06/10/2025
नाती बदलली… माणूसही बदलला!
रक्ताचं नातं टिकेनासं झालंय.
जवळचे नातेवाईक दुरावलेत, आणि अनेक वर्षांपासून जपलेली मैत्रीही आता श्वास गमावत चालली आहे.
पंचवीस–तीस वर्षांचा विश्वास, समजूत आणि आपुलकी एखाद्या क्षुल्लक गोष्टीवर कोसळते.
माणसानं माणसाशी कसं वागावं, हेच आता कळेनासं झालंय!
एक काळ होता — माणसं एकमेकांना समजून घ्यायची.
भौतिक सुखं कमी होती, पण मनं समाधानात होती.
साखर कमी पडली की शेजाऱ्यांकडून मागायला कुणाला लाज वाटत नसे.
दूध, पीठ, साडी–चोळी — सगळं शेअर करायचं, कारण आपलेपणाचं नातं होतं.
गरीब–श्रीमंत असा भेद नव्हता, “अडीनडीला एकमेकांच्या पडलं पाहिजे” ही समाजाची धारणा होती.
पण काळ बदलला…
सुखसोयी वाढल्या, पैसा वाढला, आणि त्याचबरोबर माणसांमधला दुरावा पण वाढला.
प्रत्येक जण स्वावलंबी झाला, पण आत्मकेंद्रीही झाला.
आता कोणावाचून कोणाचं काही अडत नाही — हीच खरी शोकांतिका आहे.
आई–वडिलांची, भावंडांची, अगदी जवळच्या मित्रांचीही गरज कुणाला राहिलेली नाही.
मोबाईलच्या स्क्रीनने घरातली माणसं दूर केलीत.
स्मार्टफोन आले, पण संवाद गेला.
फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप हेच आता माणसांचे नवे “नातेवाईक” झालेत.
डिजिटल जगात नाती जुळतात, पण मनं मात्र रिकामी राहतात.
भावनांचा कोंडमारा वाढतोय… आणि आपण सगळेच त्यात हळूहळू गुदमरतो आहोत.
भौतिक प्रगतीच्या या चकचकीत युगात,
मनुष्याकडे सर्व काही आहे. फक्त “माणूसपण” मात्र उरलंच नाही.