03/09/2017
भक्ती सेवा विद्यापीठ हायस्कूल, कोल्हापूर
सन्माननिय माजी विद्यार्थी,
विद्यापीठ हायस्कूल, कोल्हापूर.
आपल्या विद्यापीठ हायस्कूलची स्थापना ३ सप्टेंबर ,१९१७ रोजी झाली .म्हणजे येत्या रविवार दिनांक ३ सप्टेंबर २०१७ रोजी आपल्या विद्यापीठ हायस्कूलला १०० वर्षे पूर्ण होतील .शाळेच्या दृष्टीने १०० वा वर्धापन दिन हा सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्याचा दिवस आहे . १०० वर्षांपूर्वी करवीर नगरीचे थोर राजे छत्रपती शाहू महाराज हे शाळेच्या स्थापनेच्या दिवशी म्हणजेच ३ सप्टेंबर , १९१७ रोजी शाळेला आशीर्वाद देण्यासाठी शाळेत समक्ष हजर होते .आता १००वर्षांनी त्याच समाज उद्धारक छत्रपती शाहू महाराज यांचे आताचे वंशज श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे १०० व्या वर्धापन दिनाला शुभाशीर्वाद देण्यासाठी समक्ष हजर राहणार आहेत .आपणा सर्वांच्या दृष्टीने हा एक अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र असा हा योग आहे .तसेच या १०० व्या वर्धापन दिनाला महाराष्ट्र राज्याचे सहकार, पणन, वस्त्रोद्योग ,सार्वजनिक बांधकाम, आणि कोल्हापूरचे पालकमंत्री माननीय ना.चंद्रकांत दादा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत .
विद्यापीठ हायस्कूलच्या प्रांगणात सकाळी ९.३० वा संपन्न होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आपणाला निमंत्रित करण्यात येत आहे .या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून आपण सकाळी ठीक ९.३० वाजता विद्यापीठ हायस्कूलमध्ये यावे .संपूर्ण रंगवून आकर्षक बनलेली , विद्युत रोषणाईने सजलेली , आणि मधल्या चौकात भव्य मंडपाचे वस्त्र परिधान करून नटलेली आपली मातृ शाळा तिच्या १००व्या वाढदिवसाला तुम्हाला बोलावत आहे . आपणा सर्वांच्या साक्षीने श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते १००व्या वर्धापन दिनासाठी खास बनवण्यात आलेला शंभर किलोचा केक यावेळी कापला जाणार आहे .चला तर मग आपल्या शाळेचे आश्रयदाते छत्रपती शाहू महाराज आणि आद्य संस्थापक कै वा. द. तोफखाने मास्तर आणि केै. परमपूज्य दीक्षित गुरुजी आणि विद्यापीठाच्या प्रगतीसाठी योगदान दिलेल्या ज्ञात अज्ञात व्यक्तींचे स्मरण करून त्यांना वंदन करण्यासाठी एकत्र येऊया. या निमित्ताने आपल्या शालेय बंधू भगिनींना पुन्हा एकदा भेटूया. आपल्या आजी -माजी गुरुजनांना भेटूया. १०० वर्षांनंतर आलेल्या या दुर्मीळ दिवसाचे आपण साक्षीदार बनुया .यासाठी आपण स्वतः तर या कार्यक्रमाला हजर राहाच शिवाय आपल्या संपर्कात असणाऱ्या आपल्या इतर शालेय बांधवांना हजर राहण्याचा आग्रह करा .१०० वा शालेय वर्धापन दिनाचा कार्यक्रम सकाळी ९.३० ते १२ या वेळेत होईल .याच दिवशी शाळेचे माजी विद्यार्थी अंतरंग वाद्यवृंदाचे श्री महेश हिरेमठ यांच्या सुगम गीत गायनाचा कार्यक्रम सायंकाळी ६ ते ८ या वेळेत विद्यापीठ हायस्कूल येथे खास आपल्यासाठी आयोजित केला आहे याही कार्यक्रमास आपण अगत्याने उपस्थित राहावे ही विनंती .
आपला
प्रदीप गबाले सर
सचिव
विद्यापीठ हायस्कूल शताब्दी महोत्सव समिती कोल्हापूर .
~*~*~*~*~*~*~*~*~*~
वर्धापन दिन कार्यक्रमाची वेळ- सकाळी :- ९.३०ते १२
महेश हिरेमठ यांचा अंतरंग वाद्यवृंद सायंकाळी :- ६ ते ८
स्थळ :-विद्यापीठ हायस्कूल कोल्हापूर