12/08/2026
“संत तुकाराम आणि संत कबीर : विचारविश्वाचा महाग्रंथ”
संपादक डा.श्री नागोराव कुंभार मागील 40 वर्षापासून सातत्याने विचारशलाका हे त्रैमासिक काढतात. या 40 वर्षातील प्रत्येक अंकात दर्जेदार लेख ते देत असतात. वैचारिकतेस वाहिलेले हे त्रैमासिक संविधानातील उद्देशिकेत उल्लेख केलेल्या मूल्यांशी बांधिलकी पत्करून प्रत्येक अंक निघत असतो.
एप्रिल 26 ते मार्च 27 या एका वर्षासाठीचा एकच अंक जोड अंक म्हणून त्यांनी काढलेला आहे.अंक 156, 157, 158 व 159 साठी या चार अंकाचा एक अंक संत तुकाराम व संत कबीर विचारविश्व विशेषांक म्हणून प्रसिद्ध झालेला आहे.664 पानाचा हा अंक एक अंक नसून एक ग्रंथच आहे असे म्हणावे लागेल. या अंकाचे अतिथी संपादक म्हणून डॉक्टर रणजीत जाधव यांनी काम केलेले आहे.डा. रणजीत जाधव बाभळगांव जिल्हा लातूर येथे हिंदीचे प्राध्यापक असून ते कबीराचे अभ्यासक आहेत. मागील कित्येक वर्षापासून लातूर येथे कबीर प्रतिष्ठान स्थापन त्यातून वेगवेगळे सांस्कृतिक व साहित्यिक कार्यक्रम ते करीत असतात .
हा अंक एकूण चार विभागात विभागलेला आहे. पहिला विभाग संत तुकाराम यांच्या विचारविश्वास ,दूसरा विभाग संत कबीरांच्या विचारविश्वास तर तिसरा विभाग सहकार चळवळीचे अध्वर्यय सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या कार्याशी निगडीत व शेवटचा चौथा विभाग दोन पुस्तकाच्या परीक्षणाशी संबंधित आहे. पहिल्या विभागात 22 लेख ,दुसऱ्या विभागात 25 लेख व तिसऱ्या विभागात चार लेख आणि चौथ्या विभागात दोन असे एकूण 51 लेख यात आहेत.
पहिला विभाग हा जरी तुकारामाच्या विचारविश्वाशी संबंधित असला तरी या वर्गातील पहिले पाच लेख तुकाराम व कबीराच्या तौलनिक अभ्यासाशी संबंधित आहेत. यात पहिला लेख स्मृतीशेष डॉक्टर जे.एम.वाघमारे यांचा आहे जीवनाच्या अखेरच्या वळणावर त्यांनी हा 48 पानी लेख स्वहस्ते वयाच्या 90 व्या वर्षी लिहिलेला आहे. या लेखनानंतर थोड्याच दिवसात ते कालवश झाले. या लेखासाठी डॉक्टर वाघमारे यांनी या विषयाशी संबंधित हिंदी मराठी व इंग्रजीतील 14 पुस्तकांचा अभ्यास करून त्यांच्या संदर्भासहीत हा लेख लिहिलेला आहे. या पिढीने यातून आदर्श घ्यायला हवे. 90 व्या वर्षी ज्या जिद्दीने आणि ज्या निष्ठेने ते लेखन करतात ते केवळ अनुकरणीयच नाही तर नव्या पिढीला प्रेरणा देणारे देखील आहे. या दोन्ही संतांच्या विचार विश्वातील साम्य स्थळाचा शोध त्यांनी घेतलेला आहे. लेख खूपच दर्जेदार झालेला आहे.काहीं ठिकाणी भाषा काव्यमय झालेली आहे. या ग्रंथाची जी वैशिष्ट्ये आहेत,त्यात या लेखाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. या दोन संतांच्या वर जे 47 लेख आहेत त्यात केवळ आणि केवळ मराठीतील एक ज्येष्ठ श्रेष्ठ कवी श्री यशवंत मनोहर यांचा लेख अपवादात्मक पण अत्यंत महत्त्वाचा आहे. या लेखात त्यांनी या दोन्ही संतांच्या विचार विश्वाच्या मर्यादा रोखठोक शब्दात मांडलेल्या आहेत. महात्मा गौतम बुद्धाच्या विचाराच्या अनुषंगाने त्यांनी या दोन्ही संतांच्या विचाराचा शोध घेतलेला आहे. या लेखात यशवंत मनोहर हे स्पष्ट करतात की हे दोन्ही संत विद्रोही जरूर आहेत पण क्रांतिकारी नाही. विशेषत: या दोघांच्या स्त्रीविषयक विचाराच्या मर्यादा त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत. पण त्याचवेळी त्यांचे वैचारिक मोठेपण देखील त्यांनी अधो रेखित केलेले आहे. डॉक्टर पी विठ्ठल यांनी या दोन्ही संतांच्या जीवनकार्याचा व मूल्य विचारांचा मागोवा विस्ताराने घेतलेला आहे. कबीर व तुकाराम संबंधी जी निरीक्षणे त्यांनी नोंदवलेली आहेत की खूप महत्त्वाची आहेत. डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी या दोन संतांचे मूल्यविचार केंद्रस्थानी ठेवून विवेचन केलेले आहे. लेखाच्या शेवटी ते लिहितात "धर्म हे सत्तेचे साधन नसून मानव समाजाची विधायक घडण करण्याचे साधन आहे, याचे भान मध्ययुगीन संताने आपणास देऊन जागे ठेवले"( पृष्ठ 89) खरोखरच आपण जागे आहोत का हा आपल्या आजच्या घडीचा प्रश्न !
निशिकांत ठकार यानी दोन संतांना अभंग अक्षराचे साधक मानले आहे .त्यांच्या या लेखात अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील संत शेख मोहम्मद यांचा उल्लेख आलेला आहे. हे तुकारामाचे समकालीन संत. विठ्ठल भक्त. मराठी माणूस यांना कबीराचा अवतार मानतो.कबीर आणि संत शेख मोहम्मद व कबीर यांच्या जीवनात आणि वैचारिक विश्वात बरेचसे साम्य आढळून येते.
सहा ते 22 या 16 लेखांचा संबंध केवळ तुकारामच्या विचार विश्वाशी, काव्याशी संबंधित आहे. त्यात पहिला लेख डॉक्टर अशोक नारनवरे यांचा आहे. या संपूर्ण अंकातील सर्वात प्रदीर्घ असा हा 80 पानाचा लेख आहे. लेखक अशोक नारनवरे यांनी "तुकाराम साठोत्तरी अभ्यासकांच्या भूमिकेची समीक्षा" या मथळ्याखाली तुकारामावर श्री भालचंद्र नेमाडे ,दिलीप पुरुषोत्तम चित्रे, सदानंद मोरे व आ.ह. साळुंखे यांनी लिहीलेल्या तुकाराम ग्रंथाचे सार लेखन केलेले आहे.या चौघांनी तुकारामाच्या कार्यकर्तृत्वाचा, काव्याचा व भाषेचा जो परामर्श घेतलेला आहे त्याचा सारांश अशोक नारनवरे यांनी दिलेले आहे.लेखाच्या मथळ्यात त्यांनी जो शब्द वापरलेला आहे; या अभ्यासकांच्या भूमिकांची समीक्षा , त्या समीक्षेचा अभाव मात्र त्यांच्या या लेखात आढळून येतो. चार पुस्तकाचे सार लेखन एवढेच या लेखाचे स्वरूप आहे.
तुकारामाच्या मूल्य सृष्टीवर या ग्रंथात एकूण चार लेख आहेत. त्यापैकी रणधीर शिंदे यांचा देख महत्त्वाचा आणि विषयाला न्याय देणार आहे .तुकारामाच्या पसायदानावर स्मृतीशेष डॉक्टर अशोक प्रभाकर कामत यांचा लेख उल्लेखनीय आहे. तुकारामाचे समाज प्रबोधन हा डॉक्टर यू.म.पठाण यांचा छोटेखानी लेख तुकाराम महाराजाच्या प्रबोधनावर प्रकाश टाकतो. खेडकर रोहिदास कुंडलिक यांचा वीस पानाचा लेख माहितीपरक आहे .वर्णनात्मक आहे. विवेचनात्मक नाही. हीच अवस्था डॉक्टर बाबासाहेब निगळ ,श्वेता रमेश गायकवाड ,दिनेश संतोष हालोर यांच्या लेखाची आहे. हरिभक्त परायण उल्हास पाटील यांचा 32 पानी लेख हा कीर्तनकाराच्या शैलीतील आहे. या लेखाचे वैशिष्ट्य हे की केसरी पाटील हे आजच्या संदर्भात तुकारामाकडे पहातात.व आज ही ते कसे प्रासंगिक कसे आहेत हे दाखवून देतात. दत्तात्रय प्र डोंगरे यांचा सर्वात छोटा लेख हा सत्य या मूल्या संबंधी तुकोबाची धारणा स्पष्ट करतो.प्राध्यापक रेखा शेरकर व डॉक्टर अमन वामन बगाडे यांचा लेख संत तुकारामाच्या अभंगातील सामाजिक प्रथा व परंपरेची सद्यकालीन प्रस्तुतता हा आहे.हा लेख शोधपरक व आजच्या संदर्भात महत्त्वाचा असा आहे .संत तुकाराम आणि अंधश्रद्धा (एडवोकेट शंकर निगम) ,संत तुकारामचे पर्यावरण व निसर्ग विचार, (डॉक्टर शिंदे )संत तुकारामाच्या अभंगातील शेती आणि शेतकरी जीवनाचे चित्र हे तिन्ही लेख तुकारामाच्या विचार विश्वाचा शोध वेगवेगळ्या पैलूतून घेतात. तिन्ही लेख अभ्यासपूर्ण व नवीन माहिती देणारे आहेत. नीलिमा करणे यांचा लेख तुकारामाच्या काव्यातील विद्रोहाची संबंधित आहे तर अजित न आचार यांचा लेख तुकोबाच्या समाज प्रबोधनाची संबंधित आहेत. या पहिल्या भागातील शेवटचा लेख प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव मोहिते यांचा संत तुकारामाचे अभंग काळाची गरज या मथळ्या अंतर्गत आहे.
येथे पहिल्या खंडातील या 22 लेखाचा परा घेताना एक बाब लक्षणीयरित्या समोर येतेकी सतरावा शतकातील तुकारामाच्या विचारविश्वापासून महाराष्ट्र खूपच दूर गेलेला आहे .जर तुकारामच्या विचार विश्वाच्या पुढे महाराष्ट्र गेला असता तर ते तुकारामाचे यश समजण्यात आले असते .पण तसे झालेले नाही तर तुकारामानी ज्या अंधश्रद्धेवर कर्मकांडावर जबरदस्त प्रहार केलेला होता तो विवेक महाराष्ट्र हरून बसलेला आहे. हे सर्व लेख या राज्यातील संवेदनशील मनाला आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त करतात हेच या लेखाचे वैशिष्ट्य व संपादक नागोराव कुंभार व डॉक्टर रणजीत जाधवाना देखील हीच अपेक्षा असावी की वाचकांनी स्वतः निश्चित करावे की आपण सर्वजण तुकारामाच्यक विचार विश्वापासून किती दूर निघून आलोय. जर त्यांच्या विचाराचा विस्तार आपण केला असता तर,ते ज्या मूल्यांचा आग्रही धरीत होते त्या मूल्यानुसार येथील सामाजिक राजकीय जीवन प्रवासास निघाले असते तर तुकाराम अप्रासंगिक झाले असते .पण तुकाराम आजही प्रासंगिक आहेत हे तुकारामाच्या विचार विश्वाचे मोठेपण की आपले करंटेपण! त्यांचे उत्तराधिकारी म्हणून आपण नालायक ठरलोत काय यावर विचार करण्यास प्रवृत्त करणारे हे सर्व लेख आहेत.
अंकाच्या दुसऱ्या विभागात कबीरासंबंधी एकूण 25 लेख आहेत. या पंचवीस लेखा पैकी तीन लेख गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर आणि टागोर यांच्या वैचारिकतेशी संबंधित आहेत. या तीन महामानवाच्या विचारविश्वाची तुलना कबीराच्या विचारविश्वाशी करण्यासंबंधीचे आहेत. एक लेख भक्ती साहित्याच्या संदर्भात आहे .राहिलेले 21 लेख कबीराच्या काव्यसंबंधी आहेत. त्यातही नऊ लेख हिंदी पट्टीतील समीक्षकांची अनुवाद करून दिलेली आहेत. एक लेख इंग्रज अभ्यासकाचा आहे. 11 लेख मराठी अभ्यासकांचे आहेत.
यात पहिला लेख या अंकाचे संपादक डॉक्टर रणजीत जाधव यांचा आहे.डॉक्ट रणजित जाधव कबीर साहित्याशी बांधिलकी पत्करून वेगवेगळ्या पैलूतून त्यांच्या काव्याचा अभ्यास ते करीत आहेत. मागील वीस वर्षापासून ते कबीर प्रतिष्ठान नावाची संस्था चालवतात. त्यांनी आपल्या लेखात कबीराचा विस्ताराने परिचय करून दिलेला आहे. वसाहतीच्या काळातील कबीराचे अभ्यासक डेव्हिड लारेंजनी त्याकाळी कबीरा संबंधीच्या दंतकथांचा अभ्यास सादर केलेला होता, त्या अभ्यासाचा सारांश येथे देण्यात आलेले आहे.श्री शंभुनाथ हिंदीचे जेष्ठ अभ्यासक व समीक्षक आहेत. वागर्थ या मासिक पत्रिकेचे ते संपादक आहेत. त्यांचा "भक्ती साहित्याच्या संदर्भात"ला लेख खूपच अभ्यासपूर्ण व विचाराला नवीन दिशा देणारा आहे. मराठीच्या अभ्यासकानी देखील या लेखाचा अभ्यास करायला पाहिजे. कबीर काव्याच्या अभ्यासासाठी पृष्ठभूमी म्हणून या लेखाचे खूपच महत्त्व आहे. त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेले आहे की कबीराचा हा काळ धर्मनिरपेक्षतेचा व उदारमतवादाचा होता. पण तुळशीदासाच्य काव्यात उदारमत कमकुवत झाला होता. (पान 367) लेखाच्या शेवटी त्यांनी काही प्रश्न उभे केलेले आहेत.भक्ती पुन्हा एकदा धार्मिक ढोंगीपणा आणि कर्मकांडात का रूपांतरित झाली? धर्मांधता पुन्हा का उदयास येत आहे?आणि हिंदी समाजातच एक नवीन जाणीव का उलटली आहे? आजच्या पिढीसमोर हे प्रश्न आवाहन म्हणून उभे आहेत.
राज किशोर हे हिंदीतील सामाजिक प्रश्नावर लिहिणारे लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा लेख आहे "कबीराची विलक्षणता" ते लिहितात " कबीर हे मुळात धार्मिक होते त्या अर्थाने नव्हे जो अर्थ गांधीना अभिप्रेत होता. गांधीसाठी धर्म हा सामाजिक कृतीचा पर्याय होता तर कबीरासाठी धर्म वैयक्तिक आचरणाची पद्धत होती." (पान 373) मंजुरानी सिंह यांनी कबीराच्या जीवन केलेला सम्यक जीवनाची काला म्हटले आहे. सुभाषचंद्र भेळके यांनी संत कबीराची ओळख जीवनाचे भाष्यकार म्हणून करून दिलेली आहे.
कबीरासंबंधीच्या या सर्व लेखात 31 क्रमांकाचा लेख नांदेड येथील हिंदीच्या सेवानिवृत्त प्राध्यापिका डॉ. रमा नवले यांचा आहे. हा लेख खूपच दर्जेदार आणि विचारांना चालना देणार आहे .त्याही कबीराच्या कवितेचा केंद्रबिंदू प्रेम आहे असे म्हणतात. कबीराच्या या प्रेमाचा संबंध काम भावना ,रामभावना आणि समाज भावना यांच्याशी आहे हे ते पुराव्यासहित सिद्ध करतात. (पान 435 )
हिंदीतील प्रख्यात समीक्षक डॉक्टर नामवरसिंह आपल्या लेखात कबीराचे दुःख मांडतात.ते लिहितात "नैराश्यग्रस्त कबीराचे हे दुःख अत्यंत स्फोटक आणि विध्वंसक आहे."(पान 445) पण याचा विस्तार मात्र ते करीत नाहीत.श्री दिनेश्वर प्रसाद यांनी कबीराच्या सामाजिक दृष्टीच्या शोध घेतलेला आहे. ममता जी सागर या विदुषीचा लेख "कबीरांच्या नजरेत स्त्रियांची जागा"महत्वाचा व वास्तवदर्शी आहे.स्रियांच्या प्रश्नाबद्दल कबीर आपल्या काळाच्या पुढे जाऊ शकले नाहीत.स्त्रियांच्या बद्दलचे त्यांचे विचार त्यांनी पान 471 वर संक्षेपाने दिलेले आहेत. कबीर हे पुरुषसत्ताक व्यवस्थेने घालून दिलेल्या मर्यादेच्या बाहेर जाऊन स्त्रियावर विचार करीत नाहीत ही त्यांची व्यथा. सदानंद साईच्या मतानुसार "कबीराचे साहित्य आणि कबीरदाचा संघर्ष हा माणसाला माणसाची उंची प्रदान करण्याचा निरंतर प्रयत्न आहे"( पान 480 )
श्री पुरुषोत्तम अग्रवाल हे पहिले समीक्षक आहेत ज्यांनी कबीरास कवी रुपात प्रतिष्ठित केलेले आहे. याच विषयावरचा त्यांचा एक लेख येथे आहे. प्रसिद्ध हिंदी कवी अरुण कमल यांचा लेख "कबीराच्या मस्तकावरील मोरपंख" कबीराच्या एका वेगळ्या पैलू वर प्रकाश टाकतो. महाराष्ट्राच्या संदर्भात कबीरावरचा अत्यंत महत्त्वाचा लेख हरिभक्त परायण ज्ञानेश्वर बंकर यांचा आहे. मथळा आहे "कबीर आणि महाराष्ट्राचा अनुबंध". सुरुवातीलाच त्यांनी हे नोंदवले आहे की वारकरी परंपरेत जे संत पंचक मानले जातात त्यात कबीराचा समावेश आहे. नामदेव, ज्ञानदेव, कबीर, एकनाथ आणि तुकाराम हे ते पाच प्रमुख संत. महाराष्ट्र आणि पंजाब हे दोनच प्रांत असे आहेत की तेथील भक्तिपरंपरेत कबीरांना महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. शिखांच्या गुरु ग्रंथ साहिबात कबीर वाणी समाविष्ट आहे .त्यांचे आणखीन एक विधान आहे;" सत्यशोधक समाजाची स्थापना कबीराच्या प्रेरणेतून झालेली आहे "(पान 519 )ग्रंथात एकच लेख हिंदी भाषेतील आहे. डॉक्टर संजय चोपडे यांचा "कबीर साहित्य मी चित्रित मानवतावाद".हा लेख एका सामान्य विद्यार्थ्यांचा लेख वाटतो. हिंदीतील दुसरे ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर मॅनेजर पांडे यांचा लेख "कबीर आणि आजचा काळ" यात ते कबीर काव्याची प्रासंगिकता अधोरेखित करतात. त्यांनी कबीराच्या दोन वैशिष्ट्या कडे लक्ष वेधतात. एक टीकात्मक जाणीव आणि दोन प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती. कबीराच्या भाषेची वैशिष्ट्ये देखील त्यांनी रेखांकित केलेली आहेत .(पान 549 ) प्रकाश पवार यांनी कबीर आणि गौतम बुद्धाच्या विचारांची तुलना केलेली आहे तर राहुल बावगे यांनी बसवेश्वर आणि कबीर यांची तुलना करताना या दोघांना भारतीय स्वदेशी आधुनिकतेचे शिल्पकार म्हटले आहे.तर इंन्द्रजीत भालेरावानी रवींद्रनाथ टागोर यांचे कबीरावरचे विचार सादर केलेले आहेत.
शेवटचा 19 पानाचा लेख हिंदीतील प्रगतीशील विचाराचे आक्रमक शैली साठी प्रसिद्ध असलेले श्री वीर भारत तलवार यांचा आहे ."कबीरावरील वर्चस्वासाठीचा संघर्ष "या मथळ्याखाली असलेला हा लेख हिंदी तील दलित समीक्षा ही कशी कबीरावर आपले वर्चस स्थापन करण्याच्या प्रयत्न करीत आहे हे पुराव्यासहित मांडतात.एका अर्थाने त्यांनी कबीरावर दलित समीक्षकांनी केलेल्या समीक्षेची ते चिरफाड करतात आणि समीक्षेत जातीयता कशी येत आहे याचा अप्रत्यक्षपणे संकेत देतात.
47 वा लेख समाजशास्त्री संशोधन आणि सामाजिक न्याय या डॉक्टर दहिफळे यांचा लेख आहे.हा लेख या अंकात का म्हणून देण्यात आलेला आहे,हे कळत नाही. कारण हा लेख अंकाच्या मूळ विषयाशी संबंधित नाही. अगदी त्याचप्रमाणे भाग चार मधील दोन ग्रंथांच्या परीक्षणासंबंधी बोलावे लागेल.
भाग तीनचा संबंध सहकार चळवळीचे अध्वर्यु सहकार महर्षी माननीय दिलीपराव देशमुख यांच्याशी संबंधित आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर व कर्तृत्वावर डॉक्टर रणजीत जाधव, विद्याधर कांदे पाटील ,गोविंद घाट, डॉक्टर विवेक विष्णुदास जाधव यांचे लेख आहेत. श्री दिलीपराव देशमुख यांचे सरकार चळवळीतील काम इतके मोठे आहे की ते चार लेखात मावणारे नाही एका अर्थाने त्यांच्या कर्तुत्वावर येथे अन्याय झालेला आहे.
ज्या हिंदी विद्वानांचे लेख मराठीत अनुवाद करून देण्या आलेले आहेत त्यापैकी एक दोन लेखाचा अपवाद सोडला (माया सगरे)तर बाकीचे अनुवाद कृत्रिम वाटतात. अनुवादांत सहजता नाही. आकलनात अडचणी निर्माण होतात. केवळ शब्दांनुवाद करण्यात आलेला आहे. आशयाचा अनुवाद नाही.
तुकारामावर ज्या प्रकारे दर्जेदार असे लेख आहेत तसे दर्जेदार लेख कबीरावर आढळून येत नाहीत. याच्या मूळांत हिंदी प्रदेशाची मानसिकता आहे. यासंबंधीचे त्रोटक विवेचन मी माझ्या लेखात "कबीराचे हिंदी अभ्यासक "(पान 501- 505 )मध्ये केलेले आहे. वारकरी संप्रदायाने ,सिख धर्माने ज्याप्रकारे कबीरला स्वीकारलेले आहे त्याप्रकारे हिंदी पट्टीतील जन मानसाने कबीरास स्वीकारलेले नाही. कबिराकडे ते शूद्र दलित म्हणूनच पाहतात. कबीराची जात हे तेथील बहुजन समाजात सवर्णानी पक्के रोवलेले आहे. कारण तुलसीदास हे सवर्ण आहेत ,मूर्तीपूजक आहेत, कर्मकांडी आहेत ,पुरूषसत्ताक व्यवस्थेचे समर्थक आहेत. याचाच परिणाम असा झाला की संपूर्ण हिंदी पट्टी हिंदुत्वाच्या अधिन गेली.
कबीराचा उपेक्षेच्या मुळात रामचंद्र शुक्ल यांनी लिहिलेला हिंदी साहित्य का इतिहास हा ग्रंथ आहे. यात त्यांनी भक्ती काळातील कवींचे वर्गीकरण वर्ण व धर्माच्या आधारावर केले व ते पिढ्यान पिढ्यात रुजत गेले म्हणजे जेवढे सवर्ण कवी आहेत त्यांना सगुण कवी, जेवढे उपेक्षित आणि दलित समाजाचे कवी आहेत त्यांना निर्गुण कवी आणि जे मुस्लिम कवी आहेत त्यांना प्रेममार्गी कवी असे अत्यंत अशास्त्रीय वर्गीकरण त्यांनी केलेले आहे. या वर्गीकरणाचा परिणाम असा झाला येणार्या पिढ्यांच्या मनात हे बसले की निर्गुण कविता म्हणजे अस्पृश्यांची, दलितांची कविता आणि तेथून त्यांची घोर उपेक्षा सुरू झाली. हिंदी पट्टीने जर कबीरांच्या विचार विश्वाला स्वीकारला असता तर आज या देशाचे चित्र वेगळे झाले असते. पण तुलसीदास हेच तेथील प्रमुख कवी आणि तेथील अभ्यासकांनी, समीक्षकांनी, बहुजनानी तुळशीदास यांच्या रामचरित मानस या महाकाव्यास प्रमाण मानले, यांनाच श्रेष्ठ कवी आणि रामाचे पूजक म्हणून स्वीकारलेले आहे .कबीर तेथे फक्त मूठभर दलित समाजाचे कवी म्हणून प्रतिष्ठित आहेत. तेथील बहुजनाने कबीराला स्वीकारलेले नाही. सवर्णानी तर नाहीच,नाही आणि त्यामुळे कबीर हे आपल्या जन्मभूमीतच उपेक्षित राहिले आणि आजही उपेक्षित आहेत. पण गंमत म्हणजे पंजाब आणि महाराष्ट्राने त्यांना खूप आदराने स्वीकारलेले आहे.
आता तर हिंदी पट्टीतील संपूर्ण राजकारण राम आणि तुलसीभोवती केंद्रीत झालेले आहे.त्यामुळे कबीरचा उल्लेख अधुन मधून कधीतरी केला जाईल एवढेच. तेथील बहुजन, समाजवादी आणि दलित पक्षाने देखील कबीराला ज्या प्रमाणात स्वीकारायला पाहिजे त्या प्रमाणात स्वीकारलेले नाही ही वस्तुस्थिती आहे.
एक वाचक म्हणून माझी अशी तक्रार आहे की हा अंक आणि मागचा बसवेश्वराचा अंक हा आकारांनी खूपच मोठा झालेला आहे .600 ते 700 पानी. अंक हातात घेऊन वाचणे जवळपास अवघड अशक्य. जर याचे दोन अंक केले असते, तुकारामाचा वेगळा आणि कबीराचा वेगळा तर वाचकांसाठी ते खूपच उत्तम झाले असते. पण इतक्या मोठा आकाराचा मोठा अंक वाचकांना देऊन वाचकांची खूपच अडचण नागोराव कुंभारानी करून ठेवलेली आहे. कारण हा अंक हातात धरून वाचणे अवघड .दहा ते पंधरा मिनिटात त्याला खाली ठेवावे लागते. माझी एकच विनंती आहे की यापुढे विचारशलाकाचा अंक साकार करण्यापूर्वी नागोराव कुंभारानी महाराष्ट्रातील तरुण ,प्रौढ आणि वृद्धांच्या मनगटीचा ताकतीचा अंदाज घ्यावा.
या अंकाचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत निर्दोष अशी छपाई. मुद्रित शोधन ज्यांनी केलेले त्यांचे खूप आभार मानावे लागेल.
इतका दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण अंक काढल्याबद्दल पुन्हा एकदा नागोराव कुंभार व डॉक्टर रणजीत जाधव यांचे आभार व मुद्रकांचे देखील आभार .धन्यवाद
विचारशलाका:संत तुकाराम व संत कबीर
विचार विश्व विशेषांक
संपादक:डा.नागोराव कुंभार
या अंकाचे अतिथी संपादक:डा रणजित जाधव
प्रकाशक:डा नागोराव कुंभार ,शिवनगर, लातूर
पृष्ठे 664 मूल्य, ₹600/
संपर्क, डा.नागोराव कुंभार 9422949966
संपर्क, डा रणजित जाधव 9421374116
परीक्षण : सूर्यनारायण रणसुभे,लातूर
8378080660