26/12/2024
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन...
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (२६ डिसेंबर) निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते.
जन्म : २६ सप्टेंबर १९३२
- मे २००४ ते मे २०१४ या काळात भारताचे पंतप्रधान
- १९८२ ते १९८५ या काळात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर
- १९९१ भारताचे अर्थमंत्री
08/12/2024
पीएमपीएमएलचा (पुणे महानगर परिवहन महामंडळ) तोटा ७५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. कर्मचार्यांच्या कायमस्वरूपी सेवेमुळे वेतनाचा खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या आर्थिक अडचणींवर तोडगा काढण्यासाठी तिकीट दर वाढवण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन असल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारे तिकीट दर वाढल्यास सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे.
पीएमपीला पुणे शहरची जीवनवाहिनी मानली जाते. मागील अनेक वर्षांपासून शहर व परिसरातील प्रवाशांना पीएमपी सेवा पुरवत आहे. पीएमटी (Pune PMT) आणि पीसीएमटी (PCMC MT) या दोन वाहतूक व्यवस्थांच्या विलीनीकरणातून पीएमपीएमएलची स्थापना झाली. यानंतर सेवा केवळ पुणे आणि पिंपरी-चिंचवडपुरती मर्यादित न राहता जिल्ह्यातील महत्त्वाच्या गावांपर्यंत पोहोचली. मात्र, वाढत्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी होत असल्याने पीएमपीएमएलचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. चालू आर्थिक वर्षात हा तोटा ७५० कोटी रुपयांवर गेला आहे.
तोट्यासोबतच खर्चही वाढत आहे. सातवा वेतन आयोग लागू झाल्याने आणि मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीत घेतल्याने वेतनाचा भार वाढला आहे. याशिवाय इंधन खर्चातील वाढही हा तोटा अधिक गंभीर करत आहे. मागील आठ वर्षांपासून तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. तसेच उत्पन्न वाढवण्याचे पर्यायही मर्यादित आहेत. परिणामी, पीएमपीएमएलची आर्थिक तूट पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांना ६०:४० च्या प्रमाणात भरून काढावी लागत आहे.
महानगरपालिकांवरील हा आर्थिक भार सतत वाढत असून पीएमआरडीए हद्दीतही सेवा पुरवित असल्याने राज्य शासनाने पीएमआरडीएला तूट भरून देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, पीएमआरडीएकडून केवळ एकदाच १८७ कोटी रुपये पीएमपीएमएलला देण्यात आले आहेत. त्यानंतर निधी न मिळाल्याने पीएमपीएमएलची स्थिती अधिकच बिकट होत आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाने तिकीट दर वाढवण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
04/12/2024
हिंजवडी (०४ डिसेंबर) : जिममध्ये व्यायाम करत असताना पैलवान विक्रम पारखी याला ह्रदयविकाराचा झटका आला. त्याला तातडीने बिर्ला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. या घटनेमुळे कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
पैलवान विक्रम पारखी याने कुमार महाराष्ट्र केसरी हा किताब पटकवला होता. तो मुळचा मुळशी तालुक्यातील माण गावचा राहणारा होता. २८ नोव्हेंबरला वारजे येथे आयोजित महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेमध्ये त्याने कुमार कुस्ती स्पर्धेत मानाची गदा पटकावली होती. झारखंड राज्याच्या रांची येथील कुस्तीस्पर्धेत त्याला ब्राँझ पदक मिळाले होते. त्याचा गुरु-शिष्य संबंध हिंदकेसरी अमोल बुचडे यांच्याशी होता. अनेक कुस्ती स्पर्धांमध्ये पदके मिळवली आणि एक आदर्श व गुणी खेळाडू म्हणून त्याची ख्याती होती.
दुर्दैवाने विक्रमचे १२ डिसेंबरला लग्न होणार होते. परंतु त्याआधीच या दुर्दैवी घटनेची माहिती कुटुंबाला मिळाली. पारखी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.विक्रम पारखी यांच्या मागे वडील माजी सैनिक शिवाजीराव पारखी, एक मोठा भाऊ आणि एक बहिण असा परिवार आहे.
04/12/2024
देवेंद्र फडणवीसच होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, विधीमंडळ गटनेता म्हणून एकमताने निवड
भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांचं नाव विधीमंडळ गटनेता म्हणून निश्चित झालं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे निश्चित झाले आहे.
५ डिसेंबरला ५.३० ला शपथविधी पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी एकमताने फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाली.
देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून ते महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे.