28/02/2026
देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
विज्ञानातील महिलांच्या योगदानावर विशेष भर
आटपाडी : दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी दि अटपाडी एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय, आटपाडी येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावर्षीचा विषय “Women in Science: Catalysing Viksit Bharat” असा होता.
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या अग्रणी महाविद्यालय योजना अंतर्गत महाविद्यालयातील विज्ञान मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी बळवंत महाविद्यालय, विटा येथील रसायनशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख निवृत्त वरिष्ठ प्राध्यापक प्रा. डॉ. गणपतराव मुळीक यांनी प्रमुख व्याख्यान दिले. त्यांनी विज्ञानातील महिलांचे मोलाचे योगदान, संशोधन क्षेत्रातील त्यांची कामगिरी तसेच विकसित भारताच्या उभारणीत विज्ञानाची निर्णायक भूमिका, विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांचे विचार विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व दिशादर्शक ठरले.
कार्यक्रमात “विज्ञानातील महिलांचे योगदान” या विषयावर विद्यार्थिनी प्रियांका अनुसे व वैष्णवी सांगोलकर यांनी मनोगते व्यक्त करून विविध महिला शास्त्रज्ञांच्या कार्याचा प्रभावी आढावा सादर केला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले यांनी भूषविले. त्यांनी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासून नवोपक्रम व संशोधनाची कास धरावी, असे प्रतिपादन केले. यावेळी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या अग्रणी महाविद्यालय योजना समन्वयक प्रा. डॉ. किशोर जाधव, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. दादासो काळे हे ही उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन विज्ञान मंडळाचे अध्यक्ष प्रा. युवराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमास विज्ञान मंडळातील सर्व सदस्य तसेच महाविद्यालयातील विज्ञान विभागातील सर्व वरिष्ठ प्राध्यापक व प्राध्यापिका व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.