17/05/2026
अभ्यासासाठी वाजतो शिस्तीचा भोंगा!
खांडगाव ग्रामपंचायतीचा विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम
संगमनेर (प्रतिनिधी ):-खांडगाव (ता. संगमनेर) ग्रामपंचायतीने शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी एक आगळावेगळा आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले आहे. 'अभ्यासाचा भोंगा' या उपक्रमामुळे विद्यार्थी वेळेवर घरी परतून मोबाईल व टीव्ही बंद करून नियमित अभ्यास करत असल्याचे सकारात्मक चित्र सध्या गावात दिसून येत आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत खांडगाव ग्रामपंचायतीने विविध विकासात्मक उपक्रम हाती घेतले असून, गाव हळूहळू विकासाचे मॉडेल ठरत आहे. याच अभियानाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ग्रामपंचायतीने हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
गावातील विद्यार्थी संध्याकाळच्या वेळेत मोबाईल, टीव्ही किंवा खेळामध्ये अधिक वेळ घालवत असल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीवर भोंगा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हा भोंगा बसवण्यात आला आहे. दररोज नेमक्या संध्याकाळी सात वाजता तो वाजवला जातो.
या भोंग्याचा आवाज सुमारे दोन किलोमीटर परिसरात ऐकू येतो. त्यामुळे गावात किंवा आसपास खेळत असलेले विद्यार्थी तत्काळ घरी परततात. सात वाजताच घरातील मोबाईल आणि टीव्ही बंद करून विद्यार्थी किमान दोन तास अभ्यासाला बसत आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, वेळेचे नियोजन आणि अभ्यासाची गोडी निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. या उपक्रमाचे कौतुक केवळ ग्रामस्थच नव्हे, तर पालकवर्गाकडूनही होत आहे. भोंग्यामुळे मुलांना नियमित अभ्यासाची सवय लागली असून घरातील वातावरण अधिक शिस्तबद्ध झाले आहे
"तालुक्यात खांडगाव ग्रामपंचायतीने पहिल्यांदाच असा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे. 'अभ्यासाचा भोंगा' या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना निश्चितच चांगला फायदा होणार असून, त्यांच्यामध्ये अभ्यासाची आवड निर्माण होईल.
-प्रवीण सिनारे (गटविकास अधिकारी)
"मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत कार्यालयावर हा भोंगा बसवण्यात आला आहे. दररोज संध्याकाळी सात वाजता भोंगा वाजवला जातो. त्याचा आवाज दोन किलोमीटरपर्यंत जात असल्याने विद्यार्थी त्वरित अभ्यासाला बसतात. पालकांनाही याबाबत सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संपूर्ण तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी असा उपक्रम राबवणारी खांडगाव ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे."
ॲड. विकास गुंजाळ (सरपंच, खांडगाव)
"पूर्वी संध्याकाळी खेळून आल्यावर टीव्ही पाहण्यात किंवा मोबाईलवर गेम खेळण्यात खूप वेळ जायचा. पण आता सात वाजता भोंगा वाजला की आम्हाला समजते की अभ्यासाची वेळ झाली आहे. आम्ही लगेच टीव्ही, मोबाईल बंद करतो आणि अभ्यासाला बसतो. या भोंग्यामुळे आमची अभ्यासाची एक छान सवय झाली आहे."
कु.मोनिका गुंजाळ (विद्यार्थिनी इयत्ता ७ वी)