17/07/2022
भ्रम..
आपण जाणीवपूर्वक काही बदल स्विकारतो तरीही कुठेतरी जे सत्य आहे आणि मनाचा शेवटचा तळ तो आपल्यालाच माहीत हा असतोच. आपण नेहमी स्वतःला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतो, स्वतःला स्वतःपासूनच वाचवण्यासाठी, हो अगदी बरोबर वाचलत. आपल्याला आनंदी आणि दुःखी कोणीच करूच शकत नाही, क्षणिक कोणी येईलही पण त्यावर निर्भर राहणही शेवटी चूकच. आपण कायम स्वतःला भ्रमात ठेवण्याचा, गुंतवण्याचा जसा सतत प्रयत्न करत राहतो. बऱ्याचदा तो यशस्वी होतो तर बऱ्याचदा नाही. सत्यापासून, वास्तवापासून काही काळ तरी अनभिज्ञ राहावे ही अभिलाषा आपण करतच राहतो. मग तो चित्रपट, पुस्तक, एखाद्या व्यक्तीचा सहवास किंवा कसलीही नशा किंवा काहीही असो.. पण अगदी तळाशी आपल्याला माहिती असतं, आपण फक्त वेळ घालवतोय जरी ते क्षण कितीही आनंददायी असले तरी ते कायम नाही हे अगदी ठळक माहित असतं. कदाचित हेच सत्य असतं आणि आपण निरंतर दूर पळू पाहतो, या वास्तवापासून वेगवेगळ्या निमित्तांनी, पण सत्य ते शेवटी पुन्हा तिथेचं आणून सोडते अगदी अलगद आणि सतत.. मग आपसुकच मनाला प्रश्न पडतो जे सत्य आणि निरंतर समाधानपूर्ण असं आहे तरी काय? जे कायम आणि स्थिर आणि ज्या नंतर कुठलाही प्रश्न कुठलही उत्तर नको आणि मग मन हरवत गूढ अशा विचार चक्रात...
कदाचित आयुष्यभर वेगवेगळ्या वाटेला आलेल्या क्षणांना पडताळणं, त्याचा अनुभव घेत पुढे पुढे जात राहणचं जसं काही आपलं जीवन. कधी अस्वस्थ, तर कधी समाधानाने पूर्ण पण कुठल्याही एका अनुभूतीचा कायम असं संलग्न नाहीच. खूप सारे अनुभव, विचार आणि दृष्टीकोन ज्याला कुठलीही सीमा नाही. हो, कदाचित हेच! ते काही असं अनुत्तरीत असावं, जसं प्रत्येक जण आरश्यात बघत असतो मात्र त्याचं जसं अस्तीत्व वेगळं, तसेच आपले विचार आपल आंतरिक स्वरूप ही वेगळं असणार त्यामुळे प्रत्येकाचं त्यासाठीचं समाधान आणि उत्तरही वेगवेगळचं, वेगवेगळ्या संभावणांनी भरलेलं. कदाचित म्हणून तर शेवटी एकमेकांचं आपल्याला कुतूहल, ओढं, आस आणि उमेदही राहते आणि त्यामुळे आपण निरंतर येनाऱ्या प्रत्येक क्षणाबरोबर काहीतरी नवीन शिकतचं राहतो आणि तेच योग्यही वाटतं.