27/09/2026
‘नशामुक्त युवा – व्यसनाला नकार, जीवनाला होकार’ पथनाट्याचे प्रभावी सादरीकरण
एम. एस. इंग्लिश मीडियम स्कूल, शिरवळ यांच्या वतीने ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत ‘नशामुक्त युवा – व्यसनाला नकार, जीवनाला होकार’ या संदेशावर आधारित प्रभावी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले.
नशेपासून दूर राहून निरोगी, सक्षम आणि जबाबदार युवा घडविण्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात शाळेच्या सकाळच्या प्रार्थना सभेत करण्यात आली. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसमोर पथनाट्य सादर करून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीविषयी जागृती निर्माण करण्यात आली.
यानंतर संध्याकाळी पोलीस स्टेशन, शिरवळ यांच्या गणपती विसर्जन कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवाजी चौक, शिरवळ येथे पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी पोलीस स्टेशनचे अधिकारी इंगळे साहेब, त्यांचे सहकारी तसेच शिरवळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या प्रभावी अभिनयातून व्यसनाचे दुष्परिणाम आणि व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
त्यानंतर रात्री ८ वाजता दिग्विजय गणेश मंडळ, शिरवळ येथे पथनाट्य सादर करण्यात आले. मंडळाचे पदाधिकारी, नागरिक तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती जोशी मॅडम यांची उपस्थिती लाभली. त्यानंतर केदारेश्वर मंडळ, शिरवळ येथेही पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
यानंतर सत्यजित मंडळ, शिरवळ येथे पथनाट्य सादर करण्यात आले. मंडळाचे पदाधिकारी तसेच देखावा पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
अशा प्रकारे एका दिवसात शिरवळ परिसरातील विविध ठिकाणी पथनाट्याचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी ‘नशामुक्त युवा – सक्षम युवा; सक्षम युवा – विकसित भारताचा पाया’ हा महत्त्वपूर्ण संदेश समाजापर्यंत पोहोचविला. विद्यार्थ्यांच्या प्रभावी अभिनयातून व्यसनमुक्तीचा संदेश जनमानसात रुजविण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला.
सदर पथनाट्याची संकल्पना व रंगमंचीय मांडणी विद्यालयाचे सहशिक्षक श्री. प्रकाश धनवडे सर यांनी अतिशय प्रभावीपणे केली. या पथनाट्यात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या अभिनयातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.