24/09/2026
कन्नड पॉलिटेक्निक येथे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.
इंजिनिअरिंगनंतर स्पर्धा परीक्षांचे माध्यमातून प्रशासकीय सेवेतही उज्ज्वल संधी - उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अपराजिता अग्निहोत्री
उपविभागीय पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री यांचे विद्यार्थ्यांशी संवादात्मक मार्गदर्शन; विविध प्रश्नांना दिली समर्पक उत्तरे.
_______________________________________
इंजिनिअरिंग हे केवळ तांत्रिक शिक्षणापुरते मर्यादित क्षेत्र नसून, या शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) तसेच केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) यांच्या स्पर्धा परीक्षांमध्येही उज्ज्वल करिअरच्या संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन डीवायएसपी अपराजिता अग्निहोत्री यांनी केले.
इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, कन्नड येथे आयोजित विशेष मार्गदर्शन कार्यक्रमात त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत होत्या. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक ज्ञानासोबतच विश्लेषण क्षमता, समस्या सोडविण्याची वृत्ती, तार्किक विचारशक्ती आणि निर्णयक्षमता विकसित होत असल्याने ही कौशल्ये प्रशासकीय सेवांच्या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासन, पोलीस सेवा, महसूल, अभियांत्रिकी तसेच विविध प्रशासकीय क्षेत्रांत काम करण्याच्या संधी आहेत. त्यामुळे इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनी आपल्या तांत्रिक शिक्षणाचा पाया मजबूत करत स्पर्धा परीक्षांकडेही व्यापक करिअर पर्याय म्हणून पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी अग्निहोत्री मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष हितगुज साधत त्यांच्या शैक्षणिक, करिअरविषयक आणि स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रश्नांना उत्तरे दिली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे विविध प्रश्न उपस्थित केले. अभ्यासाचे नियोजन, स्पर्धा परीक्षांची तयारी, वेळेचे व्यवस्थापन, व्यक्तिमत्त्व विकास, मुलाखतीची तयारी आणि प्रशासकीय सेवांमध्ये जाण्यासाठी आवश्यक कौशल्ये याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्यांच्या संवादात्मक आणि प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग शिक्षणानंतरच्या विविध करिअर संधींची व्यापक दृष्टी मिळाली. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी जागरूकता निर्माण होण्यासोबतच आत्मविश्वासालाही चालना मिळाली. यानंतर प्रमुख पाहुण्यांचे हस्ते श्रींच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्र. प्राचार्य संतोष मतसागर, विभागप्रमुख प्रा. महेंद्रसिंह राजपूत, प्रा. प्रमोद गडपायले, प्रा. नवनाथ चव्हाण प्रा. श्रीराम काळे, प्रा. गोपाल दाभाडे प्रा. इकराम पठाण, प्रा. आशिष गावंडे, सर्व प्राध्यापक- कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.