21/08/2026
ग्रामीण जागरूकता कार्यानुभव (रावे) कार्यक्रमांतर्गत पी. आर. पोटे पाटील कृषी महाविद्यालय, अमरावती येथील विद्यार्थ्यांनी कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूर, (बडनेरा), जि. अमरावती येथे शैक्षणिक भेट दिली. विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, विविध कृषीविषयक उपक्रम तसेच शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणारे विविध तंत्रज्ञान व मार्गदर्शन यांची प्रत्यक्ष माहिती मिळावी, या उद्देशाने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कृषी विज्ञान केंद्रातील उद्यानविद्या विषयाचे तज्ज्ञ श्री. प्रफुल्ल महल्ले यांनी विद्यार्थ्यांना कृषी विज्ञान केंद्राची उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. तसेच त्यांनी जैवखतांचे महत्त्व, विविध प्रकारची जैवखते व त्यांची निर्मिती प्रक्रिया, मृदा परीक्षणाचे महत्त्व व प्रक्रीया तसेच मृदा सुपीकता व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी कृषी विज्ञान केंद्रातील जैवखत निर्मिती केंद्र, गांडूळखत निर्मिती केंद्र, मृदा परीक्षण प्रयोगशाळा तसेच पशुपालन व दुग्धव्यवसाय केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली. संबंधित केंद्रांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध प्रक्रिया, त्यांचे उपयोग आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे याबाबत विद्यार्थ्यांनी माहिती घेतली.