28/04/2024
*गोताण्याचे भाग्य विधाते - स्वर्गवासी आदरणीय अण्णासाहेब*
व्यक्ती साधारण की असाधारण हे त्या व्यक्तीच्या कर्तृत्वातून सिद्ध होत असते. असा एक काळ धुळे जिल्ह्यातील गोताणे गावाच्या इतिहासाला अनाकलनीय स्वरूपाचे वळण देणारा निर्माण झाला ज्या काळात अण्णासाहेब नावाचे एक वादळ निर्माण झाले. सामान्य कुटुंबात जन्म घेतला म्हणून स्वतःला मर्यादांच्या बंधनात बांधणारे अनेक असतात, पण या सर्व बंधनांना झुगारून स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द मनात ठेवत सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, राजकीय, धार्मिक अशा सर्वच क्षेत्रांमध्ये स्वतःच्या अस्तित्वाचा ठसा उमटवत असताना अण्णासाहेबांनी आपल्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा कधीच सोडला नाही. गावात, गल्लीत, समाजातील विविध क्षेत्रांमध्ये जात असताना, लहान-थोर, गरीब-श्रीमंत कोणीही भेटला, त्याची जिज्ञासेने चौकशी करत अडलेल्या नडलेल्यांना योग्य मार्ग दाखवणारे, अण्णा आज सर्वांच्याच मनाला आपल्या विचारांनी प्रेरणा देताना दिसतात. अण्णांच्या जाण्याने समाज पोरका झाला, हे सत्य नाकारता येत नाही, पण अण्णांच्या विचाराने आणि अण्णांच्या कृतीने समाजाला एक नवीन दिशा मिळाली हे सुद्धा सत्य मान्य करावे लागते. त्रिमूर्ती विद्या प्रसारक संस्थेच्या माध्यमातून अण्णा साहेबांनी अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची उत्तम व्यवस्था केली. समाजातील अनेक होतकरू विद्यार्थ्यांच्या मागे अण्णा ठामपणे उभे राहिले. याचाच परिपाक म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत हटकर धनगर समाजाचे विश्लेषण करीत असताना नेहमीच एक वाक्य कानावर येते, गोताने उडाणे या परिसरात समाजात सर्वाधिक बुद्धिजीवी तरुणांचे अस्तित्व आहे, या अस्तित्वाचा निर्माता म्हणजेच स्वर्गवासी आदरणीय अण्णासाहेब.
कधीकाळी गोताने गावात वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये सुरू झालेल्या त्रिमूर्ती विद्या प्रसारक संस्थेच्या माध्यमातून सुरू झालेल्या शाळेत परिसरातील अनेक गावाचे भविष्य निर्माण झाले. आज समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये देशभरात विविध ठिकाणी जाऊन आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटविणारे अनेक तरुण अण्णांच्या विचारांचे पाईक आहेत, हे सांगताना आम्हाला अभिमान वाटतो. अण्णा तुम्ही सामान्य नव्हतेच आपलं असामान्य स्वरूपाचे व्यक्तिमत्व आपण समाजाच्या विकासासाठी गावाच्या उज्वल भविष्यासाठी बाजूला ठेऊन अहोरात्र कार्य करीत राहिले.
अण्णासाहेब आपण जे जग पाहिले, ते कसेही असले तरी आपण त्यात परिवर्तन करण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावले. आपण असामान्य प्रतिभेचे होते, हे आपल्याला माहीत असो वा नसो, पण आपण खरच दिव्य प्रतिभेचे होते, यात शंका नाही. माणूस कसा मोठा होतो, हे मी आपल्या कार्यातून अनुभवले. आपले कार्य असामान्य होते, यात शंका नाही. पण अशा अनेक आपल्या व्यक्तिमत्त्वातील बाबी आहेत ज्या अजून प्रकाशात नाहीत. त्या मी आपल्या विचारांचा पाईक म्हणून वेळोवेळी प्रकाशित करेलच. आपल्या विराट व्यक्तीमत्त्वाबाबत मला म्हणावेसे वाटते की,
"सतगुणांची खाण,
लाखातला वाण,
साऱ्या गावाचा प्राण,
अण्णा माझा!
समाजाची शान,
एकवचनी राम,
गावाची आन बाण अन् शान,
अण्णा माझा!"
आपल्या जाण्याने खरंच आम्ही पोरके झालो, दिशाहीन झालो. ही पोकळी कधीही भरून निघणारी नाही. पण आपल्या कार्यातून , विचारातून आपण नेहमी आमच्यासोबत राहणार यात शंका नाही.
अण्णासाहेब आपल्या स्मृतीस विनम्र अभिवादन.......