08/03/2026
*'ती' माणूस, प्राणी की निर्जीव वस्तू?*
शीर्षक अगदी बरोबर वाचले आपण. आज महिला दिन आणि हे काय रडगाणे लावले असेही आपल्या मनात येईल. येऊद्या, किंबहुना यायलाच हवे. एक दिवस महिला दिन आनंदाने साजरा करायचा सोडून हे काय?
सांगते, त्याला कारणही तसेच आहे.
तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाल्यासारखे सगळीकडे वाटते. यात जास्त अवहेलना होते ती महिलेची. तिच्या देहाचे लचके तोडले जातात. तिथेही स्त्रियाचा सॉफ्ट टार्गेट म्हणून बळी पडतात.
अठराव्या शतकात कामगार चळवळीतून याची सुरुवात झाली. महिलांना दुय्यम वागणूक देऊन त्यांना प्राण्यासारखे वागवले जायचे. पुरुषांच्या तुलनेत अतिशय कमी वेतन त्यांना दिले जात होते.
त्यावेळेस तर कोर्टात एका न्यायाधीशांचे विचार होते की महिला ह्या माणूस नसून प्राणी आहे आणि त्यांच्याशी प्राण्यांसारखे वागावे. त्यांना कुठलाच अधिकार नाही.'
ज्यावेळेस महिलांनी मतदानाच्या अधिकाराची मागणी केली होती त्यावेळेस हे वाक्य होते.
शतकानू शतक गेले परंतु आजही काही समाजात महिला ही जनावरच आहे.
आजही काही पुरुषांच्या नजरेत स्त्री म्हणजे एक प्राणीच आहे. गाय, बकरी, गाढवासारखे ती देखील एक प्राणी आहे. आणि पुरुषांसाठी तिचा जन्म झालेला आहे. ती फक्त उपभोगण्याची वस्तू आहे. अशी मानसिकता आजच्या काळात देखील असताना कसा काय हा महिला दिन साजरा करावा हाच प्रश्न.
स्त्रीला प्राणी समजून, फक्त वस्तू म्हणून तिचा वापर करणे. एकीकडे तिला पडद्यात ठेवायचे आणि दुसरीकडे! वारेवा काय तर नियम आणि अशा नियमांना पवित्र मानने. कोणत्या स्तराची ही मानसिकता.
विशेष म्हणजे ह्या गोष्टींना मान्य करणारी स्त्री आणि येणाऱ्या पिढीवर लादणारी स्त्रीचं. सुधारक विचार या स्त्रियांना नकोत. आपण प्राणी आहोत, वस्तू आहोत ही भावना एवढी खोलवर त्यांच्या मनात रुतली आहे की त्या गोष्टीला विरोध करणे म्हणजे ते पाप समजतात.
मग नेमके स्त्रीमुक्ती म्हणजे काय ? हा महिला दिन साजरा करण्याचे कारण काय? जर आजही ते अठराव्या शतकातील विचार असतील तर मग आजही हा महिलादिन खऱ्या अर्थाने साजरा होऊ शकत नाही.
काही दिवसांपूर्वीचा माझा स्वतःचा अनुभव.
एका मॉलमध्ये गेल्यावर तिथल्या मालकाचे शब्द 'आमचे गुरु येत आहे. त्यांना महिलांची सावली चालत नाही.'
शी, किती मागास विचारसरणी म्हणावी ही.
यातून एक एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते , ती म्हणजे पुरुषी मानसिकता अशी आहे की स्त्री फक्त त्यांना उपभोगता यावी. तिचा हवा तसा वापर करता यावा.
तिने तिचे अधिकार मागू नये म्हणूनच तिला पडद्यात ठेवले जाते. तिला भावना नाही आणि असतील तरी त्या गृहीत धरल्या जात नाही.
अगदी बोटावर मोजण्या इतक्याच महिलांना त्यांचे अधिकार आहे किंवा त्यांना समानतेची वागणूक मिळते.
मात्र घरोघरी मातीच्या चुलीप्रमाणे प्रत्येक समाजात थोड्याफार प्रमाणात का असेना महिलेची अवहेलना होते. काही महिला त्यांच्या अधिकारांचा गैरवापर देखील करतात.
पुरुषांचा स्वतःच्या भावनांवर ताबा नाहीये. स्वतःच्या नजरेतील हवस कमी करू शकत नाही आणि स्त्रीला मात्र बंदिस्त करण्याची यांची मानसिकता आहे.
एवढेच काय परंतु त्या काही मंदिराच्या गाभाऱ्यात सुद्धा स्त्रीला प्रवेश देत नाही.
यावरून यांच्या दरिद्री मानसिकतेची कीव येते, राग नाही.
लग्न करायला स्त्री हवी. तुमची मुलं जन्म घालण्यासाठी सुद्धा स्त्री हवी ,उपभोगण्यासाठी श्री हवी आणि तिची सावली चालत नाही, तिची केस दिसू नये म्हणून तिने पडद्यातच राहावे. वा वा काय मानसिकता आहे.
ज्यावेळी ह्या सर्व गोष्टी बंद होतील. त्यावेळी वेगळा महिला दिन साजरा करण्याची गरज पडणार नाही.
एक दिवस बॅनर लावून महिला दिन साजरा करण्यापेक्षा हे जे अत्याचार आणि तिला वस्तू किंवा प्राणी समजण्याची मानसिकता बंद करा.
डॉ सुवर्णा पाटील
८/०३/२०२६