03/04/2020
कदाचित लॉक डाऊन संपेल पण तरीही या आजाराला तोंड द्यायचं असेल तर आपण सर्व नागरिकांना वैयक्तिकरीत्या स्वच्छता आणि अंतर राखून पुढे याचा प्रादुर्भाव थांबवावा लागणार आहे. कारण अजूनही ठोस काही उपचार किंवा लस नाही आहेत. एक माध्यम आणि संज्ञापन अभ्यासाचे विद्यार्थी म्हणून आमच्या बाजूने हा थोडासा विचारप्रपंच. कारण पुढे, जर जास्त वेळ या महामारीला तोंड द्यायची वेळ आलीच तर, मीडिया मधून काळजी कशी आणि कशाप्रकारे घ्यावी यावर सर्व स्तरातून बोलणं होत आहे, पण प्रशासना संदर्भात काही विचार करणं गरजेचं आहे... कदाचित या २१ दिवसांत प्रशासनाकडून याच, किंबहुना याहून जास्त, अधिक योग्य मुद्दयांवर काम आणि सक्षमीकरण सुरू असेलच. यात अजूनही विचारांची आणि बदलाची गरज आहेच. समाज माझ्यापासून सुरु होतो म्हणूनच मी काळजी घेइनच पण त्या पुढेही, एकत्र राहून, एकमेकांना सांभाळत संकटावर मार्ग काढुयात…
अभिजीत शेलार : ८१४-९७२-८३४८
हर्षद काळे : ८३९-०४२-३६३१
आज ह्या महामारीला तोंड द्यायचं असेल तर, ते फक्त आणि फक्त माणुसकी आणि सहकार्य भावनेतुनचं शक्य आहे. लोकशाहीचे हक्क आणि मूल्य जपूनच… ते मजबूत ठेवूनच आणि कुठलाही आकस न ठेवता!
१]. जर गाव, तालुक्याची ठिकाण, नीम-शहर, मोठी शहर यांचा त्यांच्या त्यांच्या हिशोबाने, घरांची संख्या आणि सरासरीनुसार तसेच त्या घरात राहणाऱ्या नागरिकांची संख्या, या निहाय section केले तर, गर्दी रोखता येईल. आणि गरजेच्या वस्तूंवर, तसेच त्याच्या पुरवठ्यावर ताण येणार नाही. लोक निर्धास्तपणे घरात थांबतील, साठेबाजीला आळा बसेल, दरवाढ होणार नाही.
पण, हे स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच त्या त्या ठिकाणच्या नगर-रचनेचा अभ्यास करून केलं तर, 21 च काय पण, देशासाठी अजूनही जास्त वेळ घरात बसावं लागलं तर, संयमाने आणि समजुतीने नागरिक जबाबदारीने घरी थांबतीलच हा विश्वास आहे. पण, त्यासाठी ग्राउंड लेव्हलवर नियोजन अंमलात आणलं गेलं पाहिजे.
२]. आता अशी विभागणी केल्यावर, त्यात त्या section मध्ये किती आणि कोणत्या स्वरूपाची किराणा मालाची दुकान, औषधांची दुकान, दूध विक्री, पिठाच्या गिरणी, भाजीपाला, कचरा व्यवस्थापन, ATM, छोटे खासगी दवाखाने याची विभागणी स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रशासनाला करता येईल. म्हणजे त्याच नियमन करता येईल, अनावश्यक गर्दी कोणी करणार नाही. कुठेही ताण येणार नाही, कोणीही साठेबाजीला धजावणार नाही, आणि काही ठिकाणी धान्य चढ्या भावाने विकल जातंय तेही थांबेल, खूप ठिकाणी पिठाच्या गिरणी बंद आहेत कारण सगळेच pack आटा नाही विकत घेऊ शकत... या सगळ्यामुळे संधीसाधूपणा आटोक्यात येईल.
३]. या महामारी च्या निमित्ताने आरोग्य व्यवस्था सक्षम करता येईल.
म्हणूनच,
१.या विभागवार रचनेनुसार तिथले डॉक्टर्स, त्यांचा स्टाफ, तिथली सोई-सुविधा याची माहिती आणि ते सुरळीत चालू राहतील याची खात्री घ्यायला हवी.
२. तसेच आता खासगी आणि सरकारी दवाखान्यानी एकत्र यायाची वेळ आहे. आधीच उपचार चालू असणाऱ्या रुग्णांना गैरसोय होणार नाही, याची सुद्धा खात्री बाळगायला हवी.
वृद्ध, गर्भवती आणि बालकांच्या औषध आणि लस पुरवठ्याच्या बाबतीत कोणतीही संदिग्धता यायला नको.
३. टेस्टिंग यंत्रणा जस जशी विकसित होत जाईल तशी त्याची या विभागवार रचना केली तर, नागरिकांना आणि प्रशासनाला सोयीचं ठरेल आणि ताण येणार नाही, परिस्थिती हाताबाहेर जातेय अस वाटलंच तर, त्यावर नियंत्रण हे या नियोजनामुळे आधीच असेल.
४. डॉक्टर्स, नर्सेस, वोर्डबॉय, अम्ब्युलन्स चालक, स्वछता कर्मचारी आणि विशेष म्हणजे आशा अंगणवाडी कर्मचारी यांच्या स्वच्छतेची आणि खाण्या-पिण्याची तसेच दैनंदिन प्रवास आणि सुरक्षेची योग्य ती काळजी घ्यायला हवीय त्यानुसार त्यांना संसाधन दिली गेली पाहिजेत.
५. या सगळयांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर हवा.
६. या निमित्ताने नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेच्या सवई आणि जबाबदारी याची आता तरी जाणीव स्वतःची स्वतः करून घेणं अनिवार्य आहे. म्हणजेच आता तरी इथे तिथे कचरा फेकण, थुंकण, कचरा पसरवण, हे स्वयंस्फुर्तपणे थांबेल अशी खात्री आहे. म्हणजे स्वतःचा विचार करता करता आपण आपल्या शेजारच्याचा आणि किंबहुना समाजाचा विचार करू लागू.
७. कोरोना बाधित तसेच उपचारानंतर आता बरे होऊन घरी आलेल्यांशी तसेच परदेशातून आलेल्यांशी सौदार्याने वागणं खूप गरजेचं आहे. कारण हा माझा समाज आहे, आज व्यक्तीगत विचार करायचाय पण, स्वार्थीपणा नाही!
४]. विभागवार रचनेमुळे गर्दी न करता भाजीपाला विक्री आणि खरेदी करणं सुटसुटीत होईल...त्यासाठी पालिकेच्या मोकळ्या स्वच्छ जागा, पार्क्स, मैदान यांचा वापर व्हावा. जेणेकरून अंतर राखण सोईच होईल आणि या व्यवसायावर पोट भरणाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षा आणि सोयीचा प्रश्न काही प्रमाणात सोडवला जाईल...स्वछता राखली जाईल... याची आखणी स्थानिक नागरिकाना विश्वासात घेऊन करणं सोपं होईल.
कारण आरोग्य फक्त मॅगी, बिस्कीट आणि मसाला भात च खाऊन नाही तर, पौष्टिक आहाराने राखलं जाणार आहे.
५].
१. गावपातळीवर शेतमजूर आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांच्या उत्पन्नाची हमी, आरोग्य सेवा सुविधा याची विशेष काळजी घ्यायला हवीय.
अन्यथा पुढच्या काळात त्याचा धान्य आणि भाजीपाला पुरवठा यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
२. शेतमालाची वाहतूक विनासायास चालू राहणं यासाठी स्थानिक गटवार पध्दतीने नियोजन केल्यास अनावश्यक वाहतूक आणि खोळंबा टाळता येईल. त्यासाठी इंधन पुरवठ्याची हमी दयायला हवी.
३. शेती काम करतानाही वैयक्तीक अंतर आणि स्वच्छता पाळली जाईल यासाठी जाणीव करून दिली पाहिजे आणि त्यासाठी स्वस्त अत्यन्त माफक दरातच आणि सुरळीतपणे साबण, सॅनिटायझर, औषध, आरोग्य सेवा नीट चालू ठेवल्या पाहिजेत.
४. ग्रामीण रुग्णालयात या रोगासंबंधित उपाययोजना किंवा प्राथमिक उपचार सोई, टेस्ट किट्स पुरवल्या गेल्या पाहिजेत..तिथेही सक्षमीकरण आवश्यक आहे.
५. तिथे खासकरून या काळात वित्त पुरवठा पारदर्शक राहील याची खात्री हवी.
६. पाळीव जनावरांच्या चारा, दवाखाने या संबंधी योग्य सूचना आणि साधन स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन पुरवल्या पाहिजेत.
७. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोज परिस्थितीनुसार सरकारी नियम बदलू देत पण, गावात विभागानुसार ते वेळेत आणि पारदर्शक रित्या पोहोचायला हवेत.
तर निश्चितच गावपातळीवर सुद्धा आरोग्य सांभाळणं सोपं होईल. इथे ही जागतिक महामारी आहे, तिथे ‘कोरोना फक्त श्रीमंतांनाच शहरात होतो’, अस म्हणून चालणार नाहीय. जागृती अत्यंत आवश्यक आहे.
६].
१. भाडे तत्वावर राहणाऱ्या नागरिकांची विभागवार माहिती असणे आवश्यक आहे. भाडेकरूंना घरमालकानी या कठीण काळात सहकार्य केलं पाहिजे.
२. किंबहुना भाडेकरूंची ( हॉस्टेल विद्यार्थी, कंपनी कंत्राटी कामगार) आणि हातावर पोट असल्याने ( हॉटेल मधले सेवक, स्वयंपाकी, मोलकरीण, ऑफिस मधले तात्पुरते सेवक इ.) करार पध्दतीने राहत असणाऱ्यांची जाणीव लगेच न आल्यामुळे बंदी दरम्यान प्रवास करणाऱ्या लोकांची लक्षणीय संख्या आहे...
३. बंदी दरम्यान ते उपाशी राहणार नाहीत, किंबहुना गरजेच्या वस्तू विकत घ्यायला त्यांना अंतर राखून आणि नियम पाळत खरेदीसाठी मुभा देणं आवश्यक आहे...हे चर्चा केल्यावरच पोलिसांना समजू शकेल.
७].
१.रोज सेवेवर येणाऱ्या पोलीस, सफाई कर्मचारी, पत्रकार, बँक कर्मचारी, डिलिव्हरी कर्मचारी फक्त यांनाच स्थानिक विभागातील हॉटेल तसेच नागरिकांच्या मदतीने स्वच्छ खाणं, चहा आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करता येईल.
२. त्यांना सुद्धा आवश्यक ती आरोग्य विषयक संसाधन पुरवली पाहिजेत आणि त्यांचे सुद्धा नियमित आरोग्य तपासणी झाली पाहिजे.( सॅनिटायझर, मास्क, ग्लोव्हज इ.)
३. पोलिसांनी temperament राखून चर्चा आणि कौशल्याने प्रशासनाला हातभार लावायला हवा, त्यांनी स्वतःहून विभागवार नागरिकांशी चर्चा करायला हवी, दंडुक्यांची सरसकट ठोकशाही न करता टाइमपास करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी त्यांना सजग नागरिकांचीच मदत होईल, आणि या निमित्ताने पोलीस प्रशासनावर कायमस्वरूपी नागरीक विश्वास ठेवतील,.. ना की फक्त गरजेच्या वेळी!...तुमचेही प्रशासन आणि आरोग्य महत्त्वाच आहे, कारण तुम्ही सुद्धा याच समाजातील नागरिकांचाच भाग आहात..तुम्ही मिळून मिसळून मोठ्या भावाच्या भूमिकेत वागलात तर, नागरीकांच्या दैनंदिन गरजा आणि प्रश्न तुम्हाला समजतील आणि नागरीकसुद्धा हा लॉक डाऊन यशस्वी करतील. अन्यथा एकतर्फी वागण्यातुन पुढे विध्वंस होईल हा धोक्याचा इशारा अनेक अनुभवी नागरिक देतच आहेत. त्यामुळे मिळून-समजून-उमजून काम करूयात.
४. असंघटित क्षेत्रातील कर्मचारी आणि सेवकांच्या पाठीशी आत्ता आणि लॉक डाऊन नंतरही उभं राहणं खूप गरजेचं आहे...
८].आता साध्या पण, दूरगामी परिणाम करतील अश्या काही सूचना:
१. घरी आहोत म्हणून संसाधनांची उधळपट्टी नको, गरजेपुरता वापर करावा.
२. मोठं मोठ्या सोसायटी, गृह रचना आणि इमारती यांमध्ये येणारे पिण्याचे पाणी, वीज, गॅस, अन्न धान्य यांचा वापर या काळात जपून आणि जाणीवपूर्वक व्हायला हवा.
३. तिथे सुद्धा माणसा माणसातल्या अंतराची जाणीव ठेवताना, कामाच्या धावपळीत निर्माण झालेली अंतर सुद्धा, आरोग्याची काळजी घेऊन पुसून टाका. शेजाऱ्यांशी आपुलकीने बोला, अडल्या नडलेल्याना मदत करायला हवी.
४. प्रशासनाच्या मदतीने अश्या मोठ्या गृह संस्थेच्या स्वच्छतेची पावलं उचलायला हवीत.
५. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था करणारी वाहन सध्या वापरा अभावी उभी आहेत, त्यांची सुद्धा ( संबंधित कर्मचारी वर्गाच्या आरोग्याची जबाबदारी घेत नियोजन पूर्वक ) निगराणी आणि स्वच्छता ठेवायला हवीय, नाहीतर लॉक-डाऊन नंतर धूळ आणि घाणीने भरलेली हीच वाहन पुन्हा आजार पसरवायला कारणीभूत ठरतील.
६. लॉक डाऊन दरम्यान पेट्रोल आणि डिझेल च्या वितरणाचे नियमन व्हायला हवे. म्हणजे जीवनावश्यक वस्तू खरेदीला बाहेर पडणारे एकएकटे नागरिक पॅनिक न होता, योग्य ते प्लॅनिंग करून, गर्दी न करता, नियम न मोडता स्वतःला जपतील आणि सामाजिक-आरोग्याची सुद्धा काळजी घेतील. आणि संसाधनांवर ताण येणार नाही. साठेबाजीला आळा बसेल आणि त्या निमित्ताने पारंपरिक ऊर्जा साधनांच्या वापरावर जबाबदारी-पूर्वक वापराची बंधन येतील…किमान या काळात तरी!
७. आता नागरीक घरात आहेत, घरातील रोजच्या वापराच्या वस्तू ( मिक्सर, वॉशिंग मशीन, फ्रीज, पंखा इ.) बिघडल्यास ते दुरूस्तीसाठी विभागवार किमान 2 ते 3 तरी रेपरिंगची दुकान चालू ठेवण्याची किंवा फोन करून घरी येऊन दुरुस्ती करुन देण्याची परवानगी हवी, नाहीतर लॉक-डाऊन पुढे थोडा वाढवायचा झाला तर, नंतर नागरीक पॅनिक होऊ शकतात.
( वस्तू विकू नका पण, दुरुस्ती रोजच्या वापरात महत्त्वाची आहे)
८. जीवनावश्यक वस्तूंप्रमाणेच विभागनिहाय इलेक्ट्रॉनिक वस्तू पुरवठ्याची काही दुकान चालू ठेवावीत, वेळ काही सांगून येत नाही ( ट्यूब लाईट, बल्ब, फ्यूज, मोबाईल रेपेरिंग, मोबाईल रिचार्ज इ. कारण, सगळीकडेच इ- पेमेंट सुविधा उपलब्ध नाही आहेत.)
९. वृत्तपत्र सेवा पुरवठा काही ठिकाणी बंद आहे. ती सुरळीत आणि आरोग्याची काळजी घेत पुन्हा चालू व्हावीत.
१०. तसेच जर लॉक डाऊन अजून पुढे वाढणार असेल तर, समाज प्रबोधन आणि मनोरंजनातुन जागरूकता व्हावी म्हणून गर्दी न करता कम्युनिटी रेडिओ तसेच पॉडकास्ट यांना शासनाकडून परवानगी मिळायला हवी जेणेकरून काही करू पाहणाऱ्या तरुण वर्गाला एक माध्यम मिळेल. ( तसेही कम्युनिटी रेडिओ ला 5 पेक्षा खूपच कमी कर्मचाऱ्यांमार्फत चालवता येतो.)
११. याच लॉक-डाऊन च्या काळात मेडिकल Emergency ची वेळ आलीच तर, काही ठिकाणी ( विशेषतः दुर्गम, दूरवरच्या ठिकाणी किमान गरजेला, कारण सगळयांकडे चारचाकी वाहन आहेतच अस नाहीय) सामान्य नागरिकांना ऑटोरिक्षा किंवा अजून कुठल्या तरी सेवेची उपलब्धी करून देण्यासाठी प्रयत्न हवेत.
९]. नियम कदाचित परिस्थितीनुसार रोज बदलावे लागतील पण, ते बदल स्थानिक प्रशासनाकडून नियमितपणे फिरती announcement तसेच, पत्रक यानुसार गाव, तालुका, शहर पातळीवर पारदर्शकपणे पोहोचायला हवीत.
धन्यवाद.
जय महाराष्ट्र!🚩