07/06/2021
*📗 वाईज अँड अदरवाईज*
✒️ सुधा मूर्ती
*🔖भाग : २*
*कसा हा मनुष्यस्वभाव..!*
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या वेळी मी चीफ सिस्टिम अनलिस्ट म्हणून काम करत होते. कामानिमित्त, प्रोजेक्टसाठी तेव्हा खूप फिरावं लागे. कधी जवळपासच्या एखाद्या शहरात नाही तर एखाद्या लहानशा खेड्यात जावं लागे. अनेकदा तर या कामासाठी मला सुट्टीच्या दिवशीसुद्धा प्रवास करावा लागे.
असाच एक शुक्रवार होता. या वेळी मोठा वीकएंड मिळणार म्हणून मी खुष होते. येत्या सोमवारी कसल्याशा सणानिमित्त सुट्टी होती. या तीन दिवसांच्या
सुट्टीचा फायदा घेऊन आम्ही बहिणींनी शिग्गावला आमच्या आजोळच्या घरी एकत्र
भेटायचं ठरवलं होतं.
हा शुक्रवार कधी एकदा संपतो असं मला झालं होतं. रविवारी पौर्णिमा
होती. मुद्दाम चांदण्यात स्नेहभोजनाचा कार्यक्रम आखलेला होता. उत्तर कर्नाटकमधल्या लोकांना या चांदण्यातल्या भोजनाचं फार कौतुक. आम्हाला सर्वांनाच काम संपवून निघण्याची घाई झाली होती, एवढ्यात कोणाचीतरी हाक आली. 'जरा माझ्या ऑफिसात येता का?'
माझ्या पोटात मोठा गोळा आला. ते आमचे साहेब होते. (माझ्या माहेरच्या नावाने त्यांनी हाक मारली होती.) त्यांच्या आवाजावरून काम तसं महत्त्वाचं
असणार, हे उघडच होतं. मी खरं तर निघालेच होते पण मग वाटेत त्यांच्या
ऑफिसपाशी थांबले.
'तुम्हाला असा त्रास द्यायला बरं वाटत नाही. पण तुमची आता तातडीने
गरज आहे,' असं म्हणून त्यांनी माझ्या हातात एक पत्र ठेवलं. येत्या दोन दिवसांच्या आत एका विशिष्ट प्रोजेक्टच्या स्थळी जाऊन मी भेट दिली पाहिजे, असं
त्यात नमूद केलं होतं.
'काही हरकत नाही, सर. मी जाऊन काय ते बघते,' मी म्हणाले. दिवसभर, आठवडाभर अविरत काम करत राहण्याची मला सवयच होती, त्यामुळे गावी
जाण्याचा बेत रद्द करावा लागला, तरी त्याचं विशेष काही वाटलं नाही मला. नाही
तरी कोणत्याही सणाउत्सवापेक्षा, संमेलनापेक्षा माझ्या कामातच मला जास्त आनंद मिळायचा.
दुसऱ्याच दिवशी मी त्या प्रोजेक्टच्या गावाला जायला निघाले. मी
जाऊन पोचले तेव्हा मध्यान्ह झाली होती, पण त्या गावात मात्र दिवस नुकताच सुरू
झाल्यासारखं भासत होतं. गाव तसं लहानच होतं. दुकानं नुकती उघडत होती,
लोक कामाला निघाले होते.
मी बसस्टँडवर उतरले आणि गावाच्या दिशेने चालत निघाले. इतक्यात
एक पोरसवदा तरुण धावतपळत माझ्यापाशी आला आणि म्हणाला : 'सॉरी मॅडम,
मला यायला उशीर झाला. मी तुम्हाला आणायला बसस्टँडवर येणार होतो.'
आमच्या क्लाएंटचा तो प्रतिनिधी होता. तो मला त्यांच्या ऑफिसात नेण्यासाठी
आला होता.
तेथून चालत काही मिनिटांतच आम्ही त्यांच्या ऑफिसात पोचलो. ऑफिस
तसं लहानच होतं. ते काही अत्याधुनिक वगैरे नव्हतं. जुन्या, दुरुस्त केलेल्या फर्निचरने ते सजवलेलं होतं. मात्र टापटिपीत ठेवलेलं होत. सगळे जण माझीच
वाट पाहत होते. मला बरं वाटलं, मी बसले. त्यांनी मला प्यायला गार ताक आणलं. ते पिऊन एकदम ताजंतवानं वाटलं. कामाला सुरुवात करण्यापूर्वी माझी एका नीटनेटक्या तरुणाशी ओळख करून देण्यात आली.
मला त्याच्याबरोबर काम करायचं होतं. तो चांगला तरतरीत होता. आत्मविश्वासाने बोलत होता. हुशार वाटला. त्याचं कामही चांगल्या दर्जाचं होतं. ते पाहून नाही म्हटलं तरी मला जरा आश्चर्यच वाटलं. त्याच्या काम करण्यातून
त्याची व्यावसायिकता जाणवत होती. मला लोकांनी त्याच्याविषयी असंही सांगितलं,
की त्याचं वाचन भरपूर होतं, किंबहुना त्यांच्या गावात त्याच्याइतकं वाचन कोणाचंही
नव्हतं.
त्यानं कामाची कागदपत्रं पण अगदी शिस्तशीर, नीटनेटकेपणे ठेवलेली
होती. त्यामुळेच आमचं काम फारच लवकर आटपलं. मी जायला निघाले. जाण्याआधी
आवर्जून त्याचं कौतुक केलं. त्यावर तो लाजला. मग त्याने मला चहासाठी घरी
येण्याचा खूप आग्रह केला. त्याचं घर जवळच होतं. त्याचं घरही फार नीटनेटकं ठेवलेलं होतं. चहा पिता पिता आमच्या गप्पा
सुरू झाल्या. आता गप्पा जरा वैयक्तिक पातळीवर आल्या होत्या. त्याने त्याच्या आईवडिलांविषयी सांगितलं. त्याच्या याआधीच्या नोकरीविषयी सांगितलं. मग त्याने पत्नीची आणि दोन वर्षांच्या मुलाची ओळख करून दिली. आपल्या पत्नीचं पाककौशल्य, तिचं गाणं, तिनं शाळेत असताना प्राप्त केलेलं यश, या सर्वांविषयी
तो कौतुकाने बोलत होता. मग त्याने आपल्या मुलाला हाक मारली. तोही लगेच
आला, आणि हाताची घडी घालून माझ्या बाजूला उभा राहिला. जणू काही त्याला
तसं उभं राहायला शिकवलं असावं, असा. मग त्याच्या वडिलांनी त्याला कविता
म्हणून दाखवायला सांगितली. त्यानेही आपल्या बोबड्या आवाजात लगेच कविता
म्हणून दाखवली.
मीही मान हलवून त्याचं कौतुक केलं. पण आपल्या मुलाचं फक्त एवढंसं
कौतुक झालं, ही गोष्ट त्या वडिलांना काही फारशी रुचली नसावी. तिथे समोरच
मुळाक्षरांचा जुना तक्ता टांगलेला होता. मग वडिलांनी आपल्या मुलाला त्यातील
सर्व मुळाक्षरे ओळखायला लावली. खरं तर या अशा गोष्टी करायला मुलांना मुळात
आवडत नाहीत, पण पालक नेहमीच आपल्या मुलांवर बळजबरी करतात. बिचारी
मुलं !
आमच्या यजमानांनी आपल्या घरात चालवलेला तो प्रकार आणखी अर्धा
तास तसाच चालू होता. शेवटी ते मूलही कंटाळलं, अस्वस्थ झालं. चिडलं.
त्याच्या आईच्या ते लक्षात आलं आणि ती त्याला स्वयंपाकघरात घेऊन गेली.
बहुधा त्याला चॉकलेट नाही तर बिस्किटाचा खाऊ बक्षीस म्हणून मिळाला असावा.
आपल्या मुलाची काहीतरी तारीफ ऐकण्याची त्या वडिलांची माझ्याकडून
अपेक्षा असल्याचं माझ्या लक्षात आलं. मग मी म्हटलं, 'तुमचा मुलगा त्याच्या
वयाच्या मानाने फारच हुशार आहे हं !'
'असणारच ! मी लहानपणापासूनच त्याला तशा पद्धतीनं वाढवलं आहे
ना!' तो माणूस अभिमानानं म्हणाला. आपल्या या दोन वर्षांच्या बाळाला याने
जन्मल्यापासूनच शिकवायला सुरुवात केली होती की काय, असं मला वाटलं.
'अच्छा ! म्हणजे मूल केवळ शिकवल्यामुळे इतकं हुशार होऊ शकतं ?'
मी विचारलं.
'नाही, नाही तसं नाही. आनुवंशिकतेचाही त्यात भाग असतोच. माझा
मुलगा माझ्यावर पडलाय.' त्या माणसाचा चेहरा अभिमानाने नुसता फुलून आला
होता. आता मला त्याच्याकडून आणखी ऐकायची इच्छा झाली. शिवाय माझी बस
सुटायला अजून तासभर अवकाश होता.
'तुम्ही कॉलेजात असताना फार हुशार विद्यार्थी असणार !' मी उगीचच खोदून चौकशी केली.
'हो, तर. मी शाळेत आणि कॉलेजात असताना नेहमीच पहिला क्रमांक
पटकावायचो,' त्याने उत्तर दिलं. तो स्वत:वर चांगलाच प्रसन्न दिसत होता.
'तुम्ही कुठल्या कॉलेजातून पदवी घेतली ?' मला बरीच उत्सुकता वाटू
लागली होती.
'मी बी व्ही बी इंजिनीअरिंग कॉलेजात होतो, हुबळीला.'
आता मी चमकले. हुबळी, ते इंजिनीअरिंग कॉलेज, सगळंच माझ्या परिचयाचं होतं. 'कुठल्या वर्षी ?' मी विचारलं.
'१९७२ साली मी पहिल्या क्रमांकानं इंजिनीअरिंगची परीक्षा उत्तीर्ण झालो.'
'मग... तुम्हाला सुवर्णपदक मिळालंच असेल, नाही ?" मी मुद्दाम विचारलं.
'हो ना... त्या वर्षीचं सुवर्णपदक मलाच मिळालं होतं, तो स्वत:वर खूश
होऊन म्हणाला.
आता मात्र तो काय प्रकारचा माणूस आहे. हे माझ्या चांगलंच लक्षात आलं. ते पाहून मात्र मला वाईट वाटलं.
'मला जरा तुमचं सुवर्णपदक बघायला मिळेल का?' मी विचारलं,
अचानक माझ्या त्या प्रश्नानंतर खोलीतील वातावरण बदललं. 'का बरं?
तुमचा माझ्यावर विश्वास नाही ?' आता त्याच्या आवाजात अनिश्चितता डोकवत होती.
'तसं नाही. तुम्ही १९७२ साली जे सुवर्णपदक मिळवलंत ते मला पाहायचंय.'
मी परत म्हणाले.
'ते फार बहुमोल आहे माझ्या दृष्टीने... म्हणून ते मी बँकेच्या लॉकरमधे
ठेवलंय,' तो म्हणाला.
'कोणती बँक ?' मी पण त्याचा पाठपुरावा केला.
'हा सगळा तपशील मी तुम्हाला का म्हणून द्यावा ?' त्याने चिडून विचारलं.
आता सगळं काही स्पष्ट झालं होतं. मला वाटतं, त्यालासुद्धा काय समजायचं ते समजलं असावं. त्याची अगत्यशीलता संपुष्टात आली होती. माझ्याही बसची
वेळ झाली होती. मलाही निघायला हवं होतं.
दाराकडे जाता जाता मी त्याला म्हटलं, 'तुमच्या बँकेचे किंवा तुमच्या
सुवर्णपदकाचे कोणतेही तपशील मला नकोत. माझा त्याच्याशी काही संबंधही नाही. फक्त ते सुवर्णपदक तुम्हाला मिळालं असणं शक्य नाही, याची मात्र मला
खात्री आहे.'
'तुम्ही इतकं खात्रीशीर रीत्या असं कसं काय म्हणू शकता?' आता तो
चांगलाच संतापला होता.
'कारण...' मी त्याला म्हणाले. ते बोलतानासुद्धा मला दु:ख होत होतं,
१९७२ सालचं सुवर्णपदक मला मिळालं होतं, आणि दर वर्षी फक्त एकच
सुवर्ण-पदक देण्यात येतं.'
माझ्या तोंडचे हे शब्द ऐकून तो आश्चर्याने थक्क झाला आणि माझ्याकडे एकटक पाहातच राहिला, काही न उमगल्यासारखा. मी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला हळूच विचारलं, 'तुम्ही इतके बुद्धिमान आहात. तुमच्या कामात वाकबगार
आहात. तुम्हाला खोटं बोलायची काय गरज आहे ? त्यानं काय साध्य होणार
आहे ?' एवढं बोलून मी वळले आणि पाठीमागे दार बंद झाल्याचा आवाज झाला.
हे एवढंच उत्तर मला मिळालं.
अनुवादक : लीना सोहोनी
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस