19/04/2023
भटकंती कट्ट्यावर अवतरली चिमुकली दुनिया ....
खसखशीच्या आकाराची फुलपाखरांची अंडी....
अंगठ्याच्या नखाइतके चिमुकले फुलपाखरू....
सफाईदारपणे कात टाकणारे किटक....
स्वत:च्या जिभेने डोळा स्वच्छ करणारी गेको....
गिरगाव चौपाटीवर अंडी घालणारा शंख...
जगातला सर्वात मोठ्या आकाराचा पतंग....
हे सगळे निसर्गातलेच पण अनेकदा आपल्या साध्या डोळ्यांना न दिसणारे घटक काल अवतरले होते ठाण्याच्या भटकंती कट्ट्यावर, कारण या चिमुकल्या जिवांचे छायाचित्रण करून जगाला ओळख करून देणारा अनुभवी छायाचित्रकार युवराज गुर्जर हा होता कालच्या भटकंती कट्ट्याचा मानकरी.
गेली ३०-३५ वर्षे भारतातील विविध अभयारण्यांमधे, राष्ट्रीय उद्यानात, नैसर्गिक अधिवासामध्ये भटकंती करुन ' मॅक्रो फोटोग्राफी ' या क्षेत्रात स्वत:चा मानदंड निर्माण करणारा युवराज गुर्जरने काल भटकंती कट्ट्यावर त्याच्या छायाचित्रांचा खजिना खुला केला आणि आलेले प्रेक्षक थक्क झाले. निसर्गातील जीवसृष्टी पैकी 3/4 भाग हा कीटकांनी व्यापलेला आहे पण त्यातील 3/4 भाग आजही आपल्यासाठी अज्ञात आहे हे कालचा युवराजचा स्लाइड शो बघताना पटलं. महाविद्यालयीन काळात बी. एन. एच. एस. च्या निसर्ग शिक्षण शिबीरामुळे युवराज निसर्ग निरीक्षकाकडे कसा ओढला गेला, या सुरवातीच्या काळात (कै) उल्हास राणे, बिभास आमोणकर, डॉ. अरूण जोशी यांच्यासारखे मार्गदर्शक लाभल्याने या विषयाबाबतची रुची कशी वाढली हे युवराजने कृतज्ञतापूर्वक सांगितले. रोल कॅमेऱ्यापासून ते मिररलेस कॅमेऱ्यापर्यंत फोटोग्राफीमधे घडलेल्या परिवर्तनाचा सहभागी- साक्षिदार असलेल्या युवराजने आपल्या अप्रतिम छायाचित्रांमधून मॅक्रो फोटोग्राफीची तत्थे - तत्व आणि रहस्यं उलगडली. विषारी सापांपासून ते कड्याच्या टोकावर उमललेल्या कंदील पुष्पा पर्यंत फोटोग्राफी करताना प्रसंगी थोडा धोका सावधपणे कसा पत्करावा लागतो ते युवराजने स्वानुभवातून सांगितले. तुमच्याकडे कोणत्या कंपनीचा, किती अत्याधुनिक कॅमेरा आहे यापेक्षा तुम्हाला वन्यजीवांची किती माहिती आहे, तुमच्या डोक्यात आधी फ्रेम तयार झाली आहे का या गोष्टी कशा महत्वाच्या आहेत हे युवराजने आपल्या काही अनोख्या छायाचित्रांमधून स्पष्ट केलं. नंतरच्या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात इतकी वर्षे जंगलात फिरून आणि हजारो फोटो काढून ही एखादी नवीन प्रजाती का शोधली नाही? या प्रश्नाचे उत्तर देताना ' मी अकॕडमीक स्कॉलर किंवा संशोधक नाही, मी निसर्ग प्रेमी छायाचित्रकार आहे, निसर्ग शिक्षण - जागृती - प्रसार हे माझं काम आहे, संशोधनासाठी लागणारा वेळ मी देऊ शकत नाही ' असे मोकळेपणाने सांगून युवराजने आपली भूमिका स्पष्ट केली. निसर्ग छायाचित्रण आणि गिरीभ्रमणातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व ( आणि युवराजचे मार्गदर्शक - मित्र !! ) बिभास आमोणकर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.त्यांनी युवराजने सुरवातीपासूनच वन्यजीव छायाचित्रणातील ' मॅक्रो फोटोग्राफी ' ची अनवट वाट निवडून , त्या बिकट वाटेची वहिवाट तयार केल्याबद्दल कौतुकोद्गार काढले.
चक्रम हायकर्सच्या सहयोगाने दिवाकर साटम आणि त्याचे सहकारी भटकंती कट्टा ठाण्यातील मंगला हायस्कूल मध्ये आयोजित करतात, जिथे भटकंतीचे विविध पैलू आणि भटक्यांचे भन्नाट अनुभव उलगडले जातात. लोकवर्गणीतून चालणाऱ्या या उपक्रमाला गरज आहे ती सशक्त आर्थिक पाठबळाची, ठाण्यातील पर्यटन प्रेमींनी मनावर घेतल्यास हा कट्टा अधिक दमदारपणे आपली वाटचाल करत राहील.
-मकरंद जोशी
# भटकंती कट्टा ठाणे, Bhatkanti Katta Thane