01/09/2026
22 वा वर्धापन दिनानिमित्त....
*गुणांना दिशा, कलेला व्यासपीठ; ‘स्वरश्री’च्या तालमीत घडताहेत नवे कलावंत!* *अंजनगाव सुर्जीच्या सांस्कृतिक क्षेत्रात *‘SMART’च्या 22 वर्षांच्या संगीतसेवेचा प्रेरणादायी ठसा*
अनाथ व दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत संगीत शिक्षण; बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत संगीत साधनेची संधी
*अचलपूर :* संगीत ही केवळ कला नसून व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास, संस्कार आणि मानसिक समृद्धीचे प्रभावी माध्यम आहे. याच व्यापक उद्देशाने कल्पतरू बहुउद्देशीय संस्थेअंतर्गत *स्वरश्री संगीत अकादमी* ची स्थापना १ सप्टेंबर २००४ रोजी करण्यात आली. गेल्या २२ वर्षांपासून संगीत शिक्षण व संगीतसेवेचा हा प्रवास अखंड सुरू असून, अनेक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य दिशा देत गुणी गायक व वादक घडविण्याचे कार्य अकादमी करीत आहे.
१ सप्टेंबर २०११ रोजी वर्धापन दिनाचे औचित्य साधून *‘स्वरश्री म्युझिक अकॅडमी फॉर रिसर्च अँड ट्रेनिंग (SMART)’* या नावाने अंजनगाव सुर्जी येथे अकादमीची नव्याने सुरुवात झाली. प्रारंभी गायन—इयत्ता ११वी व १२वी, बी.ए., एम.ए., हार्मोनियम, तबला, ऑक्टोपॅड आणि कीबोर्ड या विषयांचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले.
अकादमीचे संस्थापक, आद्य संचालक व मार्गदर्शक प्रा. श्री. श्रीकांत नानासाहेब पवार हे विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (JRF) प्राप्त असून एम.ए. संगीत, एम.ए. हिंदी, बी.एड., NET व D.N.Y.S. अशा विविध शैक्षणिक पात्रतांनी संपन्न आहेत. संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, संशोधनवृत्ती आणि विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण ओळखून त्यांना योग्य दिशा देण्याची त्यांची तळमळ यामुळे *‘SMART’* च्या कार्याला सातत्याने विस्तार मिळाला. संगीत शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच शिस्त, संस्कार, आत्मविश्वास आणि कलात्मक दृष्टिकोन असलेली भावी पिढी घडविण्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे.
अकादमीच्या आजच्या वाटचालीत *संचालिका सौ. अश्विनी श्रीकांत पवार (एम.ए. संगीत; संगीत विशारद)* यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. प्रा. श्रीकांत पवार यांच्या अर्धांगिनी म्हणून कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळतानाच त्या *‘गुरू’* म्हणून विद्यार्थ्यांना संगीताचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देत आहेत. विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधून त्यांच्या कलागुणांना वाव देणे, नियमित सराव करून घेणे आणि सादरीकरणासाठी प्रोत्साहन देणे, या माध्यमातून त्या अकादमीच्या संगीतसेवेला भक्कम आधार देत आहेत.
अकादमीच्या सुरुवातीच्या काळात आदरणीय *श्री. रडके सर* यांनी अकादमी साठी जागा उपलब्ध करून देत मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता अवघ्या तीन वर्षांत जागेची कमतरता जाणवू लागली. त्यामुळे अकादमीचे वर्ग देवगिरे वाड्यात स्थलांतरित करण्यात आले.
*शास्त्रशुद्ध शिक्षणासह व्यक्तिमत्त्व विकासावर भर* :
गायन-वादनाचे प्रशिक्षण देतानाच विद्यार्थ्यांना प्रमाणित आणि शास्त्रशुद्ध संगीत शिक्षण मिळावे, यासाठी अकादमीत *अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय* मंडळाच्या विविध संगीत परीक्षांचे अभ्यासक्रम शिकविले जातात. अभ्यासक्रमानुसार नियमित मार्गदर्शन, सराव आणि परीक्षेची तयारी करून घेतली जाते.
संगीत शिकण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा, आत्मविश्वास आणि सादरीकरण कौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने विविध सांगीतिक स्पर्धांमध्ये सहभाग, संगीत शिबिरे, कार्यशाळा आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले. कोरोना महामारीच्या काळातही ऑनलाइन पद्धतीने संगीत शिक्षणाची सेवा अविरत सुरू ठेवण्यात आली.
जुलै २०२३ मध्ये अकादमीचे स्थलांतर *स्वामी समर्थ केंद्राच्या मागील गल्लीत, सारडा कॉलेजजवळ, देवगिरे नगर, दर्यापूर रोड* येथे करण्यात आले. आजही याच ठिकाणी संगीत साधना व सेवा अखंडपणे सुरू आहे.
*बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत संगीताचा स्वरमय सेतू*
‘स्वरश्री’ची विशेष बाब म्हणजे संगीत शिक्षण केवळ लहान मुलांपुरते मर्यादित न ठेवता ज्येष्ठ वयोवृद्धांसाठीही विशेष बॅच नियमितपणे घेतल्या जातात. ज्येष्ठांसाठी हार्मोनियम तसेच गायन—भजन व अभंग यांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे वयाची अट न ठेवता प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार संगीत शिकण्याची आणि संगीत साधनेचा आनंद घेण्याची संधी मिळत आहे.
सामाजिक बांधिलकी जपत अनाथ तसेच दिव्यांग मुला-मुलींसाठी अकादमीत मोफत संगीत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आर्थिक किंवा सामाजिक परिस्थितीमुळे संगीत शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आपल्या कलागुणांना वाव देण्याची संधी यामुळे मिळत आहे.
आज ‘स्वरश्री’च्या माध्यमातून अनेक बालकांमधील सुप्त कलागुण विकसित होत असून अनेक गुणी गायक व वादक घडत आहेत. बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत विविध वयोगटांना संगीताच्या माध्यमातून जोडत अंजनगाव सुर्जीच्या सांस्कृतिक क्षेत्राला समृद्ध करण्याचे कार्य अकादमी सातत्याने करीत आहे.
*SMART* ची २२ वर्षांची ही वाटचाल म्हणजे केवळ एका संगीत अकादमीचा इतिहास नसून, संगीत साधनेच्या माध्यमातून संस्कार, आत्मविश्वास आणि कलागुणांची जोपासना करून समाजासाठी गुणी कलावंत घडविण्याचा अखंड ध्यास आहे.