10/01/2026
कोटा कॉलेज च्या सिद्धी रामुगडे ला दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाचे आमंत्रण.
कराड : भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाद्वारे आयोजित 'प्रकल्प वीर गाथा ५.० या देशव्यापी स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड ची विद्यार्थिनी कु. सिद्धी शंकर रामुगडे हिने 'टॉप १००' विजेत्यांमध्ये स्थान मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, इयत्ता १२ वी मध्ये शिकत असतानाही सिद्धीची निवड 'प्रिपरेटरी स्टेज' या गटासाठी मार्गदर्शक किंवा विशिष्ट श्रेणीतून झाल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भारतीय सशस्त्र दलातील शौर्य गाथा आणि शूरवीरांच्या बलिदानाची माहिती शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन भारत सरकार तर्फे केले जाते. यावर्षी देशभरातील लाखो विद्यार्थ्यांनी निबंध, कविता, चित्रकला आणि व्हिडिओंच्या माध्यमातून आपला सहभाग नोंदवला होता. या अटीतटीच्या स्पर्धेत सिद्धीने आपल्या कल्पकतेने आणि सादरीकरणाने परीक्षकांची मने जिंकली.
'सुपर १००' विजेत्यांमध्ये निवड झाल्यामुळे सिद्धीला नवी दिल्ली येथे आयोजित होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलनासाठी (२६ जानेवारी २०२६) विशेष निमंत्रित म्हणून बोलावले गेले आहे. तिला १०,००० रुपये रोख, मोफत विमान प्रवास ,पदक आणि प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात येणार आहे.
सिद्धीच्या या यशाबद्दल कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स चे अध्यक्ष डॉ. महेश खुस्पे ,उपाध्यक्षा सौ मंजिरी खुस्पे व संचालिका मैथिली खुस्पे यांनी तिचा व तिच्या पालकांचा सत्कार केला. यावेळी कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराडच्या प्राचार्या सौ. जयश्री पवार उपप्राचार्या सौ. सना संदे उपस्थित होत्या.