22/08/2026
गुरुकुलात नियमीतपणे ग्रंथालय तासिका होते यासाठी तासिकेमध्ये रचना केलेली आहे .
मुलांना पुस्तक वाचनाची आवड लागावी म्हणून विविध उपक्रम घेतले जातात .
आज छात्र प्रबोधन अंकाची (पुस्तकांची ) एक आगळी - वेगळी, आकर्षक, कल्पक मांडणी वर्ग 6वी च्या भक्ती व तिच्या मैत्रिणींनी केली.🦚🦚📖📘
17/08/2026
नागपंचमी सणानिमित्त आज गुरुकुलातील मुलांनी झोका खेळण्याचा आनंद घेतला .
15/08/2026
सोनदरा गुरुकुलात आज स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला .
07/08/2026
💡सर्किट समजण्याचा विद्यार्थ्यांचा प्रवास 🪫
विज्ञानाच्या तासात विद्यार्थ्यांना तयार उत्तरं न देता शोधण्याची संधी दिली.
त्यांच्यासमोर सेल, वायर, LED, स्विच, ब्रेडबोर्ड अशी विविध साहित्ये ठेवली. कोणतेही मार्गदर्शन न करता फक्त एकच आव्हान दिले—
"LED कशी पेटेल? आवश्यक ते साहित्य निवडा आणि स्वतः प्रयत्न करून दाखवा."
सुरुवातीला अनेकांनी वेगवेगळे प्रयोग केले. काही वेळा LED पेटली नाही, काही जोडण्या चुकीच्या झाल्या. मग विद्यार्थ्यांनी स्वतःच प्रश्न विचारायला सुरुवात केली...
🔹 LED का पेटत नाही?
🔹 कोणता भाग जोडायचा राहिला?
🔹 विविध भाग बदलून पाहूया काय घडते ?
🔹 स्विचची भूमिका काय आहे?
प्रयत्न, चुका आणि निरीक्षण यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पूर्ण विद्युत सर्किट (Complete Circuit) ही संकल्पना स्वतः अनुभवली.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ LED पेटवली नाही, तर विचार करणे, समस्या सोडवणे, निरीक्षण करणे, सहकार्याने काम करणे आणि स्वतः ज्ञान निर्माण करणे ही कौशल्येही आत्मसात केली.
"Learning by Doing" याचा वर्गात सुंदर अनुभव आला.
"जे ज्ञान स्वतः शोधून मिळते, तेच सर्वाधिक काळ लक्षात राहते."
01/08/2026
स्व. डॉ. प्रज्ञा नितीन जोशी स्मृती कृतज्ञता सन्मान – आश्विन भोंडवे यांना प्रदान
भरगच्च सभागृह… प्रत्येक आसन भरलेले… शेकडो डोळ्यांत अपेक्षा… व्यासपीठावर समाजजीवन समृद्ध करणारे मान्यवर… आणि वातावरणात माणुसकीचा, कृतज्ञतेचा व संवेदनशीलतेचा स्पर्श.
हा केवळ सन्मान सोहळा नव्हता; हा माणूस म्हणून अधिक चांगलं जगण्याचा उत्सव होता.
यंदाचे सन्मानमूर्ती श्री. अश्विन सिंधू सुदाम भोंडवे यांचे मनोगत ऐकताना सभागृहातील अनेकांच्या डोळ्यांत अश्रू दाटले. संयम, साहस आणि धैर्य यांची व्याख्या पुस्तकांतून नव्हे तर स्वतःच्या जीवनातून लिहिणारा हा माणूस किती उंच असू शकतो, याची अनुभूती प्रत्येकाला आली. संकटांना शरण न जाता, त्यांना सामोरं जात जगण्याचा मार्ग त्यांनी दाखवला.
मा. जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डीले यांची मुलाखत हा सोहळ्याचा आणखी एक संस्मरणीय क्षण ठरला. प्रशासनातील जबाबदारी, संवेदनशीलता, प्रामाणिकपणा आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यांचा सुंदर संगम त्यांच्या विचारांतून अनुभवायला मिळाला. “जगणं नीट करण्यासाठी” माणसाने स्वतःशी प्रामाणिक राहणं किती आवश्यक आहे, हे त्यांनी अत्यंत साध्या पण प्रभावी शब्दांत मांडलं.
विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. उमाप सर यांनी माणूस म्हणून आपली खरी ताकद ही पदात नसून मूल्यांमध्ये असते, याची जाणीव करून दिली. कर्तव्य, शिस्त आणि करुणा यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या विचारांतून दिसला.
मा. माजी प्रधान जिल्हा न्यायाधीश श्री. सुनील वेदपाठक सर यांनी न्याय, नैतिकता आणि सामाजिक जबाबदारी यांचा वेध घेतला, तर मा. न्यायमूर्ती अंबादास जोशी सर यांच्या अनुभवी शब्दांनी सभागृहाला एक विचारमग्न शांतता दिली. त्यांच्या प्रत्येक वाक्यात आयुष्याचा गाढ अनुभव आणि मूल्यांची श्रीमंती होती.
या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीने आणि त्यांच्या विचारांनी हा सोहळा एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला.
सभागृहात उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीने या कार्यक्रमाला केवळ उपस्थिती दिली नाही, तर आपल्या शांत ऐकण्यातून, टाळ्यांच्या कडकडाटातून आणि भावनांच्या सहभागातून या सोहळ्याला अर्थ दिला.
स्व. डॉ. प्रज्ञा नितीन जोशी यांच्या स्मृतीत सुरू झालेला हा उपक्रम आज अनेकांच्या आयुष्याला स्पर्श करत आहे. हीच या स्मृतीची खरी कृतज्ञता आहे.
सन्मान हा व्यक्तीचा नसतो; तो मूल्यांचा असतो.
कार्यक्रम हा एका दिवसाचा असतो; पण त्यातून मिळालेली प्रेरणा आयुष्यभर साथ देत राहते असे आयोजक नितीन जोशी यांनी सांगितले .
30/07/2026
शालेय परीपाठामध्ये एकत्रित प्रार्थना म्हणताना विदयार्थी
30/07/2026
उद्या दिनांक 31 जुलै रोजी गुरुकुलाचे संचालक आश्विन दादा यांना नांदेड येथे स्व . डॉ . प्रज्ञा नितीन जोशी स्मृती कृतज्ञता सन्मान पुरस्कार भेटणार आहे तरी नांदेड परिसरातील गुरुकुल स्नेही यांनी आवर्जून कार्यक्रमास यावे ही विनंती .
वेळ - सायंकाळी 5.00 ते 8.00
स्थळ - शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह , नांदेड
29/07/2026
गुरुपोर्णिमा व वर्धापनदिनाचे औचित्य साधून गुरुकुलात
वृक्षपूजन आणि झाडांचा वाढदिवस साजरा
नानाजी देशमुखांचे ‘युगानुकुल नवरचना’ हे तत्त्व आणि सुदामकाका भोंडवे यांचे माती, झाडे, निसर्गावरील प्रेम या दोन्हीचा संगम होवून सोनदरा गुरुकुलात ‘सत्यवृक्ष पूजन’ या आधुनिक व्रताची निर्मिती गेल्या वर्षी करण्यात आली. ही प्रथा याही वर्षी पुढे चालू ठेवण्यात आली.
बुधवार दि. २९ जुलै २०२६ रोजी सोनदरा गुरुकुलामध्ये भाजपा युवा नेते सागर धस आणि त्यांच्या पत्नी डॉ. गौरी धस तसेच गुरुकुलातील ज्येष्ठ कार्यकर्ता जोडपे असलेले सौ. सुवर्णा आणि श्री. उल्हास पवार यांनी सत्यवृक्ष पूजन केले. भारतीय वृक्ष सोनचाफ्याचे रोप चौरंगावर ठेवून त्याची यथासांग पूजा करताना वेदातील वृक्षस्तुतीचे मंत्र म्हटले गेले.
यानंतर झालेल्या औपचारिक कार्यक्रमामध्ये नायगाव येथील वन्यपरिक्षेत्र अधिकारी श्री. अशोक काकडे, पाटोदा येथील तहसीलदार श्री. व्हि. बी. निलावाड तसेच युवानेते सागर धस व त्यांच्या पत्नी डॉ .गौरी धस सोनदरा गुरुकुलाचे कार्यकारिणी सदस्य तसेच पाहुणे उपस्थित होते.
याच कार्यक्रमात सोनदरा गुरुकुलाच्या वार्षिक कार्यवृत्त २०२५-२६चे प्रकाशन तसेच माजी कार्यकर्ते इंद्रसेन गोरे यांच्या प्रकल्पातील आठवणीचे पुस्तक याचेही प्रकाशन झाले
सर्वानी आपल्या मनोगतामध्ये सोनदरा गुरुकुलात होत असलेल्या पर्यावरणविषयक कामाचे कौतुक केले. गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त व्यक्तिगत सुधारणांच्या बरोबरच पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला.
यानंतर झालेल्या अभिनव वृक्ष वाढदिवसाच्या छोट्याशा कार्यक्रमात गेल्यावर्षी लावलेल्या व वाढलेल्या ७ झाडांना ७ विद्यार्थ्यांनी फुले व अक्षता वाहिल्या. स्नेहाचा धागा बांधला. सर्वांनी ‘सुदिनं सुदिनं जन्मदिनं’ गाऊन झाडांचा वाढदिवस साजरा केला. तसेच मान्यवरांनी आणि प्रत्येक वर्गाने नवीन रोपे लावली.
सोनदरा गुरुकुलामध्ये गेल्या दोन वर्षांपासून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे काम नियमितपणे सुरू आहे. पहिल्या वर्षी ६००हून अधिक व गेल्या वर्षी २०० वृक्षांची रोपे लावण्यात आली आहेत. यावर्षीच्या वृक्षारोपणाच्या कामास गुरुपौर्णिमेच्या सुमुहुर्तावर सुरुवात झाली आहे. अशा रितीने सोनदरा गुरुकुलामध्ये पर्यावरण स्नेहाची गुरुपौणिमा साजरी झाली.
28/07/2026
गुरुपोर्णिमा व वर्धापन दिनानिमित्त गुरुकुलात कार्यक्रमाचे आयोजन
🌱सोनदरा गुरुकुलाची स्थापना गुरुपौर्णिमेला औदुंबराचे रोप लावून चाळीस वर्षांपूर्वी 21 जुलै 1986 रोजी झाली होती.
🌱या दिनाचे औचित्य साधून कदंबवन परिसरात लावलेल्या आठशेहून जास्त वृक्षांचा वाढदिवस तसेच गेल्या वर्षी पासून सुरु केलेल्या सत्यवृक्ष पूजन या नवीन युगानुकुल व्रताची निर्मिती व आचरण करण्यात येणार आहे.
🌱याशिवाय वृक्षारोपण कार्यक्रम व वार्षिक कार्यवृत्ताचे प्रकाशन करण्यात येणार आहे .
गुरुकुल स्नेहींनी कार्यक्रमास उपस्थित राहावे ही विनंती .
🌱🌱🌱🌱🌱🌱
27/07/2026
काल या शैक्षणिक वर्षामधील पहिली पालक भेट संपन्न झाली . तब्बल सव्वा महिन्या नंतर आपल्या लाडक्या बाळाला भेटल्याचा आनंद पालकांच्या चेहऱ्यावर दिसत होता .
कार्यकर्त्यांशी मुलांच्या प्रगतीविषयी संवाद , एकत्रीत भोजन झाल्यानंतर गटशः मुलांचे सत्र झाले . यामध्ये वर्षभराचा अभ्यास विषयी संकल्प तसेच स्वतः ची आरसा फाईल पालकांना दाखवली .
पहिल्या पालक भेटीचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता .