17/09/2023
वसंतविहार प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल,लातूर या शाळेमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जल्लोषात साजरा.
लातूर - इंग्रजांच्या तावडीतून 1947 साली भारत देश स्वतंत्र झाल्यानंतरही निजामाची हैदराबाद संस्थानाची जुलमी राजवट सुरूच होती.या जुलमी राजवटीचा परिणाम म्हणजे निजामाला एक तरी पाकिस्तान मध्ये सामील व्हायचे होते,नाहीतर स्वतंत्र राहायचे होते,परंतु कोणत्याही परिस्थितीत निजामाला हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतामध्ये सामील करून घ्यायचे नव्हते.त्यामुळेच रजाकरांसारखी अत्याचारी सशस्त्र संघटना उभी करून जनतेवर मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरू करण्यात आले. याच्या विरोधात स्वामी रामानंद तीर्थ,गोविंदभाई श्रॉफ आणि असंख्य ज्ञात - अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी निजाम आणि रजाकाराविरुद्ध सशस्त्र बंड उभा केले,निजामा विरुद्ध लढा दिला.त्यांना संपूर्ण हैदराबाद संस्थान भारत सरकारमध्ये विलीन करावयाचे होते.पुढे भारताचे तत्कालीन गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाविरुद्ध "पोलीस ॲक्शन" घेऊन सशस्त्र हल्ला चढवला,याचा परिणाम निजाम भारत सरकारला शरण आला आणि 17 सप्टेंबर रोजी निजामाने हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन केले.आणि आपला मराठवाडा खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला.याच ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानानंतर लाभलेला आजचा सुवर्णक्षण, मराठवाड्यातील विशेषतः लातूर मधील जनतेचा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन म्हणजेच " मराठवाडा मुक्ती संग्राम दिन " या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त माताजी नगर - सुजाणगीर नगर येथील " वसंत विहार प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल" मध्ये झेंडावंदन करून तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी लढलेल्या स्वातंत्र्यवीरासाठी मानवंदना देऊन मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. यावेळी श्री.मोटेगावकर,प्रभागातील ज्येष्ठ नागरिक कुलकर्णी काका,श्री.जाधव,श्री.रवींद्र जगदाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी वसंतबापू गीर,शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी गीर,सहशिक्षिका, विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका अश्विनी गीर यांनी केले तर विद्यार्थ्यांना मुक्ती संग्रामाचे विशेषत्व माहिती श्री रवींद्र जगदाळे यांनी दिली.