06/07/2026
नांएसोच्या आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार : आ. अमरनाथ राजूरकर
पीपल्स कॉलेज मध्ये आ. राजुरकर यांचा सत्कार
नांदेड.
स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीला राज्य शासनाने आर्थिक सहाय्य करावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विनंती करणार असल्याची ग्वाही विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार अमरनाथ राजूरकर यांनी सोमवारी दिली. पीपल्स कॉलेजच्या विकासासाठी आमदार निधीतून दहा लाख रुपयांची मदत जाहीर करतानाच, सोसायटीला दरवर्षीही आर्थिक सहाय्य करण्याची घोषणाही त्यांनी केली.
पीपल्स कॉलेजचे माजी विद्यार्थी असलेल्या आ. अमरनाथ राजूरकर यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन नरहर कुरुंदकर सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील होते. मंचावर संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. प्रफुल्ल अग्रवाल, सचिव प्रा. श्यामल पत्की-कुरुंदकर, सहसचिव ॲड. प्रदीप नागापुरकर, अल्युमनी असोसिएशनचे सचिव डॉ. बालाजी कोंपलवार, प्रवीण साले, प्राचार्य डॉ. विकास सुकाळे, आदी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना आ. राजूरकर म्हणाले, "स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीचा इतिहास गौरवशाली आहे. पीपल्स कॉलेजमध्ये माझे शिक्षण झाले. ज्या संस्थेने मला घडवले, त्याच ठिकाणी होत असलेला हा सत्कार माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे."
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला राज्य शासनाने आर्थिक मदत दिल्याप्रमाणेच नांदेड एज्युकेशन सोसायटीलाही सहाय्य मिळावे, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेच्या सचिव प्रा. श्यामल पत्की-कुरुंदकर यांनी मराठवाड्यातील शिक्षणाच्या उभारणीत नांदेड एज्युकेशन सोसायटी आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या योगदानाचा आढावा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीला ५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केल्याप्रमाणे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या संस्थेलाही शासनाने आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी त्यांनी केली.
अध्यक्षीय समारोपात सीए डॉ. प्रवीण पाटील यांनी नांदेड एज्युकेशन सोसायटी आणि शारदा भवन शिक्षण संस्थेने तत्त्वनिष्ठ परंपरा जपल्याचे सांगितले. स्वामी रामानंद तीर्थ यांनी घालून दिलेल्या मूल्यांशी तडजोड न करता संस्था पुढेही कार्यरत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. विकास सुकाळे यांनी केले. सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. विशाल पतंगे यांनी, तर आभार प्रदर्शन डॉ. बालाजी कोंपलवार यांनी केले. कार्यक्रमास ॲड. चिरंजीलाल दागडीया, दीपनाथ पत्की, कु. शांभवी साले, माजी प्राचार्य आत्माराम पळनीटकर, नवज्योतसिंग जहागीरदार यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.