26/07/2025
जितूचे बाबा आणि त्यांचे मित्र मोठी नाव घेऊन मासे पकडायला समुद्रात दूरवर जात असत आणि दोन दिवसांनी परत येत असत. ते आले, की जितूला त्यांच्याबरोबर खूप काम करावे लागत असे. त्यांनी आणलेले मासे जाळ्यातून बाहेर काढणे, टोपलीत भरणे, मोजणे आणि मग मासे विकायला आईबरोबर बाजारात जाणे. बाबांबरोबर काम करायला, आईबरोबर बाजारात जायला जितूला खूप आवडायचे. जितू पटापट मासे मोजायचा, तेव्हा बाबा अंगणात बसून जितूकडे कौतुकाने पाहात राहायचे.
आज मात्र जितूला काम नव्हते. त्याने आणि त्याच्या मित्रांनी समुद्रावरच सगळा दिवस घालवायचा, खूप मजा करायची असे ठरवले होते. जितूच्या आईने शिदोरी तयार करून दिली. जितू आपली शिदोरी घेऊन समुद्रावर आला तेव्हा सकाळची वेळ होती. गार गार वारा अंगाला लागत होता. जितू अगदी आनंदात होता. अजून कोणी मित्र आले नव्हते. तो समुद्राच्या लाटांकडे अन् त्यांच्या फेसाकडे पाहत होता. कितीही दूरवर पाहिले, तरी समुद्र आपला आहेच आहे. पाणीच पाणी ! अगदी क्षितिजापर्यंत !
जितू वाळूत बसला. बसल्या ठिकाणीच पिशवीतील एकेक शंख आपल्या भोवताली वाळूत तो मांडू लागला. छोटे-मोठे, लाल, काळे, टोकदार, रंगीत असे खूप शंख जितूकडे होते. वेगवेगळे आणि रंगीबेरंगी शिंपलेसुद्धा जितूचा हा खजिना त्याचा अगदी जीव की प्राण होता. सुंदर सुंदर शंखशिंपले गोळा करणे हा जितूचा छंदच जरा वेळ मिळाला, की तो लगेच समुद्रावर जायचा आणि वाळूतले शंखशिंपले गोळा करायचा. त्याच्या सगळ्या मित्रांपेक्षा त्याच्याकडे जास्त शंखशिंपले होते.
हळूहळू त्याचे सगळे मित्र आले. मन्नूही आला होता आणि मग गप्पागोष्टींना खूपच रंगत चढली. वाळूचे किल्ले करता करता किती वेळ गेला ते त्यांना कळलेसुद्धा नाही. अचानक सगळ्यांनी भोंग्याचा आवाज ऐकला. ती वादळाची सूचना होती. जितूचे बाबा आपल्या साथीदारांबरोबर मासे पकडायला गेलेले होते. त्यांना जाऊन तासभर होऊन गेला होता. आता काय करावे ? त्यांना परत कसे बोलवावे ? सगळ्या बायका, म्हातारे लोक किनाऱ्यावर जमले. सर्वजण काळजीत पडले. सगळे लोक ओरडून ओरडून समुद्रावर गेलेल्या कोळ्यांना हातवारे करून बोलावू लागले.
'वादळात आपले बाबा सापडणार' या भीतीने जितू बेचैन झाला. काय करावे हे त्याला सुचेना. 'कोणता तरी धोक्याचा लाल बावटा त्यांना दिसायला हवा, म्हणजे ते नावा परत फिरवतील', असा विचार त्याच्या मनात आला. त्याला एक कल्पना सुचली. तो धावत धावत घरी गेला. आईची लाल साडी घेऊन पळत आला. किनाऱ्यावरच्या छोट्या डोंगीत त्याने उडी मारली. डोंगीवरच्या लांब बांबूला ती साडी बांधली. तो बांबू उंच उभा केला. मन्नूनेही डोंगीत उडी मारली आणि ती डोंगी समुद्रात लोटली. वल्हे जोरजोराने मारत ते समुद्रात निघाले.
समुद्रात दूरवर गेलेल्या नावांवरच्या कोळ्यांनी जितूच्या डोंगीवरचा हा धोक्याचा इशारा पाहिला आणि नावा परत फिरवल्या. जितू आणि मन्नूनेही आपली डोंगी किनाऱ्याच्या दिशेने परत फिरवली. आता वारा खूपच वेगाने वाहू लागला होता. समुद्राच्या लाटा अधिकच वेगाने येऊ लागल्या. समुद्र खवळला होता. त्या मोठमोठ्या लाटांमधून डोंगी वल्हवणे कठीण जात होते. मन्नूचे आणि जितूचे हात दुखून आले. शेवटी ते कसेबसे किनाऱ्यावर पोचले, तेव्हा लोकांनी पुढे येऊन त्यांची डोंगी नांगराला बांधली.
जितू या श्रमाने अर्धवट बेशुद्ध झाला होता. जितू शुद्धीवर आला, तेव्हा त्याचे बाबा त्याला प्रेमाने कुरवाळून डोळ्यांत पाणी आणून म्हणाले, "शाबास माझ्या पुता !”
16/06/2025
17/05/2025
15/10/2024
29/09/2024
15/08/2024
28/06/2024
13/03/2024
26/01/2024
04/10/2023