घेतलेला असून या महिन्यातच हा ग्रंथ प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. हे आत्मचरित्र सहा प्रकरणांचे असून त्यामध्ये बाबासाहेबांनी लहानपणी साताऱ्याहून वडिलांना भेटायला कोरेगावला जाताना प्रवासात गाडीवानाने केलेला अपमान, बडोदा सरकाने शिक्षणासाठी केलेल्या अर्थसाह्याची परतफेड करण्यासाठी स्वीकारलेली नोकरी, तेथे सहकार्यांनी केलेला अपमान, बडोद्यात राहण्यासाठी जागा मिळाली नसल्याने पारशी धर्मशाळेत नाव बदलून राहिल्यानंतर पारशांनी जीवे मारण्याची धमकी देऊन खोली रिकामी करण्यास भाग पाडले. या प्रसंगाने व्यथित होऊन बाबासाहेब बडोद्यात ढसढसा रडले होते. हे प्रसंग आणि इतर घटनांचा त्यामध्ये समावेश आहे. या घटनांचा जेव्हा जेव्हा बाबासाहेब उल्लेख करत असत तेव्हा तेव्हा त्यांना अश्रू आवरता आले नाहीत. म्हणूनच "आठवणी आणि अश्रू" हे शीर्षक सदर ग्रंथास दिलेले असून वाचकांकडून बाबासाहेबांच्या या आठवणींचा नक्कीच आदर होईल अशी अपेक्षा आहे.
- भीमराव सरवदे
या ग्रंथाचे भाषांतरकार