19/08/2026
*स्वातंत्र्य दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार...*
अकलूज : शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, शंकरनगर-अकलूज येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
12वीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसह NEET, CET, JEE तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा *आदरणीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील* यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर उच्च शिक्षणाच्या विविध क्षेत्रांत यश संपादन करून शाळेचे, पालकांचे तसेच परिसराचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे प्रोत्साहन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यांचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे, पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, विद्यार्थ्यांमध्येही नव्या उमेदीने पुढे जाण्याची प्रेरणा निर्माण झाली.
कार्यक्रमास संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.