23/07/2026
स्वराज्य, स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षणाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांना महाविद्यालयात अभिवादन
आळे, दि. २३ जुलै : ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे मा. बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आळे येथे केंद्रीय ग्रंथालय व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव यांनी दिली.
जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात इतिहास विभागप्रमुख डॉ. अरुणा वाघोले यांनी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रकार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अग्रणी नेते होते. लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या त्रयीच्या नेतृत्वामुळे स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा मिळाली. राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार करत त्यांनी भारतीय संस्कृती, स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम जोपासणारी शिक्षणव्यवस्था उभारण्याचा आग्रह धरला. स्वदेशी वस्तूंचा वापर आणि परकीय वस्तूंवर बहिष्कार हे आर्थिक स्वातंत्र्याचे प्रभावी साधन असल्याचे त्यांनी समाजाला पटवून दिले. स्वदेशी उद्योगांना चालना देत आत्मनिर्भर भारताची संकल्पना त्यांनी त्या काळातच मांडली.
डॉ. वाघोले पुढे म्हणाल्या की, ‘केसरी’ या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून टिळकांनी ब्रिटिशांच्या अन्यायकारक धोरणांवर निर्भीडपणे टीका केली. ‘केसरी’ हे केवळ वृत्तपत्र नव्हते, तर जनजागृती, राष्ट्रभक्ती आणि स्वातंत्र्याची प्रेरणा देणारे प्रभावी माध्यम ठरले. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,” हा त्यांचा घोष भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी ऊर्जा देणारा ठरला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव म्हणाले, “लोकमान्य टिळक यांनी भारतीय समाजात स्वराज्य, स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीची चेतना जागविली. राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशीचा पुरस्कार आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला बळ दिले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन ज्ञान, चारित्र्य आणि राष्ट्रसेवा ही जीवनाची ध्येये स्वीकारावीत. त्यांच्या विचारांचे आचरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अजयनाना कुऱ्हाडे, बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष सौरभ डोके, मानद सचिव डॉ. अर्जुनशेठ पाडेकर, खजिनदार अरुणशेठ हुलवळे तसेच संचालक किशोरशेठ कुऱ्हाडे, भाऊशेठ कुऱ्हाडे, बबन सहाणे, उल्हासशेठ सहाणे, बाबुशेठ कुऱ्हाडे, शिवाजी गुंजाळ, जीवनशेठ शिंदे, दिनेश सहाणे, कैलासशेठ शेळके, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रदीपशेठ गुंजाळ, देविदास पाडेकर, सम्राट कुऱ्हाडे, रमेश कुऱ्हाडे, शांताराम कुऱ्हाडे व सर्व संचालक मंडळ यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. अरुण गुळवे, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. जयसिंग गाडेकर, बी.बी.ए. व बी.सी.ए. विभागप्रमुख प्रा. एस. एस. थोरात, प्रा. टी. एस. गायकवाड, प्रा. ए. पी. वामन, प्रा. एस. ए. शिंदे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी श्री. विकास साळवे, श्री. राजेंद्र पाडेकर, श्री. शुभम गुंजाळ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्रंथपाल प्रा. सीमा औटी यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजनात शिक्षकेतर कर्मचारी श्री. सोमनाथ तितर, श्री. गोविंद गाढवे आणि श्री. जितेंद्र शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.