31/08/2025
नमस्कार.
दिनांक 28 ते 30 ऑगस्ट 2025 या कालावधीत श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सोसायटी द्वारा आयोजित कलाश्री महोत्सव अतिशय सुंदर पार पडला.
पहिल्या दिवशी "स्वरसंध्या" कार्यक्रमाच्या सादरीकरणाने रसिक खरोखरच सुरांच्या विश्वात न्हाऊन निघाले.
संगीत कलेवर मनापासून प्रेम करणाऱ्या लोहिया कुटुंबातील अविका अंकित हिच्या सतार वादनाने आणि अनय अंकित लोहिया च्या जॅम्बे वादनाने महोत्सवाची सुरेल सुरुवात झाली. अविका हिने राग वृंदावनी सारंग ने सुरुवात केली. अनय चे जॅम्बे वादन आणखी हवेहवेसे वाटले. त्यानंतर अविकाने सादर केलेल्या जय गणेश जय गणेश या पारंपारिक गीताने या पहिल्या सत्राची सांगता झाली. संदेश खेडेकर ची तबला साथ नेहमीप्रमाणेच साजेशी होती. एकूणच या दोन्ही बालकलाकारांनी आपल्या सादरीकरणाने रसिकांना एक वेगळाच आनंद दिला.
दुसऱ्या सत्रात आपल्याच अकॅडमीतील शिक्षिका सौ. वंदना आठले यांच्या कन्या चिन्मयी आठले ओक यांच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय, ठुमरी, भजन आणि अभंग गायनाने रसिकांना तृप्त केले. प्रशांत देसाई आणि स्वरूप दिवाण यांच्या समर्पक साथीने कार्यक्रमात रंगत आणली.
दुसरा दिवस गाजला तो वाद्य संगीताने. आपल्या संस्थेचा माजी विद्यार्थी आणि उदयोन्मुख कलाकार ऋतुराज धुपकर यांच्या हार्मोनियम वादनाचा आणि कोल्हापुरातील आणखी एक उदयोन्मुख कलाकार तनय कामत यांच्या बासरी वादनाचा रसिकांनी मनमुराद आनंद घेतला. या कार्यक्रमाला अनुक्रमे संदेश खेडेकर आणि ओंकार सूर्यवंशी यांची तबला साथ लाभली.
काल महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी "सूरसखी", पुणे प्रस्तुत "कजरा मोहब्बतवाला" या हिंदी चित्रपटांच्या सुवर्ण काळातील फीमेल द्वेट्स या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाने महोत्सवाचा कळस गाठला. संगीतकार नौशाद, एस डी बर्मन, वसंत देसाई आणि जवळपास 60 ते 70 च्या दशकातल्या गायिकांचा हा अविष्कार अतिशय स्मरणीय होता. संपूर्णतः स्त्री कलाकार असलेल्या या कार्यक्रमातील निवेदनाबरोबरच सर्वच गायक आणि वादक यांनी जुन्या हिंदी गीतांचे सुरेल सादरीकरण केले.
जवळपास प्रत्येक गीताला रसिकांचा वन्स मोअर मिळत होता. सभागृहाबाहेरचा वरूणराजाच्या आगमनाबरोबरच सभागृहातील सर्व रसिक श्रोतेही स्वर चांदण्यात न्हाऊन गेले.
मनीषा आपटे यांच्या निवेदनानेही महोत्सवात रंगत आणली.
एकूणच हा तिसरा "कलाश्री" महोत्सव आपल्या इतर महोत्सवांप्रमाणेच अतिशय यशस्वीरित्या पार पडला.
अर्थात यासाठी नेहमीप्रमाणेच मा. विनोदजी लोहिया, मा. निर्मलजी लोहिया, मा. नितीन वाडीकर सर, प्राचार्य प्रभाकर हेरवाडे सर, प्राचार्य एस. एस. चव्हाण सर यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.
अहिरे सर यांच्या फलक लेखनाने सर्वांचे लक्ष वेधले. संस्थेतील सर्वच स्टाफ, कर्मचारी तसेच शाळेतील सर्व घटकांचे नेहमीप्रमाणेच मोलाचे सहकार्य लाभले.
अतिग्रे सर, भांडवले सर आणि प्रसाद कुलकर्णी यांचाही या महोत्सवाला मोलाचा सहभाग लाभला.
असा समारंभ म्हटलं तर नवरा नवरी शिवाय झालेला हा एक लग्न समारंभच असतो.
आपण सर्वांनी मिळून माझ्यावर जो विश्वास टाकला, तो आपण सर्वांनीच केलेल्या मोलाच्या मदतीनेच सार्थ ठरला.
पुन्हा एकदा मनापासून सर्वांचे आभार. अनावधानाने कोणाचे नाव राहून गेले असेल तर क्षमस्व.
डॉ. शीतल धर्माधिकारी.