23/08/2026
*माध्यमिक विद्यालय खर्चीच्या विद्यार्थ्यांची विज्ञान नाटिका स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांकाची बाजी*
खर्ची, ता. एरंडोल : शिक्षण विभाग, पंचायत समिती एरंडोल यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२६-२७ अंतर्गत तालुकास्तरीय विज्ञान नाटिका स्पर्धेत माध्यमिक विद्यालय खर्चीच्या विद्यार्थ्यांनी ‘इलेक्ट्रॉनिक वाहनांचे महत्त्व’ या विषयावर प्रभावी सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, वैज्ञानिक दृष्टिकोन, इलेक्ट्रिक वाहने, पर्यावरण संवर्धन तसेच भविष्यातील विज्ञान-तंत्रज्ञान या विषयांवर प्रभावी भाष्य करणारी नाटिका सादर केली. विद्यार्थ्यांच्या अभिनयासोबतच वैज्ञानिक आशय, विषयाची मांडणी, सादरीकरणातील परिणामकारकता आणि जनजागृतीचा संदेश यामुळे नाटिकेला परीक्षकांची विशेष दाद मिळाली.
कार्यक्रमास तालुक्याचे शिक्षणाधिकारी मा. श्री. आर. डी. महाजन, शिक्षण विस्तार अधिकारी मा. श्री. जे. डी. पाटील, केंद्रप्रमुख श्रीमती मनीषा सोनवणे, तालुका विज्ञान मंडळ समन्वयक श्री. अमोल वाणी, श्रीमती समिता पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. नानाभाऊ महाजन, मा. जि. प. सदस्य, मुख्याध्यापक श्री. अनिल विक्रम माळी, शिक्षकवृंद व पालकांनी नाटकेत सहभागी विद्यार्थी गौरव नाबदे,समृद्धी महाजन, देवयानी देशमुख, कल्याणी माळी,भूमिका महाजन,देवेश माळी, हिमानी महाजन,योगिता महाजन तसेच नाटिकेच्या मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती लोखंडे मॅडम व श्रीमती चव्हाण मॅडम यांचे अभिनंदन केले.
तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याने माध्यमिक विद्यालय खर्चीच्या विद्यार्थ्यांची पुढील स्तरावरील विज्ञान नाटिका स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.