15/06/2026
आज मानवत रोड येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या निरागस हास्याने, पालकांच्या आशावादी नजरेने आणि शिक्षकांच्या प्रेमळ स्वागताने अविस्मरणीय ठरला.
शाळेत प्रवेश करताच प्रत्येक विद्यार्थ्याचे औक्षण करून आणि स्नेहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. आकर्षक सजावट, सुंदर सेल्फी पॉइंट आणि लहानग्यांच्या आवडीची कार्टून पात्रे यांमुळे शाळेचा प्रत्येक कोपरा आनंदाने उजळून निघाला. अनेक चिमुकल्यांनी आज पहिल्यांदाच शाळेच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले आणि त्यांच्या या "पहिल्या पावलाला" प्रेम, आपुलकी आणि विश्वासाची साथ देण्याचा प्रयत्न विद्यालयाने केला.
शिक्षण हे केवळ पुस्तकांपुरते मर्यादित नसून संस्कार, आत्मविश्वास आणि स्वप्नांना नवी दिशा देणारा प्रवास आहे. या भावनेतून विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात प्रामाणिकपणे अभ्यास करून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देण्यात आली.
यावेळी संस्थेचे सचिव तथा मुख्याध्यापक मा. नितीन लोहट सर यांनी विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत, "आजचे हे छोटे पाऊल उद्याच्या उज्ज्वल भविष्याचा मजबूत पाया ठरेल," असा प्रेरणादायी संदेश दिला. तसेच शाळेचे पर्यवेक्षक श्री. सुरेश भिसे सर आणि कॉर्डिनेटर श्री. सिद्धेश्वर जाधव सर यांचीही यावेळी उपस्थिती लाभली.
नवीन स्वप्ने, नवीन संकल्प आणि नव्या आशांनी भरलेला हा शैक्षणिक प्रवास प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात ज्ञान, संस्कार आणि यशाची सुवर्ण पहाट घेऊन येवो, हीच सदिच्छा!
"शाळेचा पहिला दिवस म्हणजे केवळ नव्या वर्गाची सुरुवात नसते; ती असते नव्या स्वप्नांना, नव्या उमेदेला आणि उज्ज्वल भविष्याला दिलेली एक सुंदर सुरुवात."