17/06/2026
*बुलढाण्याची कन्या डॉ. वैष्णवी व्यवहारे इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात (नागपूर) प्रथम!*
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील सारोळा मारोती येथील *कु. डॉ. वैष्णवी संगीताताई मोहनराव व्यवहारे* हिने एमबीबीएस (MBBS) अंतिम वर्षाच्या परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. *नागपूर येथील प्रसिद्ध इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून* तिने १८०० पैकी १२९० गुण मिळवून महाविद्यालयात *प्रथम क्रमांक* पटकावला आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे.
प्राथमिक ते वैद्यकीय प्रवासाची प्रेरणादायी गाथा वैष्णवीचे बालपण सारोळा मारोती या ग्रामीण भागात गेले. लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान आणि जिद्दी असलेल्या वैष्णवीच्या जडणघडणीत तिच्या आजोबांचे मार्गदर्शन व संस्कारांचा मोठा वाटा राहिला आहे. तिने आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सारोळा मारोती येथून पूर्ण केले. पुढील *माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण तिने बुलढाणा येथील एडेड कनिष्ठ महाविद्यालयातून* घेतले. विशेष म्हणजे, इयत्ता दहावीच्या परीक्षेतही तिने महाराष्ट्र राज्यातील मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावून आपल्या असामान्य गुणवत्तेची चुणूक दाखवून दिली होती.
वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगून वैष्णवीने पहिल्याच प्रयत्नात 'नीट' (NEET) परीक्षेत यश मिळवले आणि नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश निश्चित केला. अत्यंत कठीण अभ्यासक्रम असलेल्या एमबीबीएसच्या अंतिम परीक्षेत सातत्य आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर तिने अव्वल स्थान प्राप्त केले. पुढील काळात उच्च वैद्यकीय शिक्षण घेऊन समाजाची निस्वार्थ रुग्णसेवा करावी आणि जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करावे, अशी इच्छा हितचिंतकांनी व्यक्त केली आहे.
सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव वैष्णवीच्या या अभूतपूर्व यशाबद्दल शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातून तिचे अभिनंदन केले जात आहे. *संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्यानंदजी देशपांडे, शाळा समिती अध्यक्ष श्री. प्रमोदजी देशपांडे,उपाध्यक्ष ॲड. श्री. तुषारजी महाजन साहेब, सचिव ॲड. श्री. रामानंदजी कवीमंडन साहेब, सभासद श्री. चेकेटकर साहेब, श्री. उबरहंडे सर,* तसेच *मुख्याध्यापक श्री. किंबहूने सर, उपमुख्याध्यापिका सौ. निकाळजे मॅडम आणि पर्यवेक्षक श्री. गंग्रस सर* यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी डॉ. वैष्णवीचे मनःपूर्वक अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. तिचे हे यश जिल्ह्यातील इतर विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.