विद्या भारती विदर्भ

विद्या भारती विदर्भ विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान, नवी दिल्ली

आचार्य हेच राष्ट्रनिर्मितीचे शिल्पकार’ : डॉ. कृष्ण गोपालजी0 श्रवणाधारित लेखन स्पर्धाचे आयोजनअकोला : विद्या भारती विदर्भ ...
25/08/2026

आचार्य हेच राष्ट्रनिर्मितीचे शिल्पकार’ : डॉ. कृष्ण गोपालजी

0 श्रवणाधारित लेखन स्पर्धाचे आयोजन

अकोला : विद्या भारती विदर्भ अकोलाच्या वतीने विद्या भारती समूहातील शाळांच्या प्रधानाचार्य व आचार्यांसाठी 'शिक्षा क्षेत्र में आचार्य की भूमिका' या विषयावर प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मा. डॉ. कृष्ण गोपालजी यांच्या ऑडिओ भाषणावर आधारित (श्रवणाधारित ) मार्गदर्शनपर कार्यक्रमात शिक्षण हे केवळ ज्ञानार्जनाचे साधन नसून राष्ट्रनिर्माण, चारित्र्यनिर्मिती व संस्कारक्षम समाज घडविण्याचे प्रभावी माध्यम असल्याचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी विद्या भारती विदर्भचे अध्यक्ष सचिन जोशी, प्रांत सहमंत्री समीर थोडगे, शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा ताराताई हातवळणे आणि जनसखा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मंगेश वानखडे, मधुर खंडेलवाल उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समीर थोडगे यांनी तर आभार प्रदर्शन सचिन जोशी यांनी मानले. कार्यक्रमाला विद्या भारती समूहातील पाच शाळांच्या २०० हून अधिक आचार्य उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनात मुख्याध्यापिका धनश्री पांडे, सई रानडे, रसिका वाजगे, अभय वानखडे यांचे सहकार्य लाभले. शिक्षण क्षेत्र अधिक संस्कारक्षम, मूल्याधिष्ठित आणि राष्ट्राभिमुख करण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

स्पर्धेतील विजेते : विद्या भारती विदर्भ अकोला आयोजित लेखलेखन स्पर्धेतील विजेत्यांना संस्थेच्या वतीने रोख पारितोषिक व विद्या भारतीच्या वतीने स्मृतिचिन्ह देवून गौरव करण्यात आला. शिक्षण प्रसारक मंडळ गटातून अरुण रावतकर यांनी प्रथम, अंकिता दिवेकर यांनी द्वितीय तर अभय वानखडे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. जनसखा शिक्षण मंडळ गटातून अश्विनी संजय राजे प्रथम, विठ्ठल शिव हरी पटोकार द्वितीय आणि वैष्णवी अविनाश उजगावकर तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.

गोंदिया जिल्ह्यात विद्या भारतीचे सुवर्ण महोत्सवी संपर्क अभियानगोंदिया, दि. १५ व १६ ऑगस्ट २०२६ : विद्या भारती विदर्भ प्रा...
24/08/2026

गोंदिया जिल्ह्यात विद्या भारतीचे सुवर्ण महोत्सवी संपर्क अभियान

गोंदिया, दि. १५ व १६ ऑगस्ट २०२६ : विद्या भारती विदर्भ प्रांताच्या सुवर्ण महोत्सवी संपर्क अभियानांतर्गत गोंदिया व आमगाव परिसरात व्यापक संपर्क दौरा आयोजित करण्यात आला. प्रांत सहमंत्री श्री. रणदीप बिसने, गोंदिया जिल्हाध्यक्ष दीप्तीताई तावडे व जिल्हा मंत्री सुषमाताई यदुवंशी यांनी विविध शैक्षणिक संस्था व विद्यालयांना भेटी देऊन संस्था संचालक, प्रधानाचार्य व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला.

या दौऱ्यात संस्कृती ज्ञान परीक्षा, वंदे मातरम्, संत रविदासजी, NEP 2020 नुसार शाळांचे संचालन, भारतीय संस्कृती व मूल्याधारित शिक्षण या विषयांवर चर्चा करण्यात आली.

या संपर्क अभियानामुळे गोंदिया जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांशी विद्या भारतीचा संपर्क अधिक दृढ झाला असून, संस्काराधारित व भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षणाच्या विस्तारासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

उत्कर्ष विद्या मंदिर येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपखापरी (परसोडी) : राजकोट नागरिक सहकारी बँक आणि विद्या भारत...
24/08/2026

उत्कर्ष विद्या मंदिर येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

खापरी (परसोडी) : राजकोट नागरिक सहकारी बँक आणि विद्या भारती विदर्भ न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने उत्कर्ष विद्या मंदिर, खापरी (परसोडी) येथील इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

स्वयंअर्थसहाय्यित मराठी माध्यमाची ग्रामीण भागातील नामवंत शाळा म्हणून उत्कर्ष विद्या मंदिराची ओळख असून, परिसरातील सुमारे ३५ खेड्यांमधून विद्यार्थी या शाळेत शिक्षणासाठी येतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी शाळेचे प्रधानाचार्य सारंग कांबळे, कु. मेघा महल्ले, सौ. अमृता बायस्कर दीदी यांच्यासह अन्य शिक्षिका उपस्थित होत्या. तसेच विद्या भारतीचे प्रांत संघटन मंत्री शैलेश जोशी, प्रांत शिशुवाटिका प्रमुख श्रीमती निर्मलाताई महाजन, नागपूर महानगर, नागपूर ग्रामीण व भंडारा जिल्ह्याचे पूर्णकालीन कार्यकर्ते सुभाष त्रिपाठी यांची उपस्थिती होती.

आजपासून विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होत असल्याने योग्य वेळी शालेय साहित्य मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. साहित्य मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधनांची उपलब्धता करून देत त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.

युवा मंथन विज्ञान प्रदर्शनात स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापारचा विद्यार्थी प्रथमनागपूर, दि. २४ ऑगस्ट २०२६ : युवा मंथन ...
24/08/2026

युवा मंथन विज्ञान प्रदर्शनात स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापारचा विद्यार्थी प्रथम

नागपूर, दि. २४ ऑगस्ट २०२६ : युवा मंथन विज्ञान प्रदर्शनामध्ये उत्कृष्ट वैज्ञानिक प्रकल्प सादर करून स्वामी विवेकानंद विद्यालय, देवलापार येथील विद्यार्थी चि. वंश विलास मरसकोल्हे याने प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले.

या यशाबद्दल चि. वंश विलास मरसकोल्हे तसेच त्याचे मार्गदर्शक शिक्षक व विद्या भारती प्रांत सहमंत्री श्री. उल्हास वामनराव इटानकर यांचा माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्याच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला योग्य दिशा देत मार्गदर्शन करणारे श्री. उल्हासजी इटानकर आणि अथक परिश्रम घेऊन प्रथम क्रमांक मिळविणारा चि. वंश मरसकोल्हे यांचे हे यश शाळेसह विद्या भारती परिवारासाठी अभिमानाची बाब आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल चि. वंश विलास मरसकोल्हे आणि मार्गदर्शक शिक्षक श्री. उल्हास वामनराव इटानकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

एकलव्य एकल विद्यालयाच्या शिक्षकांना विद्या भारतीच्या मार्गदर्शनातून कृतीयुक्त शिक्षणाचे प्रशिक्षणपारडसिंगा, जि. नागपूर, ...
24/08/2026

एकलव्य एकल विद्यालयाच्या शिक्षकांना विद्या भारतीच्या मार्गदर्शनातून कृतीयुक्त शिक्षणाचे प्रशिक्षण

पारडसिंगा, जि. नागपूर, दि. २३ ऑगस्ट २०२६ :
कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेद्वारा संचालित एकलव्य एकल विद्यालयाच्या सर्व शिक्षक व पर्यवेक्षकांचा चार दिवसीय अभ्यासवर्ग सती अनुसया माता देवस्थान, पारडसिंगा, ता. काटोल, जि. नागपूर येथे दि. २० ते २३ ऑगस्ट २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आला.

या प्रशिक्षण वर्गात एकलव्य एकल विद्यालयातील शिक्षकांना विद्यार्थ्यांचा भाषा विकास व गणन विकास कृतीयुक्त आणि अनुभवाधारित पद्धतीने कसा साधता येईल, याबाबत विद्या भारतीच्या प्रशिक्षित कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हे केवळ पाठांतरावर आधारित न राहता कृती, अनुभव आणि सहभागातून प्रभावी कसे करता येईल, याचे विविध उपक्रमांद्वारे प्रात्यक्षिक देण्यात आले.

अनौपचारिक शिक्षण व्यवस्थेचा भाग म्हणून कार्यरत असलेल्या एकलव्य एकल विद्यालयाच्या पर्यवेक्षक व शिक्षकांमधून सुमारे ८० तज्ज्ञ मार्गदर्शक तयार करण्यात आले आहेत. या मार्गदर्शकांनी महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांमधील सुमारे १,५०० कार्यकर्त्यांना प्रशिक्षणादरम्यान मार्गदर्शन केले.

संपूर्ण प्रशिक्षण प्रक्रियेत कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेचे सचिव प्रशांत बोपर्डीकर, भारत भुजाडे, गणेश उमाळे, विद्या भारतीचे प्रांत संघटन मंत्री शैलेश जोशी, नागपूर महानगर उपाध्यक्षा श्रीमती अर्चना जैनाबादकर, सरस्वती शिशु मंदिर उच्च प्राथमिक शाळा, प्रसाद नगरच्या मुख्याध्यापिका सौ. मृदुल भुते, सेवासदन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. हर्षा उकेश, विद्या भारतीच्या प्रांत शिशु वाटिका प्रमुख श्रीमती निर्मला महाजन तसेच जिल्हा मंत्री सोमदत्त हिवसे यांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी गुरुकुल पब्लिक स्कूल, कारंजा घाडगे, सरस्वती शिशु मंदिर, प्रसाद नगर, सरस्वती शिशु मंदिर, राजाबाक्षा, सरस्वती शिशु मंदिर, महाल आणि सेवासदन प्राथमिक शाळा येथील शिक्षिकांनी विशेष सहकार्य केले. त्यांनी कृतीयुक्त व अनुभवजन्य शिक्षणाची संकल्पना विविध उपक्रम आणि उदाहरणांच्या माध्यमातून प्रभावीपणे समजावून सांगितली.

एकलव्य एकल विद्यालयाच्या माध्यमातून ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण आणि संस्कारक्षम शिक्षण पोहोचविण्यासाठी शिक्षकांचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरत असून, या अभ्यासवर्गातून प्रशिक्षित झालेले शिक्षक आगामी काळात विद्यार्थ्यांच्या भाषा, गणनकौशल्यासह सर्वांगीण विकासाला अधिक प्रभावी दिशा देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

देशभक्तीपर गीतांनी रंगली ‘भास्करराव खोत देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा’0 २९ शाळांच्या तब्बल ४३५ विद्यार्थांचा सहभाग 0 व...
24/08/2026

देशभक्तीपर गीतांनी रंगली ‘भास्करराव खोत देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा’

0 २९ शाळांच्या तब्बल ४३५ विद्यार्थांचा सहभाग
0 विद्या भारती विदर्भ अकोलाचे आयोजन

अकोला : विद्या भारती, अकोला यांच्या वतीने आयोजित स्व. भास्करराव खोत देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा २०२६ उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात स्थानिक प्रमिलाताई ओक सभागृहात पार पडली. अकोला परिसरातील २९ शाळांमधील तब्बल ४३५ विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, ॐ पूजन, भारतमाता पूजन आणि सरस्वती वंदनेने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या भारती विदर्भचे अध्यक्ष सचिन जोशी होते. उद्घाटन समारंभाचे प्रमुख वक्ते अंबरीश पुंडलिक यांनी ‘देशभक्तीपर गीतांचा बालमनावर होणारा परिणाम’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मिशन उडान, अकोला पोलिस दलाचे हवालदार लेखक, कवी, गोपाल मुकुंदे यांनी विद्यार्थी सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी कृष्णा खोत यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
समारोप समारंभाला अध्यक्षा ताराताई हातवळणे, अंबरीश पुंडलिक, मंगेश वानखडे तसेच स्पर्धेचे परीक्षक विशाल जळमकर (तेल्हारा) आणि एकनाथ जोशी (वाशिम) उपस्थित होते. सुदेशकुमार काळपांडे तसेच सौ. व श्री. ऋषिकेश अढाऊ यांची प्रमुख उपस्थिती होती.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन महानगर मंत्री योगेश मल्लेकर, गिरीजा कानडे आणि आकांक्षा देशमुख यांनी केले. गिरीजा कानडे यांनी प्रास्ताविक केले, तर महानगर अध्यक्ष मंगेश वानखडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्या भारती अकोला जिल्हा मंत्री गिरीश कानडे, अंजली अग्निहोत्री, लता कुर्हेकर, सागर तिवारी, अमृतेश अग्रवाल, नितिन भोळे, पल्लवी कुलकर्णी तसेच श्री संताजी इंग्लिश प्रायमरी अँड मिडल स्कूल, भारती प्लॉट, अकोला येथील शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून रोटरी क्लब अकोला यांच्या वतीने स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना भगवद्गीतेचे वितरण करण्यात आले.
देशभक्तीपर गीतांच्या सुमधुर आणि जोशपूर्ण सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम, संस्कार व देशभक्तीची भावना प्रभावीपणे व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि समूहभावनेला व्यासपीठ देणारी ही स्पर्धा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरली.

( बॉक्स )
अ गट वर्ग १ ते ४ –
प्रथम – प्रभात किड्स, अकोला
द्वितीय – खंडेलवाल मराठी प्राथमिक शाळा, अकोला
तृतीय – विवेकानंद प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूल, अकोला

ब गट वर्ग ५ ते ७
प्रथम – समर्थ पब्लिक स्कूल, अकोला
द्वितीय – कन्नूभाई वोरा अंध विद्यालय, मळकापुर अकोला
तृतीय – स्कूल ऑफ स्कॉलर्स, अकोला

क गट वर्ग ८ ते १०
प्रथम – प्रभात किड्स, अकोला
द्वितीय – आर. डी. जी. पब्लिक स्कूल, अकोला
तृतीय – स्कूल ऑफ स्कॉलर्स, कौलखेड, अकोला

देशभक्ती गीतांनी दुमदुमला बी.आर.ए. मुंडले शाळेचा परिसर*नागपूर :विद्या भारतीच्या नागपूर महानगर समिती आणि धरमपेठ शिक्षण सं...
23/08/2026

देशभक्ती गीतांनी दुमदुमला बी.आर.ए. मुंडले शाळेचा परिसर

*नागपूर :विद्या भारतीच्या नागपूर महानगर समिती आणि धरमपेठ शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *'श्रद्धेय विनायकराव फाटक स्मृती देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा'* मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात पार पडली.

ही स्पर्धा बी.आर.ए. मुंडले इंग्लिश मीडियम स्कूल येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे उद्घाटन मान्यवर *श्री. जयंत इंदूरकर* यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून *ब्लाइंड रिलीफ असोसिएशनचे अध्यक्ष मकरंद पांढरीपांडे तसेच धरमपेठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उल्हास औरंगाबादकर, उपाध्यक्ष दीपक दुधाने, विदर्भ प्रांत संघटन मंत्री शैलेश जोशी* उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्या भारती नागपूर महानगरचे अध्यक्ष *श्रीकांत देशपांडे* यांनी भूषविले.

या स्पर्धेत इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी दोन गटात सहभाग घेतला होता. गट 'अ' मध्ये १३ शाळांनी तर गट 'ब' मध्ये २४ शाळांनी नोंदणी करून सहभाग घेतला होता. सर्व विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

स्पर्धेचे परीक्षण संगीत क्षेत्रतील जाणकार *श्रीमती प्रज्ञा कुळकर्णी, अनिरुद्ध देशपांडे, विनोद वखरे आणि सौ. संपदा पाचपोर* यांनी केले.

*स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :

*गट 'अ' (लहान गट) :
- *प्रथम क्रमांक : सांदीपनी स्कूल, हजारी पहाड
- *द्वितीय क्रमांक : संस्कार विद्या सागर
- *तृतीय क्रमांक : भारती कृष्ण विद्या विहार, तेलंगखेडी
- *उत्तेजनार्थ : नवयुग प्राथमिक शाळा, राजाबाक्षा आणि केशव नगर उच्च प्राथमिक शाळा, नंदनवन

*गट 'ब' (मोठा गट) :
- *प्रथम क्रमांक : सांदीपनी स्कूल, हजारी पहाड
- *द्वितीय क्रमांक : ब्लाइंड बॉईज इन्स्टिट्यूट, साऊथ अंबाझरी
- *तृतीय क्रमांक : माऊंट लिटरा झी स्कूल, बेसा
- *उत्तेजनार्थ : साऊथ पब्लिक स्कूल, ओंकार नगर आणि भारती कृष्ण विद्या विहार

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागपूर महानगर मंत्री *डॉ. अंकेश शाहू, उपाध्यक्ष संदीप पंचभाई, मुख्याध्यापिका सौ. मेघा पाध्ये, श्रीमती मंजूल मेहता* यांच्यासह *सौ.प्रिया भोरे, प्रशांत उपगडे, सौ. प्राची मुळे, सुभाष त्रिपाठी, दिनेश चांद्रायण, मिलिंद पुरम आणि सौ.अनुष्का तांबडे* यांचे विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *सौ. उज्वला सोळंके* यांनी केले, तर प्रास्ताविक नागपूर महानगरच्या उपाध्यक्षा *सौ. अर्चना जैनाबादकर* यांनी केले.
सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन प्रोत्साहित करण्यात आले आणि विजेत्यांना मानचिन्हे देण्यात आली. या
स्पर्धेला विशेषकरून मंगेश फाटक सपत्निक
उपस्थित होते.

21/08/2026

विद्या भारती अकोला जिल्हा आयोजित देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा 2026

उदघाटन समारंभ

रघुपीर कॉन्व्हेंट भंडारा येथे शिशु वाटिका ताईंची कार्यशाळा संपन्नभंडारा दि. 8 ऑगस्ट शिशु शिक्षणाच्या नवीन अभ्यासक्रमाचा ...
09/08/2026

रघुपीर कॉन्व्हेंट भंडारा येथे शिशु वाटिका ताईंची कार्यशाळा संपन्न

भंडारा दि. 8 ऑगस्ट शिशु शिक्षणाच्या नवीन अभ्यासक्रमाचा परिचय करून देण्यासाठी विद्या भारती तर्फे स्थानिक रघुवीर कॉन्व्हेंट येथे कार्यशाळेचे आयोजन केले गेले.

पाठ्यपुस्तकांशिवाय विद्यार्थी शिकू शकतात याची अनुभूती शिशु वाटिकेच्या ताईंना आली. विविध गाणी, गोष्टी, खेळ यांमधून विद्यार्थ्यांचा भाषा विकास आणि गणन विकास कसा होतो याबाबत मार्गदर्शन विद्या भारतीच्या प्रांत शिशु वाटिका प्रमुख श्रीमती निर्मलाताई महाजन, नागपूर महानगराच्या शिशु वाटिका सहप्रमुख सौ. वैशाली सालोडकर, गोंदियाच्या चारुलता कटारे व मृणाल कटारे यांनी केले. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत हजारे, पूर्ण कालीन कार्यकर्ते सुभाष त्रिपाठी, संस्कृती बोध परियोजना संयोजक दिनेश चांद्रायण प्रामुख्याने उपस्थित होते. भंडाऱ्यातील विभिन्न 10 शाळांमधून सुमारे 25 ताई कार्यशाळेला उपस्थित होत्या. शांती मंत्राने कार्यशाळा संपन्न झाली.

नित्य नूतन तंत्रज्ञानासोबत पुढे जाणे आवश्यक — गोविंदजी महंतनोएडा | ८ ऑगस्ट २०२६ ; विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थे...
08/08/2026

नित्य नूतन तंत्रज्ञानासोबत पुढे जाणे आवश्यक — गोविंदजी महंत

नोएडा | ८ ऑगस्ट २०२६ ; विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थेच्या अखिल भारतीय प्रचार विभाग व अभिलेखागाराची दोन दिवसीय बैठक ८ व ९ ऑगस्ट रोजी नोएडा येथील भाऊराव देवरस सरस्वती विद्या मंदिर सीबीएसई विद्यालयात आयोजित करण्यात आली आहे. उद्घाटन सत्राला अखिल भारतीय संघटनमंत्री मा. गोविंदजी महंत, दक्षिण मध्य क्षेत्र संघटनमंत्री व प्रचार विभागाचे प्रभारी मा. सुधाकरजी रेड्डी, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य मा. ललित बिहारी गोस्वामी आणि अखिल भारतीय अभिलेखागार संयोजक श्री. राजेंद्रजी बघेल उपस्थित होते.

यावेळी सुधाकरजी रेड्डी यांनी ‘वंदे मातरम् अभियान’ देशभर व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. अमृत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गोविंदजी महंत यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्या भारतीच्या कार्याचा उद्देश राष्ट्रभक्त, संस्कारक्षम नागरिक घडविणे हा असल्याचे सांगितले. भारताची संस्कृती, परंपरा, ज्ञान व संस्कार पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हे आपले दायित्व असल्याचे त्यांनी नमूद केले.

“समयानुसार नित्य नूतन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून पुढे जाणे आवश्यक आहे,” असे सांगत त्यांनी आधुनिक संचार माध्यमांचा प्रभावी वापर करून विद्या भारतीचे विचार, कार्य व उपलब्धी समाजाच्या व्यापक वर्गापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.

अभिलेखागाराचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी विद्या भारतीच्या कार्याशी संबंधित महत्त्वपूर्ण दस्तऐवज, विचार व योगदान सुरक्षित ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. या दोन दिवसीय बैठकीत प्रचार विभाग व अभिलेखागाराच्या कार्याचा आढावा, आगामी नियोजन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि संघटनेचे कार्य समाजापर्यंत पोहोचविण्याबाबत मंथन करण्यात येत आहे.

कार्यक्रमाचे स्वागत आणि संचालन अखिल भारतीय सोशल मीडिया संयोजक श्री. आलोकजी तिवारी यांनी केले, तर संचालन व अतिथी परिचय अखिल भारतीय प्रचार संयोजक रामकुमारजी भावसार यांनी केले.

Address

Khapri
441108

Alerts

Be the first to know and let us send you an email when विद्या भारती विदर्भ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to विद्या भारती विदर्भ:

Shortcuts

Share

Category