06/09/2025
*बालसभा वृत्तांत*
*जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा, काल्लेखेतपाडा या शाळेच्या बालसभेत मुलांच्या मागण्या आणि मान्यवरांचे आश्वासने*
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काल्लेखेतपाडा या शाळेत बालसभा अत्यंत आनंदी, लोकशाही पद्धतीने व उत्साहात पार पडली. या सभेसाठी गावातील मान्यवर, ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रकल्प अधिकारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
**उपस्थित मान्यवर*
श्री. बिभीषण पावरा – सामाजिक कार्यकर्ते(सरपंच)
श्री. ब्रिजलाल पावरा – ग्रामपंचायत सदस्य
श्री. राकेश पावरा – सहसंस्थापक, उलगुलान फौंडेशन)
श्री तेगा पावरा मुख्याध्यापक,
सौ. सेवी पावरा, श्री. रमेश वळवी , श्री. सुरेश पावरा –
*अध्यक्षस्थान*
या बालसभेचे अध्यक्षस्थान आमच्या शाळेची कुशाग्र बुद्धीची व आत्मविश्वासू विद्यार्थिनी *स्नेहा बटेसिंग पावरा* हिने स्वीकारले. मुलांच्या नेतृत्वगुणांना प्रोत्साहन मिळावे, मुलांनी स्वतःच्या हक्कांबद्दल व समस्यांबद्दल बोलावे हा हेतू यामागे होता.
*विद्यार्थ्यांचे विचार व मते*
बालसभा ही मुलांचा आवाज ऐकण्याचे व्यासपीठ असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी शाळेविषयी व विकासाविषयी आपली मते मांडली –
*कु. राणी पावरा* हिने शाळेत पुरेसे खेळ साहित्य व खेळाचे मैदान नसल्यामुळे त्याची तातडीने सोय करून द्यावी अशी मागणी केली.
*कु. अश्विनी पावरा* हिने पिण्याच्या पाण्याची सुविधा अजून वाढविण्याची गरज व्यक्त केली. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होते याकडे तिने लक्ष वेधले.
*कु. अमित पावरा* याने शाळेपर्यंतचा रस्ता खराब असल्याने पावसाळ्यात मोठी गैरसोय होते, त्यामुळे चांगल्या रस्त्याची सोय व्हावी अशी मागणी केली.
*कु. प्रेम पावरा* याने या बालसभेत भाग घेतल्याचा आनंद व्यक्त केला आणि अशा व्यासपीठामुळे मुलांनाही आपल्या शाळेविषयी बोलण्याची संधी मिळते असे सांगितले.
*मान्यवरांचे मनोगत*
श्री. राकेश पावरा (सहसंस्थापक, उलगुलान फौंडेशन) यांनी शाळेतील उपक्रमांचे व शिक्षकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांनी मुलांना ग्रामपंचायतीची रचना, कार्ये व जबाबदाऱ्या समजावून सांगितल्या. "बालसभा म्हणजे लोकशाहीची खरी पायाभरणी आहे. शाळा ही केवळ शिक्षणाचे केंद्र नसून गावाच्या विकासाची पहिली पायरी आहे," असे सांगून त्यांनी शैक्षणिक गुणवत्ता, आरोग्य सुविधा, भौतिक सुविधा व खेळ यावर भर द्यावा असे मत व्यक्त केले.
*श्री. बिभीषण पावरा* (सरपंच) यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या गांभीर्याने ऐकल्या. "मैदानाची गरज आम्हालाही पटते परंतु जागेअभावी थोडा अडथळा आहे; तरीही लवकरच नवा पर्याय शोधू," असे त्यांनी आश्वासन दिले. खेळ साहित्य खरेदीसाठी ग्रामपंचायतीमार्फत प्रयत्न करण्याचे व पिण्याच्या पाण्यासाठी हातपंप दुरुस्त करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच शाळेचे वातावरण व शैक्षणिक गुणवत्ता उत्कृष्ट असल्याचे नमूद केले.
*अध्यक्षीय मनोगत*
सभेच्या अध्यक्षपदी असलेल्या कु. स्नेहा बटेसिंग पावरा हिने बालसभा संपन्न करताना मनोगत व्यक्त केले. तिने म्हटले –
“बालसभेत मांडलेला प्रत्येक मुद्दा हा आम्हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे. वर्गखोली, पाण्याची सुविधा, रस्ते, शैक्षणिक साहित्य, खेळ साहित्य ही आमची खरी गरज आहे. या सुविधा मिळाल्यास आमचे शिक्षण आणखी गुणवत्तापूर्ण होईल.
*स्नेहाचे धडगावच्या पालकांना कळकळीचे आवाहन*
"माझ्या धडगावच्या पालकांनी मुलांना मजुरीसाठी स्थलांतर न करता शाळेत शिक्षण घेण्याची संधी द्यावी. शाळेत उपस्थिती टिकली तर आमच्या जीवनाला योग्य दिशा मिळेल.”
*फलश्रुती*
बालसभेत मुलांनी मांडलेले मुद्दे व मान्यवरांनी दिलेली आश्वासने यामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. शाळा, पालक, ग्रामपंचायत आणि सामाजिक संस्था या सगळ्यांची सांगड कशी घातली जाऊ शकते याचे उत्तम उदाहरण या बालसभेतून दिसून आले.