19/05/2026
पावसातले बदल, कल्पनेची सहल!
शाळेच्या सुरुवातीचे दिवस होते. शाळा सुरू होऊन जवळजवळ महिना झाला होता. मुलंही छान रुळली होती. मोठ्या शिशुगटात पाऊस हा घटक सुरू होता. त्यानिमित्ताने मुलं पावसाची गाणी म्हणत होती, गोष्टी ऐकत होती, पावसाची चित्रं काढत होती. एक दिवशी मुलं शाळेत आल्यावर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आता मुलांचं वर्गात काय चाललंय तिथे लक्षच नव्हतं, त्यांना खिडकीतून बाहेर पडणारा पाऊस बघायचा होता. मुलांना तसं करू दिलं. पण एवढ्याने त्यांचं समाधान झालं नाही. आता त्यांनी शाळेबाहेरच्या स्टिल्टमध्ये, म्हणजे आमच्या ‘पडवी’त बसून पडणारा पाऊस बघण्यासाठी हट्ट केला. मुलांना पडवीत नेलं. तिथे बसून मुलांनी पाऊस तर पाहिलाच, पण आजुबाजूच्या अनेक गोष्टींचं निरीक्षण केलं आणि वर्गात सांगायला सुरुवात केली…
_शाळेची भिंत ओली झाली आहे._
_एका झाडाला दोन मोठी पानं आली आहेत._
_छोट्या रोपट्यांवर छोटी पानं आली आहेत._
_वाफ्यात थोडी रोपटी आली आहेत._
_उंच झाडाचा रंग चॉकलेटी झाला आहे._
साधारण पंधरा दिवसांनी पुन्हा एक दिवस पाऊस पडून गेल्यावर मुलांना पडवीत नेलं. पंधरा दिवस उलटून गेले हेते, मुलांनी केलेली निरीक्षणं पुढे सरकली होती. आता मुलांनी सांगितलं…
_आता तर वाफ्यात जास्त रोपं आली आहेत._
_शाळेची सगळी भिंत हिरवी दिसते._
_उंच झाड तर खूप काळ्या रंगाचं झालं आहे._
_झाडाची पानं मोठी झाली आहेत._
पडवीत दोनदाच नेलं होतं, पण नंतर जोवर पावसाळा होता तोवर मुलं येता जाता रोपं, झाडं, शाळेचा परिसर या सगळ्याचं निरीक्षण करायची, त्यातले बदल टिपायची आणि वर्गात येऊन सगळ्यांना सांगायची. मिळालेल्या संधीचं त्यांनी आपणहूनच एका समृद्ध अनुभवात रूपांतर केलं होतं.
असाच अनुभव बालगटातही आला. पाच ते सहा वयोगटातली ही मुलं. त्यांच्या वर्गात ‘वाहने’ हा घटक सुरू होता. त्या निमित्ताने मुलांना सांगितलं, तुम्हाला जे वाहन आवडतं, त्याचं चित्र काढा. कोणी रिक्षा काढली, कोणी स्कूटर. कोणी ट्रक, टेम्पो काढला, तर कोणी चक्क बोट काढली! रस्त्यावरच्या वाहनांबरोबर चित्रांमध्ये रस्त्यावरची रहदारी होती, सिग्नलही दिसत होते; तर बोटीसोबत पाण्यातून मासे प्रवास करत होते! मुलांनी आपापल्या कल्पना लढवल्या होत्या.
चित्र काढून झाल्यावर आम्ही खेळायला मैदानात गेलो. आता आपण कागदावर काढलेलं चित्र मुलांना मैदानावर तयार करायचं होतं. खेळता खेळता मुलांनी मैदानातली पानं, फांद्या, दगड, फुलं, सुतळ, बाटल्यांची बुचं अशा वस्तू गोळा केल्या आणि मग त्यातून सुरू झाल्या गाड्यांच्या रचना! हवं असलेलं साहित्य निवडण्याचं, हवं ते करून बघण्याचं स्वातंत्र्य मुलांना होतंच. त्यातूनच त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळाला आणि मग कुणाच्या गाडीची चाकं बुचांची झाली, तर कुणाची गाडी फुलांच्या चाकांनी धावायला लागली.
आपण स्वतः काढलेल्या चित्राची रचनेतून मांडणी करता आली याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता, तर स्वातंत्र्य आणि संधी दिली तर मुलं कायकाय करू शकतात, याचा प्रत्यय पुन्हा एकदा ताईंना आला होता.
डोसीबाई जीजीभॉय बालविहार शाळा.