समर्थ विद्यामंदिर / विद्यालय

  • Home
  • India
  • Kolhapur
  • समर्थ विद्यामंदिर / विद्यालय

समर्थ विद्यामंदिर / विद्यालय Inclusive coed primary and secondary schools run by Helpers Of The Handicapped, Kolhapur

‘समर्थ विद्यामंदिर’च्या विद्यार्थ्यांची Independence Day Carnival मध्ये द्वितीय क्रमांकाची दमदार कामगिरीउंचगाव : LOKMAT ...
17/08/2026

‘समर्थ विद्यामंदिर’च्या विद्यार्थ्यांची Independence Day Carnival मध्ये द्वितीय क्रमांकाची दमदार कामगिरी

उंचगाव : LOKMAT CAMPUS CLUB प्रस्तुत ‘INDEPENDENCE DAY CARNIVAL 2026’ या जिल्हास्तरीय स्पर्धेत इयत्ता पाचवी ते आठवीच्या गटात हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड, कोल्हापूर द्वारा संचलित समर्थ विद्यामंदिरच्या पाचवीतील विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. दि. 16 ऑगस्ट 2026 रोजी डी. वाय. पाटील सिटी मॉल, जुना पुणे-बंगळूर महामार्ग, कोल्हापूर येथे ही स्पर्धा उत्साहात पार पडली.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराने परीक्षकांसह उपस्थित प्रेक्षकांचीही मनापासून दाद मिळवली. विशेषतः विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, सादरीकरणातील एकसंधता आणि सर्व विद्यार्थ्यांनी एकसारखे केलेले सादरीकरण परीक्षकांना विशेष भावले. परीक्षकांनी चि. मंथन माने आणि कु. महेश्वरी भोपळे यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले.
राष्ट्रपती पदक विजेते सागर बगाडे सर यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे पालकांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण ओळखून त्यांना योग्य संधी देण्याबरोबरच सातत्याने सराव करून घेणाऱ्या उपक्रमशील शिक्षिका सौ. मोनिका गिरीगोसावी यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सादरीकरण करत हे यश संपादन केले. याबद्दल पालकांनीही त्यांचे विशेष कौतुक केले.

या यशामागे पालकांचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे ठरले. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या ठिकाणी ने-आण करण्याची जबाबदारी पालकांनी उत्स्फूर्तपणे स्वीकारली. पालकांनी दिलेल्या या सहकार्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

दरम्यान, लहान गटाच्या वेशभूषा स्पर्धेत इयत्ता पहिलीतील चि. इंद्रवर्धन अमित वायदंडे आणि चि. शिवांश राहुल रणदिवे यांनी सहभाग नोंदविला. त्यांच्या उल्लेखनीय सहभागाबद्दल त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या वतीने विजेत्या विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक सौ. मोनिका गिरीगोसावी यांचे अभिनंदन करण्यात आले. संस्थेच्या वतीनेही विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षिकेचे तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळालेली ही दाद त्यांच्या आत्मविश्वासाला नवी उभारी देणारी ठरली आहे.

@अंजना लगस - ग्रंथपाल

तिरंगा आमचा अभिमान आहे,भारतभूमी आमची शान आहे;स्वातंत्र्यवीरांच्या त्यागामुळे,आज भारत महान आहे.‘समर्थ’ मध्ये स्वातंत्र्य ...
15/08/2026

तिरंगा आमचा अभिमान आहे,
भारतभूमी आमची शान आहे;
स्वातंत्र्यवीरांच्या त्यागामुळे,
आज भारत महान आहे.

‘समर्थ’ मध्ये स्वातंत्र्य दिन दिमाखात संपन्न!
15 ऑगस्ट हा दिवस भारतात स्वातंत्र्य दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड कोल्हापूर द्वारा संचलित समर्थ विद्यामंदिर आणि विद्यालय उंचगाव पूर्व च्या प्रांगणात 80 वा स्वातंत्र्यदिन अतिशय उत्साहाने साजरा झाला.
आजच्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी कोल्हापुरातील पूर्वा हॉस्पिटलचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. ऋषिकेश अभ्यंकर सन्माननीय पाहुणे म्हणून लाभले. मान्यवरांचे स्वागत इयत्ता 1ली तील चि. इंद्रवर्धन वायकडे केले व 10 वी तील कु. अंकिता कुंभार हिच्या हस्ते सौ. अभ्यंकर यांचे स्वागत केले. मान्यवरांचा परिचय मुख्याध्यापिका सौ. स्वाती उपाध्ये यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती सिरीन मुल्ला यांनी केले. यावेळी मुलांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी मधून अस्खलित भाषणे सादर केली. विशेष म्हणजे समर्थ शाळेची मिसाईल धिटुकली, शब्दांची आतशबाजी करणारी इयत्ता तिसरीतील कु. सिद्धी मोरे हिच्या “मोबाईलच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर भाष्य केले. या भाषणाने मान्यवरांची मने जिंकली. यानंतर देशभक्तीपर गीतांच्या तालावर इयत्ता बालवाडी ते चौथी तील विद्यार्थ्यांनी संगीत कवायत व सहावीतील विद्यार्थ्यांनी डम्ब्ल्सचे विविध प्रकार सादर केले. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी ‘एकता–समानता’ या विषयावर समूहगीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. हार्मोनियम साथ शारवी वसावे, ट्रँगल साथ सर्वेश भोपळे, ढोल साथ जान्हवी देवार्डे तर ड्रमची साथ माईनकर सर यांनी दिली.
मागील वर्षी एम.टी.एस.ई. स्पर्धेमध्ये अधिक गुण प्राप्त केलेल्या विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. स्पर्धा परीक्षेत गुणवंत ठरलेल्या वरद माळी व यश विचारे यांना मार्गदर्शक सौ. अश्विनी पाटील मॅडम यांनी प्रोत्साहनपर वैयक्तिक ₹५००/- रोख पारितोषिक देऊन गौरविले.
याप्रसंगी सन्माननीय अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. ऋषिकेश अभ्यंकर यांनी विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाशी मैत्री करत प्रगती साधावी, उत्तम आरोग्यासाठी नियमित व्यायाम करावा, यामुळे अभ्यासातही निश्चितच मदत होईल, असे मार्गदर्शन केले. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील संदर्भात संस्थेला सदैव सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार नृत्याने कार्यक्रमाची उत्साहपूर्ण आणि दिमाखदार सांगता झाली. श्री. मिलिंद गुरव सर यांनी आभार मानले व सौ. मोनिका गिरीगोसावी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. मनोहर देशभ्ररतार सर, संघटक सौ. जयश्री गोखले, संस्थेचे विश्वस्त सौ. सुजाता गारे, सौ. निता देशभ्रतार, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती उपाध्ये, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. मनोज शेडगे, प्राथमिक शाळेचे उपमुख्याध्यापक श्री. सचिन घाडीगावकर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व शाळा विकास सदस्य, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच, वसतिगृहातील विद्यार्थी व कर्मचारी व शाळेतील सर्व आजी – माजी विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. अशा प्रकारे उत्साह, देशभक्ती आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी भारलेल्या वातावरणात हा स्वातंत्र्यदिन सोहळा दिमाखात संपन्न झाला.
© अंजना लगस - ग्रंथपाल
#स्वातंत्र्यदिन #80वा_स्वातंत्र्यदिन #समर्थ #समर्थविद्यामंदिर #समर्थविद्यालय #उचगाव #देशभक्ती #विद्यार्थ्यांचेयश #एकता_समानता 🇮🇳

हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड, कोल्हापूरच्या समर्थ शाळेला हायड्रोलिक स्कूल बस व सोलर पॅनेलची भेटहेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड,...
15/08/2026

हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड, कोल्हापूरच्या समर्थ शाळेला हायड्रोलिक स्कूल बस व सोलर पॅनेलची भेट

हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड, कोल्हापूर द्वारा संचालित समर्थ शाळेत Emitec Technologies India Pvt. Ltd. यांच्या सामाजिक बांधिलकीतून हायड्रोलिक स्कूल बस व सोलर पॅनेल प्रदान सोहळा उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवासाला नवे बळ मिळणार असून संस्थेच्या पर्यावरणपूरक वाटचालीलाही नवी दिशा मिळाली आहे.

Emitec Technologies India Pvt. Ltd. ही जर्मनीमध्ये १९८६ साली स्थापन झालेली पर्यावरणपूरक आणि वाहनांच्या उत्सर्जन नियंत्रण तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक दर्जाची कंपनी आहे. भारतातील पुणे येथे कंपनीचे उत्पादन, अभियांत्रिकी व ग्राहक सेवा केंद्र कार्यरत असून, उद्योग क्षेत्रातील योगदानाबरोबरच शिक्षण आणि सामाजिक कल्याण क्षेत्रातही कंपनी सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने कार्यरत आहे. सामाजिक कल्याण आणि शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कंपनीला *Indian Social Impact Awards* ने गौरविण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी Emitec Technologies India Pvt. Ltd. चे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य वित्त अधिकारी **मा. श्री. मनोज मुंजाळ, प्रमुख – मानव संसाधन विभाग मा. सौ. पूनम पाठक, कंपनी सेक्रेटरी (लीगल अँड कम्प्लायन्स) मा. श्री. अनिल केतकर, चिंतामणी मोटर्सचे प्रोप्रायटर मा. श्री. उज्वल साठे तसेच आर्यन सोलरचे प्रोप्रायटर मा. श्री. अविनाश पाटील यांचे स्वागत करण्यात आले.

संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. मनोहर देशभ्रतार यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या चार दशकांच्या प्रेरणादायी प्रवासाचा आढावा घेतला. पूर्वी व्हीलचेअरवरील दिव्यांग विद्यार्थ्यांना बाहेर ने-आण करणे अत्यंत कठीण होते. मात्र Emitec Technologies India Pvt. Ltd. यांनी प्रदान केलेल्या अत्याधुनिक हायड्रोलिक स्कूल बसमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि अडथळामुक्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीची ही पहिली हायड्रोलिक स्कूल बस असल्याचा अभिमान व्यक्त करून Emitec Technologies India Pvt. Ltd. च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

यावेळी शाळेला प्रदान करण्यात आलेले **सोलर पॅनेल** संस्थेच्या वीज खर्चात बचत करण्यास, स्वच्छ व पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढविण्यास तसेच विद्यार्थ्यांमध्ये शाश्वत विकास आणि हरित ऊर्जेविषयी जागरूकता निर्माण करण्यास उपयुक्त ठरणार आहे. तर **हायड्रोलिक स्कूल बस** दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सुरक्षित, सन्मानजनक व अडथळामुक्त प्रवासासाठी मोलाची सुविधा ठरणार असून त्यांच्या शिक्षणाचा प्रवास अधिक सक्षम करणार आहे.

यानंतर Emitec Technologies India Pvt. Ltd. च्या प्रतिनिधींनी संस्थेच्या कार्याचे मनापासून कौतुक करत भविष्यातही शक्य ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तसेच **चिंतामणी मोटर्सचे प्रोप्रायटर मा. श्री. उज्वल साठे** यांनी मनोगतात संस्थेचे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहू आणि यापुढेही संस्थेला जमेल तेवढी मदत करू, असे आश्वासन दिले.

यावेळी संस्थेचे **अध्यक्ष मा. श्री. अभिजीत गारे, उपाध्यक्ष मा. श्री. मनोहर देशभ्रतार, सचिव मा. श्री. सुबोध मुंगळे, संस्थेचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, मुख्याध्यापिका सौ. स्वाती उपाध्ये, मुख्याध्यापक श्री. मनोज शेडगे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, घरोंदा वसतिगृहातील विद्यार्थी व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.**

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल श्रीमती अंजना लगस यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेचे खजिनदार मा. श्री. अनिल चिक्कोडी यांनी केले.

@ अंजना लगस - ग्रंथपाल

#समर्थशाळा #हेल्पर्सऑफदिहॅण्डिकॅप्ड #समर्थविद्यामंदिर #समर्थविद्यालय #दिव्यांगविद्यार्थी #दिव्यांगसक्षमीकरण #अडथळामुक्तशिक्षण #हायड्रोलिकस्कूलबस #स्कूलबस #सोलरपॅनेल #हरितऊर्जा #पर्यावरणसंवर्धन #सामाजिकबांधिलकी #सामाजिकउत्तरदायित्व #शिक्षणासाठीसहकार्य

क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनानिमित्त विद्यार्थ्यांचे अभ्यासपूर्ण सादरीकरणउंचगाव  : क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिना...
09/08/2026

क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनानिमित्त विद्यार्थ्यांचे अभ्यासपूर्ण सादरीकरण

उंचगाव : क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून समर्थ विद्यामंदिर व समर्थ विद्यालयाच्या सभागृहात विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांच्या जीवनकार्याबरोबरच आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि निसर्गाशी असलेले नाते यांचा परिचय करून दिला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेचे मुख्याध्यापक व मुख्याध्यापिका, उपस्थित शिक्षकवृंद तसेच वाढदिवस असलेल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मी क्रांतिकारक बोलतो आहे...’ या संकल्पनेवर आधारित भाषण सादरीकरण घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध क्रांतिकारकांची वेशभूषा परिधान करून जणू संबंधित क्रांतिकारक स्वतःच आपल्या जीवनप्रवासाची, संघर्षाची, देशासाठीच्या योगदानाची आणि विचारांची माहिती सांगत आहे, अशा प्रभावी पद्धतीने भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांच्या अभ्यासपूर्ण, उत्स्फूर्त आणि प्रभावी सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध आदिवासी जमातींचे अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. इयत्ता सहावीने कातकरी, सातवीने ठाकर, आठवीने गोंड, नववीने कोलाम तर दहावीने भिल्ल जमातीची निवड करून त्यांच्या इतिहास, संस्कृती, परंपरा, जीवनपद्धती, कला, लोकजीवन, निसर्गाशी असलेले नाते आणि समाजातील योगदान यांचा अभ्यास केला. विद्यार्थ्यांनी केवळ माहिती वाचनावर भर न देता ती समजून घेऊन स्वतःच्या शब्दांत मांडली. नृत्य, नाट्य, लोकगीते, वेशभूषा, संवाद आणि विविध कलात्मक माध्यमांचा कल्पक वापर करून सादरीकरणे अधिक आकर्षक करण्यात आली.

दरम्यान, इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी शर्वरी कुरणे हिने आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेसाठी पुस्तक भेट देऊन वाचनसंस्कृतीला हातभार लावला. तिच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

इंग्रजी विषयातील वाचन आणि लेखनाला प्रोत्साहन देण्यासाठीही यावेळी विशेष उपक्रम राबविण्यात आला. इंग्रजी भाषेतील पुस्तके वाचणाऱ्या तसेच इंग्रजीमध्ये लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या ग्रंथालयातर्फे नुकतेच प्रकाशित झालेले ‘वाचन आनंद’ हे पुस्तक बक्षीस स्वरूपात देऊन गौरविण्यात आले. इंग्रजी विषय हा केवळ पाठ्यपुस्तकापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांनी इंग्रजीचे वाचन आणि लेखन आनंदाने करावे, या उद्देशाने हा उपक्रम सौ. मुग्धा गोरे लिंगनूरकर मॅडम यांनी राबविला. शाळेतील शिक्षक श्री. सचिन वसावे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ही पुस्तके बक्षीस स्वरूपात प्रदान करण्यात आली. या उपक्रमाची माहिती शाळेच्या ग्रंथपाल श्रीमती अंजना लगस यांनी दिली.

यावेळी सौ. मुग्धा गोरे लिंगनूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती उपाध्ये मॅडम यांनी आभार मानले.

संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन, नियोजन व सूत्रसंचालन इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी केले. यासाठी त्यांना वर्गशिक्षिका सौ. मुग्धा गोरे लिंगनूरकर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

क्रांतिकारकांच्या त्यागाची प्रेरणा, आदिवासी संस्कृतीची ओळख, विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि वाचनाची गोडी यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व माहितीपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी मुख्याध्यापक श्री. मनोज शेडगे सर , मुख्याध्यापिका सौ स्वाती उपाध्ये मॅडम, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@ अंजना लगस - ग्रंथपाल

#समर्थविद्यामंदिर #समर्थविद्यालय #उचगाव #क्रांतीदिन #जागतिकआदिवासीदिन #आदिवासीदिन #क्रांतिकारक #मीक्रांतिकारकबोलतोआहे #आदिवासीसंस्कृती #आदिवासीपरंपरा #आदिवासीजमाती #विद्यार्थीसादरीकरण #विद्यार्थीउपक्रम #शैक्षणिकउपक्रम #सर्जनशीलशिक्षण #वाचनसंस्कृती #ग्रंथालयउपक्रम #वाचनआनंद #पुस्तकभेट #वाचनप्रेरणा

"ज्ञान, क्रांती आणि साहित्याचा संगम – स्मरण दोन थोर नेत्यांचे"लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णा भाऊ साठे जयंती ज्ञानसंपन...
01/08/2026

"ज्ञान, क्रांती आणि साहित्याचा संगम – स्मरण दोन थोर नेत्यांचे"

लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णा भाऊ साठे जयंती ज्ञानसंपन्न वातावरणात साजरी....

उचगाव, ता. १ ऑगस्ट: समर्थ विद्या मंदिर व समर्थ विद्यालयात स्वातंत्र्य चळवळीतील जहाल नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात व माहितीपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात टिळक व अण्णा भाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करून झाली. हे पूजन शाळेतील मुख्याध्यापिका सौ. स्वाती उपाध्ये व मुख्याध्यापक श्री. मनोज शेडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन आणि प्रभावी भाषणांद्वारे आपल्या भावना व मनोगत उत्स्फूर्तपणे व्यक्त केले.
यावेळी मुख्याध्यापक श्री. मनोज शेडगे सर यांनी लोकमान्य टिळकांच्या कार्याचा ऐतिहासिक संदर्भ उलगडत त्यांच्या प्रेरणादायी आठवणींना उजाळा दिला. तर उपमुख्याध्यापक श्री. सचिन घाडीगावकर सर यांनी आपल्या मनोगतात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यसंपदेचे, सामाजिक जाणिवेचे आणि विचारांचे महत्त्व प्रभावीपणे विशद केले.
कार्यक्रमाची सांगता पर्यावरणपूरक संदेशाने करण्यात आली. यावेळी अनुलोम संस्थेचे पर्यावरणप्रेमी श्री. रोहित भोसले यांनी शाळेला रोपटे भेट देऊन वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. तसेच सौ. मोनिका गिरीगोसावी यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा घेऊन निसर्गरक्षणाचा संकल्प दृढ केला.
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी केले. श्री. परशराम माईनकर सर यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या वेळी समर्थ विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती उपाध्ये, समर्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मनोज शेडगे, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© अंजना लगस - ग्रंथपाल
#लोकमान्यटिळक #अण्णाभाऊसाठे #साहित्यसम्राट #विद्यार्थिप्रेरणा
#ज्ञानक्रांती #उचगावपूर्व
#शिक्षणआणिसंस्कार
#मराठीशाळा
#शाळेतीलघटना

'समर्थ' मध्ये गुरुपौर्णिमा भावपूर्ण वातावरणात साजरी.गुरु म्हणजे ज्ञानाचा दीप,जीवनाला देतो नवी दिशा |त्यांच्या चरणी कृतज्...
29/07/2026

'समर्थ' मध्ये गुरुपौर्णिमा भावपूर्ण वातावरणात साजरी.
गुरु म्हणजे ज्ञानाचा दीप,
जीवनाला देतो नवी दिशा |
त्यांच्या चरणी कृतज्ञ भाव,
हीच खरी गुरुपूजेची भाषा ||

समर्थ विद्यामंदिर व समर्थ विद्यालय शाळेत गुरुपौर्णिमेचा उत्सव अत्यंत भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथपाल अंजना लगस मॅडम यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध कला-कौशल्यांद्वारे गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

सर्वात लहान चिमुकल्यांनी गोड श्लोक सादर करत वातावरण प्रसन्न केले, तर काही विद्यार्थ्यांनी भक्तिपूर्वक गणपती स्तोत्र सादर केले. प्रार्थनेच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला शुभ सुरुवात झाली.
संगीत व नृत्यसादरीकरणातून विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. “करुणा मानवंदना गीत” गायनाच्या माध्यमातून गुरुंबद्दलची कृतज्ञता शब्दांत उतरवली गेली. काही विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षकांविषयी मनोगते व्यक्त करत आपुलकीने गुरुंना वंदन केले. यावेळी शिक्षकांसाठी मनोरंजनपर खेळाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता गुरु- शिष्य परंपरेचे महत्व अधोरेखित करणारी चित्रफित प्रदर्शित करून करण्यात आली.

कार्यक्रमाचे नियोजन, सूत्रसंचालन आणि व्यवस्थापन इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध व कल्पकतेने पार पाडले. त्यांनी सर्व शिक्षकांना पेन व पुष्पगुच्छ देऊन आपला आदरभावही व्यक्त केला.

कार्यक्रमाची सांगता करताना सौ. विभावरी सावंत मॅडम यांनी गुरुंच्या मार्गदर्शनाची भूमिका गोष्टींच्या माध्यमातून व्यक्त केली. शेवटी श्री. अमित जगताप सरांनी आभार प्रदर्शन करत सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

या कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी संपूर्ण वातावरण एकात्मता व श्रद्धेने भरलेलं होतं.

© - अंजना लगस (ग्रंथपाल)

#गुरुपौर्णिमा


#गुरूंना_नमन
#गुरूशिष्यपरंपरा
#शिक्षकांचा_सन्मान





#भावनांची_गुरुपौर्णिमा

15/07/2026

📚 आनंदाची बातमी! 📚

समर्थ विद्यामंदिर व समर्थ विद्यालय, उचगाव (पूर्व) येथील समर्थ वाचनालय अंतर्गत विद्यार्थ्यांच्या निवडक अभिप्रायांचे "वाचन आनंद" हे ई-पुस्तक आज ई-साहित्य प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाले आहे. 🎉

मा. सुनील सामंत सर यांनी आपल्या मनोगतात या उपक्रमाचे कौतुक करत हा उपक्रम इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

या उपक्रमासाठी संस्थेचे माननीय पदाधिकारी, मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थ्यांचे लाभलेले सहकार्य अनमोल आहे. या यशात आपल्या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. मनःपूर्वक धन्यवाद! 🙏

अंजना लगस - ग्रंथपाल

📖 "वाचन आनंद" ई-पुस्तकाची लिंक :

https://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/vachan_chhand_anjana_lagas.pdf

चला, आपल्या विद्यार्थ्यांच्या विचारविश्वाचा हा सुंदर प्रवास नक्की वाचूया आणि त्यांना भरभरून शुभेच्छा देऊया! 💐

#वाचनआनंद #समर्थविद्यामंदिर #समर्थवाचनालय #अभिप्रायउपक्रम

समर्थ विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना हिंदी परीक्षेत घवघवीत यशहिंदी राजभाषा प्रचार संस्था, पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी...
27/06/2026

समर्थ विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना हिंदी परीक्षेत घवघवीत यश

हिंदी राजभाषा प्रचार संस्था, पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या हिंदी परीक्षेत समर्थ विद्यामंदिरच्या इयत्ता पाचवी, सहावी, सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.

या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना आज प्रमाणपत्रे व ट्रॉफी प्रदान करून त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेला आणखी एक मानाचा तुरा लाभला आहे.

या यशासाठी विद्यार्थ्यांना हिंदी विषयाच्या शिक्षिका यास्नीम काझी मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेच्या यशपरंपरेत आणखी एक मानाचे पान जोडले.

यावेळी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले.
@ अंजना लगस - ग्रंथपाल

‘समर्थ’ शाळेत राजर्षी शाहू महाराजांची १५२ वी जयंती उत्साहात साजरी"शिक्षण प्रसाराचे कार्य केले महान,आपल्या कर्तृत्वाचा आम...
26/06/2026

‘समर्थ’ शाळेत राजर्षी शाहू महाराजांची १५२ वी जयंती उत्साहात साजरी

"शिक्षण प्रसाराचे कार्य केले महान,
आपल्या कर्तृत्वाचा आम्हा अभिमान.
अमर झालात तुम्ही लोकराजा नामी,
लोकराजा शाहू, तुम्हा वंदितो आम्ही!"

बहुजनांच्या उन्नतीचा ध्यास घेत समाजाला समतेचा आणि शिक्षणाचा नवा मार्ग दाखवणारे दूरदृष्टीचे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त हेल्पर्स ऑफ द हॅण्डिकॅप्ड संचालित समर्थ विद्यामंदिर व समर्थ विद्यालयाच्या सभागृहात प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मागील शैक्षणिक वर्षात उल्लेखनीय गुण संपादन करणाऱ्या कु. समिता मांडरे व कु. सानवी कणबरकर यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक उपस्थित होते.
यानंतर सौ. विभावरी सावंत मॅडम यांनी आपल्या मनोगतातून राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक न्याय, शिक्षणप्रेम, बहुजन कल्याण आणि प्रगतिशील विचारांचा प्रेरणादायी आढावा घेतला. त्यांच्या कार्यामुळे समाजात घडून आलेल्या परिवर्तनाची प्रभावी मांडणी त्यांनी केली.
यावेळी विद्यार्थ्यांनीही राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याविषयी मनोगते व्यक्त करत त्यांच्या समतेच्या, शिक्षणाच्या आणि मानवतेच्या विचारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त व विचारपूर्ण मनोगतांनी कार्यक्रमात प्रेरणा, अभिमान आणि सामाजिक जाणिवेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

कार्यक्रमाची सांगता राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित माहितीपूर्ण पीपीटी सादरीकरणाने करण्यात आली.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी वर्गशिक्षिका सौ. विभावरी सावंत मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमास पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच इयत्ता पहिली ते दहावीतील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
ज्ञान, प्रेरणा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व माहितीपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
©अंजना लगस - ग्रंथपाल

#राजर्षीशाहूमहाराज #शाहूमहाराज१५२वीजयंती #समर्थविद्यामंदिर #समर्थविद्यालय #हेल्पर्सऑफदहॅण्डिकॅप्ड #समताआणिशिक्षण

समर्थ विद्यामंदिर व समर्थ विद्यालयात रौप्य महोत्सवाची सांगता व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव!हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड, क...
22/06/2026

समर्थ विद्यामंदिर व समर्थ विद्यालयात रौप्य महोत्सवाची सांगता व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव!

हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड, कोल्हापूर द्वारा संचालित समर्थ विद्यामंदिर व समर्थ विद्यालयाच्या सभागृहात शाळेच्या रौप्य महोत्सवाची सांगता तसेच शाळेने २६ व्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने एसएससी परीक्षा २०२६ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. यावेळी शाळा विकास समितीच्या अध्यक्षा सौ. गायत्री बोडके आणि शाळेतील यास्नीम काझी मॅडम यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी सर्व मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. विभावरी सावंत मॅडम यांनी केले. त्यानंतर उपस्थित मान्यवर व सर्व शिक्षकांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी शाळेची दहावीतील माजी विद्यार्थिनी दिक्षा यरनाळकर हिने आपले मनोगत व्यक्त करत शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. तसेच शाळेच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

याप्रसंगी समर्थ विद्यामंदिरचे उपमुख्याध्यापक व शाळा समन्वयक श्री. सचिन घाडीगावकर, मुख्याध्यापिका सौ. स्वाती उपाध्ये तसेच मुख्याध्यापक श्री. मनोज शेडगे यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. शाळेच्या यशस्वी वाटचालीमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. शाळेचे यश अबाधित राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त व नियमित अभ्यासाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच माजी शिक्षक आणि संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळेच शाळा यशस्वीपणे कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी शाळेमध्ये राबविण्यात येणाऱ्या ‘गणित यज्ञ’ या उपक्रमाविषयीही थोडक्यात माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. परशराम माईनकर सर यांनी केले, तर श्री. अमित जगताप सर यांनी आभार प्रदर्शन केले.

हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड, कोल्हापूर संस्थेच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या शाळेच्या २५ वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचे दर्शन घडविणाऱ्या विशेष व्हिडिओद्वारे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी माजी विद्यार्थी, पालकवर्ग, शाळा विकास समितीच्या अध्यक्षा सौ. गायत्री बोडके, मुख्याध्यापिका सौ. स्वाती उपाध्ये, मुख्याध्यापक श्री. मनोज शेडगे, उपमुख्याध्यापक श्री. सचिन घाडीगावकर, शाळा प्रशासकीय विभाग प्रमुख श्री कृष्णात कांबळे सर, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.
@ अंजना लगस - ग्रंथपाल

#समर्थविद्यामंदिर #समर्थविद्यालय #रौप्यमहोत्सव #गुणगौरवसोहळा

Address

264/A, Shantinagar, Unchgaon (East), Gadmudshingi Road
Kolhapur
416005

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 8am - 12pm

Telephone

+912312615155

Alerts

Be the first to know and let us send you an email when समर्थ विद्यामंदिर / विद्यालय posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to समर्थ विद्यामंदिर / विद्यालय:

Shortcuts

Share