22/05/2021
आज २२ मे २०२१ , शनिवार रोजी सकाळी ११ ते दुपारी १ ह्या वेळेत खूटबाव ( ता.दौंड , जि.पुणे ) येथील भैरवनाथ शिक्षण मंडळाच्या भैरवनाथ विज्ञान महाविद्यालयाने मराठी विभाग , मराठी वाड़मय मंडळ शाणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष ह्यांच्या संयुक्त विद्यमाने नामवंत कवी अरुण म्हात्रे ( ठाणे ) ह्यांचा ' जाऊ कवितेच्या गावा ' हा लोकप्रिय कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर हे होते. संस्थेचे पदाधिकारी भाऊसाहेब ढमढेरे ( व्हाईस चेअरमन ) आणि अरुण थोरात (सर) ह्यांची प्रमुख उपस्थिती ह्या प्रसंगी होती.
'"ज्यांना मनुष्यत्वाचा वारा लागलेला असतो,त्यांना कवितेचा वारा लागलेला असतो ,"असे उद्गार ह्या प्रसंगी अरुण म्हात्रे ह्यांनी काढले. या कार्यक्रमात त्यांनी मंगेश पाडगावकर , विंदा करंदीकर , ग्रेस, शांता शेळके,ना.धों.महानोर, सुरेश भट , महेश केळुसकर अशा अनेक कवींच्या गाजलेल्या कविता त्या त्या कवींच्या शैलीत सादर केल्या. अलीकडेच ज्यांचं निधन झालं , ते प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार ह्यांना आदरांजली अर्पण करत त्यांनी ' अंदाज आरशाचा वाटे कसा असावा....' ह्या गझलेचं गायन केलं. तसेच सुरेश भटांसोबतच्या अनेक आठवणींना उजाळाही त्यांनी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिला. ग्रामीण कविता, कामगारांवरच्या कविता , ह्याबरोबरच तुमच्या माझ्या आयुष्यात घडणार्या अनेक घटनांमधून कविता कशी जन्म घेते , ह्याचाही उलगडा त्यांनी ह्या कार्यक्रमात केला.
प्रारंभी मराठी विभागाचे आणि मराठी वाड्मय मंडळाचे समन्वयक सा. प्रा. धनंजय भिसे ह्यांनीनी स्वागत आणि प्रास्ताविक केले , तर शेवटी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक , शारीरिक शिक्षण संचालक सा. प्रा. अनिल सोनवणे ह्यांनी आभारप्रदर्शन केले. सूत्रसंचालन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे एक सदस्य सा.प्रा.निखिल होले ह्यांनी केले.