02/03/2026
असं म्हणतात, जग बदललं आहे…
पण मिरचीने तिखटपणा सोडला नाही,
आंबा गोडवा विसरला नाही,
झाडांनी हिरवाईची शाल काढली नाही,
सूर्याने रोज उगवणं थांबवलं नाही
चंद्र अजूनही शांत प्रकाश देतो,
तारे अजूनही नभात लुकलुकतात,
पाऊस बरसणे विसरला नाही,
वाऱ्याने आपला गारवा सोडला नाही
समुद्राची अथांगता तशीच आहे,
नद्यांचा प्रवाह अखंड वाहतो,
फुलांचा सुगंध आजही दरवळत राहतो,
मातीचा गंध मन भरून टाकतो
ऋतू अजूनही वेळेवर येतात,
डोंगर अजूनही ताठ उभे राहतात,
पाखरं मुक्त आकाशात झेप घेतात,
आकाश अजूनही स्वप्नांना कवेत घेतं
मग बदललं तरी काय?
बदलले आहेत मानवी विचार,
हरवल्या आहेत मानवाच्या संवेदना.
शब्द गोड झाले, पण मनं कडू झाली,
नाती जवळ आली, पण मने दूर झाली
मोबाईलने हातात जग आणलं,
पण घरातला माणूस दूर गेला.
ज्ञान वाढलं पुस्तकांत आणि स्क्रीनवर,
पण शहाणपण मनातून निघून गेलं
संपत्ती वाढली,
उंच इमारती उभ्या राहिल्या,
पण समाधानाची झोप हरवली.
गाड्यांचा वेग वाढला रस्त्यावर,
पण विचार करण्याची सवय थांबली
खरंतर, जग बदललं नाही,
निसर्ग आजही पूर्वीसारखाच आहे.
बदलला आहे माणूस,
माणसाची प्राथमिकता, त्याचा स्वार्थ,
आणि नकळत, माणसाची माणुसकी
जग बदललं असं म्हणण्याआधी,
आरशात एकदा स्वतःकडे पाहूया.
कारण जग बदललं नाही,
बदलले आहेत, आपले विचार…
.... प्रदीप शेलार
26/01/2026
मराठीची लिपी मोडीवरून देवनागरीवर कशी आली?
====-
आधी मराठी भाषा मुख्यत: मोडी लिपीमधून लिहित असत. त्यानंतर मराठीसाठी देवनागरी किंवा नागरी लिपी घेतली गेली. आपण मराठी ज्या लिपीत लिहितो ती देवनागरी लिपी. मराठी भाषेचा मोडी लिपीकडून देवनागरी लिपीकडे झालेला प्रवास हा सामाजिक, तांत्रिक आणि राजकीय परिवर्तनाचा परिणाम होता. हा प्रवास खालील मुद्द्यांच्या आधारे समजून घेता येईल.
मोडी लिपीचा प्रशासकीय वारसा
मराठी भाषेच्या इतिहासात यादव काळापासून ते मराठा साम्राज्याच्या अखेरपर्यंत मोडी हीच मुख्य लिपी होती. मोडी म्हणजे मुरड घातलेली लिपी. ही लिपी प्रामुख्याने प्रशासकीय कामासाठी वापरली जात असे. तिचा सर्वात मोठा फायदा म्हणजे लेखनाचा वेग. हात न उचलून लिहिता येत असल्याने सरकारी दप्तरं, हिशोब, आणि राजनैतिक पत्रव्यवहार मोडीमध्येच असायचे. त्याच काळात देवनागरीचा वापर मर्यादित होता; ती प्रामुख्याने धार्मिक ग्रंथ आणि संस्कृत साहित्यासाठी वापरली जाई, म्हणून तिला बाळबोध (लहान मुलांनाही समजेल अशी स्पष्ट) लिपी म्हटले जात असे.
छपाई तंत्रज्ञान आणि देवनागरीचा उदय
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतात छापखान्याचे आगमन झाले आणि मोडी लिपीच्या अस्तित्वापुढील खरं आव्हान इथूनच सुरू झालं. छपाईसाठी धातूचे खिळे (टाईप) बनवावे लागत. मोडी लिपीतील अक्षरे एकमेकांत गुंफलेली आणि वळणदार असल्यामुळे तिचे खिळे बनवणे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीचे होते. याउलट, देवनागरी लिपीतील प्रत्येक अक्षर स्वतंत्र आणि सुस्पष्ट असल्याने तिची छपाई करणे सोपे आणि स्वस्त होते. विल्यम कॅरी यांनी १८०५ मध्ये मराठीचे पहिले व्याकरण देवनागरीत छापले. याप्रकारे या लिपीच्या सार्वत्रिक वापराची पायाभरणी झाली.
ब्रिटिश राजवट आणि शिक्षणाचे माध्यम
इंग्रज सरकारला प्रशासन चालवण्यासाठी एक प्रमाणित आणि सर्वांना सहज वाचता येईल अशी लिपी हवी होती. मोडी लिपीचे वाचन हे प्रत्येकाच्या हाताच्या वळणावर अवलंबून असे, त्यामुळे अनेकदा गोंधळ निर्माण होत असे. ब्रिटिशांनी शाळांमधून देवनागरी (बाळबोध) लिपीतून शिक्षण देण्यास सुरुवात केली. १८३० च्या सुमारास सरकारी कार्यालयांतून मोडी हळूहळू कमी होऊन तिची जागा देवनागरीने घेण्यास सुरुवात झाली. जरी काही काळ दोन्ही लिप्या अस्तित्वात होत्या, तरी नव्या पिढीला देवनागरी लिपी अधिक जवळची वाटू लागली.
मोडी लिपीचा अस्त आणि अधिकृत मान्यता
विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मोडी लिपी आपले अस्तित्व टिकवून होती. मात्र, १९१७ मध्ये मुंबई सरकारने प्रशासकीय कामातून मोडीचा वापर पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेतला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि पुढे १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यावर, प्रशासकीय सुसूत्रता आणि छपाईची सोय लक्षात घेऊन देवनागरी हीच मराठीची अधिकृत लिपी म्हणून स्वीकारली गेली. यामुळे मोडी लिपी केवळ ऐतिहासिक कागदपत्रे आणि जुन्या पिढीपुरती मर्यादित राहिली.
अशा प्रकारे, वेगवान लेखनाची गरज पूर्ण करणारी मोडी लिपी, छपाईच्या क्रांतीमुळे आणि आधुनिक शिक्षणाच्या प्रसारामुळे मागे पडली आणि देवनागरी ही मराठीची स्थायी लिपी बनली.
26/01/2026
आशीर्वाद की आशिर्वाद की आर्शिवाद?
दीर्घत्वाचा नियम
तत्सम शब्दांत रफार ज्या अक्षरावर आहे, त्यापूर्वीचे अक्षर (जर ते इ-कारान्त किंवा उ-कारान्त असेल तर) सामान्यतः दीर्घ लिहितात. (रफार म्हणजे येथे वा अक्षरावर र च्या ऐवजी आलेले अर्धवर्तुळाकार चिन्ह)
आशीर्वाद व वर रफार आहे म्हणून श ला असलेली वेलांटी दीर्घ (दुसरी) आहे. त्यामुळे आशीर्वाद हा शब्द बरोबर आहे. तसेच आर्शीवाद, आशिर्वाद व आर्शिवाद हे शब्द चूक आहेत. (विसर्ग संधीचा नियम पण याला लावतात. पण तो भाग नंतर घेऊ.)
==============-
वरील दीर्घत्वाच्या नियमानुसार चालणारे शब्द. यात विसर्ग-संधी सारखा प्रकार नाही.
तीर्थ = थ वर रफार आहे, म्हणून त ची वेलांटी दीर्घ
कीर्तन त वर रफार आहे, म्हणून क ची वेलांटी दीर्घ
जीर्ण ( ण वर रफार आहे, म्हणून ज ची वेलांटी दीर्घ)
सूर्य स ला असलेला उकार दीर्घ (दुसरा) आहे.
वीर्य = ( य वर रफार आहे, म्हणून वी दीर्घ
दीर्घ = ( घ वर रफार आहे, म्हणून दी दीर्घ
ऊर्ध्व = ( ध्व वर रफार आहे, म्हणून ऊ दीर्घ
शीर्ष ( ष वर रफार आहे, म्हणून श ची वेलांटी दीर्घ)
उत्तीर्ण ( ण वर रफार आहे, म्हणून ती दीर्घ)
पूर्व ( व वर रफार आहे, म्हणून प चा उकार दीर्घ)
चूर्ण ( ण वर रफार आहे, म्हणून च चा उकार दीर्घ)
मूर्ती ( त वर रफार आहे, म्हणून म चा उकार दीर्घ)
धूर्त ( त वर रफार आहे, म्हणून ध चा उकार दीर्घ)
पूर्ती ( त वर रफार आहे, म्हणून प चा उकार दीर्घ)
=============-
याच नियमानुसार इतर शब्द (दीर्घ उपान्त्य)
रफारापूर्वीचे अक्षर दीर्घ असणारी काही इतर उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत
ऊर्मी (लाट/लहर) - येथे ऊ सुरुवातीलाच दीर्घ आहे.
पूर्णिमा (पौर्णिमा) - प चा उकार दीर्घ.
कीर्ति (प्रसिद्धी) - क ची वेलांटी दीर्घ.
वीर्य (सामर्थ्य) - व ची वेलांटी दीर्घ.
शूर्पणखा (रावणाची बहीण) - श चा उकार दीर्घ.
पूर्ण (सलग/संपूर्ण) - प चा उकार दीर्घ.
धूर्जटी (शंकराचे एक नाव) - ध चा उकार दीर्घ.
==================-
आशीर्वाद हा शब्द विसर्ग संधीच्या नियमांनी सुद्धा सिद्ध करतात...
नियम - जेव्हा विसर्गाच्या मागे अ किंवा आ सोडून कोणताही स्वर असेल आणि पुढे मृदू व्यंजन (जसे की य, र, ल, व) किंवा स्वर असेल, तेव्हा विसर्गाचा र होतो.
जसे-
आशीर्वाद =
आशीः (आशीस्) = आशीर्वचन, शुभेच्छा, मंगल कामना
वाद = बोलणे, उच्चारण, कथन
आशीर्वाद = शुभेच्छांचे उच्चारण / मंगल शब्द
म्हणून- आशी: + वाद = आशीर्वाद
=============-
र् (रफार) असलेले इतर काही वरील नियमांपेक्षा वेगळे शब्द. उपसर्गाचा विसर्ग संधी आहे. याला अपवाद म्हणू नये.
पुनर्जन्म = पुन: + जन्म
अंतर्गत = अंत: + जन्म
आयुर्वेद = आयुः + वेद
=========-
दुर्जन = दु: + जन - येथे दु हा उपसर्ग असल्याने तो रफार असूनही ऱ्हस्व राहतो.
दुर्दशा = दु: + दशा - येथे दु हा उपसर्ग असल्याने तो रफार असूनही ऱ्हस्व राहतो.
चतुर्थ = चतु: + अर्थ - येथे दु हा उपसर्ग असल्याने येथे देखील तु ऱ्हस्व राहतो.
दुर्लभ = दु: + लभ = (मिळण्यास कठीण)
दुर्गम = दु: + गम (जाण्यास कठीण)
दुर्बल = दु: + बल = (शक्ती नसलेला)
दुर्वर्तन = दु: + वर्तन = (वाईट वागणूक)
दुर्लक्ष = दु: + लक्ष (लक्ष न देणे)
दुर्ग = दु: + ग = (गमन करण्यास कठीण)
दुर्मिळ = दु: + मिळ = (सहज मिळण्यास)
निर्मल = नि: + मल = (स्वच्छ)
निर्णय = नि: + नय =(निकाल)
निर्जन = नि: + जन = (माणसे नसलेले ठिकाण)
निर्धार = नि: + धार = (निश्चय)
निर्दोष = नि: +दोष = (दोष नसलेला)
निर्यात = नि: + यात = (दुसऱ्या देशात माल पाठवणे)
निर्भय = नि: + भय = (भीती नसलेला)
=======-
एक स्पष्टीकरण
चतुर्थी चतु: + अर्थी = चतुर्थी. येथे विसर्ग संधी चा नियम लागला आहे. विसर्गाच्या मागे उ आहे आणि पुढे स्वर असल्याने विसर्गाचा र् (रफार) झाला. हा तु मुळातच ऱ्हस्व असल्याने तो ऱ्हस्वच राहिला.
उर्वशी याची फोड उ: + वशी अशी होत नाही. हा शब्द उरु (Uru - महान/विशाल) + अश (व्यापणे) यापासून तयार झाला आहे. यात विसर्ग संधी नाही.
अर्जुन याची फोड अ: + जुन अशी होत नाही. अर्जुन हा मूळ धातू अर्ज् (मिळवणे/प्रकाशणे) पासून बनलेला शब्द आहे. यात संधी झालेली नाही, तो एक अखंड शब्द आहे.
मर्म याची फोड म + रम अशी होत नाही. हा शब्द मृ (मरणे) या धातूला मन् प्रत्यय लागून तयार झाला आहे.
कर्म कृ (करणे) + मन् = कर्म.
धर्म धृ (धरणे) + मन् = धर्म.
चर्म चृ (चामडे/कापणे) + मन् = चर्म.
-धनंजय आदित्य
25/01/2026
पद्धत की पध्दत
हा शब्द मराठीत दोन प्रकारे लिहीत असल्याचे दिसून येते. पद्धत आणि पध्दत . परंतु त्यांच्यात फरक आहे. (संगणकाच्या मर्यादेमुळे हलन्त/ पाय मोडलेले अक्षर समजून घ्यावे.)
पद्धत (द + ध) हा शुद्ध शब्द आहे. यामध्ये अर्धा द या व्यंजनाला ध जोडलेला असतो. हे लेखन अचूक मानले जाते.
पध्दत (ध + द) यामध्ये अर्धा ध या व्यंजनाला द जोडलेला असतो. व्याकरणदृष्ट्या हे चुकीचे आहे.
द व ध ही दन्त्य व्यंजने आहेत. आपण द आणि ध एकत्र उच्चारतो तेव्हा जिभेचा स्पर्श दातांच्या वरच्या बाजूला होतो. ध हे व्यंजन उच्चारताना जीभ दातांच्या थोडी अलीकडे स्पर्श करते. संगणकावर किंवा मोबाईलवर टाईप करताना देखील d + dh असे टाईप केल्यावर द्ध हे अक्षर तयार होते.
उत्पत्ती १- मराठीत येथे पद या नामाचा अर्थ पाय. पद या धातूचा (धातू म्हणजे क्रियापदाचे मूळ रूप. अर्थ पाऊल टाकणे, चालणे. हा शब्द पद् (पाऊल/मार्ग) + हति यापासून तयार झाला आहे. संधीच्या नियमानुसार त्याचे रूप पद्धत असे होते. यापासून तयार होणारे शब्द - पद्धत, पद्धती, पद्धतशीर
पद् + हति = पद्धत. येथे द च्या पुढे ह आल्यामुळे ह चा ध होतो आणि मागील द त्याला जोडला जाऊन द्ध तयार होतो. हति याचा अर्थ गति , जाणे किंवा मार्ग असा होतो. म्हणून पद्धत म्हणजे पावलांनी आखलेला मार्ग किंवा काम करण्याची एक विशिष्ट वाट/रीत. पद्धत म्हणजे तंत्र, शिस्त, अनुशासन आणि वैचारिक सुसूत्रता, शिस्तबद्ध मार्ग, योग्य रीतीने केलेली प्रक्रिया, परंपरागत रीत, वैज्ञानिक / तर्कसंगत प्रणाली इत्यादी
द्ध (द + ध) असलेले शब्द- शुद्ध, प्रसिद्ध, बुद्धी, युद्ध, वृद्ध, सिद्ध, बद्ध, उद्धार, तद्धित, उद्धट
उत्पत्ती २- (संस्कृत मध्ये प्रचलित.)
पद् (जाणे/पाऊल ठेवणे) + क्तिन् = पद्धति.
क्तिन हा एक प्रत्यय आहे. संस्कृतमध्ये धातूपासून भाववाचक नामे तयार करण्यासाठी क्तिन् हा प्रत्यय जोडला जातो. येथे द आणि त यांच्यामध्ये बदल होऊन द्ध हे रूप तयार होते. काही शब्दांत क् आणि न् चा लोप होतो आणि केवळ ति उरतो. आपण जे ति शेवटी असणारे शब्द वापरतो त्यातील बहुतेक शब्दांना क्तिन् प्रत्यय लागलेला असतो. पाणिनीय संस्कृत मध्ये हा प्रकार पुढीलप्रकारे बराच दिसतो.
कृ (करणे) + क्तिन् = कृति,
धृ (धरणे) + क्तिन् = धृति (धैर्य) = संयम किंवा धैर्य राखण्याचा मानसिक भाव.
मन् (विचार करणे) + क्तिन् = मति (बुद्धी) = विचार करण्याची शक्ती किंवा बुद्धी.
शक् (शक्ती) + क्तिन् = शक्ति = सामर्थ्य किंवा जोर
स्तु (स्तुती करणे) + क्तिन् = स्तुति = एखाद्याचे गुणगान करण्याचा भाव.
एखादी क्रिया करण्याचा भाव.
22/01/2026
पोलिसांची कार्यक्षमता ही त्यांच्या शुद्धलेखनावर (प्रमाणित लेखनावर) अवलंबून नसते. तसेच कामाचा मोठा व्याप मागे असतो. संख्याबळ पुरेसे नसते. कमी वेळात बऱ्याच गोष्टी पूर्ण कराव्या लागतात. या मर्यादा लक्षात घेऊनही निदान पुण्याच्या पोलिसांनी तरी मराठीच्या शुद्धीकरणाकडे (प्रमाणित करण्याकडे) शक्य तितके लक्ष द्यावे ही रास्त अपेक्षा आहे. पुण्यात मराठीचे विद्वान लोक भरपूर आहेत. त्यांच्यापैकी कोणाकडून तरी जरा तपासून घ्यावं आणि मराठीच्या संवर्धनास हातभार लावावा.
03/01/2026
ज्ञानज्योती/क्रांतिज्योती, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त (३ जानेवारी = राष्ट्रीय शिक्षक दिन) तुम्हा सर्वांना शुभेच्छा!
अस्पृश्यता निर्मूलन, शेतकरी, शेतमजूर इत्यादींसाठी सेवा, बालविवाह प्रतिबंध, विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन, सतीप्रथा रोखणे, बालहत्या प्रतिबंध गृहे, शिक्षणाचा प्रसार इत्यादी सामाजिक क्रांतींमध्ये माता सावित्रीबाई फुले यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आणि अनुकरणीय आहे.
चला! राष्ट्र उभारणीतील योगदानाबद्दल आपण माता सावित्रीबाई फुले यांचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त करूया.
==============-
ज्ञानज्योति/क्रांतिज्योति, राष्ट्रमाता सावित्री बाई फुले के जन्मदिवस (3 जनवरी= राष्ट्रीय शिक्षक दिन) पर आप सभी को बधाई एवं मंगल कामनाएं ज्ञापित करता हूँ।
अस्पृश्यता उन्मूलन, खेतिहर किसान-मजदुर वर्ग आदि की सेवाएं, बाल-विवाह प्रतिबंध, विधवा-विवाह को प्रोत्साहन, सतीप्रथा की रोकथाम, बालहत्या प्रतिबंधक गृह, शिक्षा-प्रसार आदि सामाजिक क्रांति में माता सावित्रीबाई फुले का योगदान सर्वोपरि है एवं अनुकरणीय है।
आईए! माता सावित्रीबाई फुले के राष्टनिर्माण मे योगदान लिए हार्दिक आभार एवं कृतज्ञता ज्ञापित करें।
31/12/2025
कालचक्र
चुटकीसरशी निघून जाते
पळ-घटिका-प्रहराचे अंतर
दिन-महिना -वर्षांत-युगांतर
कालचक्र हे फिरे निरंतर
काळ असे बहुमोल सर्वथा
काळ असे प्रश्नांवर उत्तर
काळच हो दुःखावर फुंकर
कालचक्र हे फिरे निरंतर
कळ चक्राची ज्याच्या हाती
ब्रह्मदेव सर्वज्ञ धुरंधर
कल्पांतीही ना स्थित्यंतर
कालचक्र हे फिरे निरंतर
त्या चक्राच्या परिघावरती
वर्ष आमचे जरी सूक्ष्मतर
नव आशांचे नव संवत्सर
कालचक्र हे फिरे निरंतर
संकल्पांचे समृध्दीचे
स्वप्न दाटले मनामनावर
असो नवे हे वर्ष शुभंकर
कालचक्र हे फिरे निरंतर
-----डाॅ. क्षमा वळसंगकर
(पादाकुलक--८|८)
22/12/2025
गावाच्या नावातला पूर मोठा असतो!
शयन= झोप, शयनयान= झोपण्याची व्यवस्था असलेले वाहन
19/12/2025
एक वाक्य वाचलं -
परिसरातील रस्ते ढगाळ आणि घाटाळ आहेत.
यातील घाटाळ शब्द विशेष भावला.
ढगाळ म्हणजे ढगांनी भरलेला. तसेच घाटाळ म्हणजे घाटांनी व्यापलेला.
'आळ' हा प्रत्यय लागून अनेक विशेषणे तयार होतात. ही विशेषणे सहसा एखाद्या गोष्टीचे प्रमाण जास्त असणे किंवा तसा गुण असणे दर्शवतात.
वाफाळ, दुधाळ, वाचाळ, दगडाळ, केसाळ, बोंडाळ इत्यादी...
तुम्हाला आठवतात काय असे काही शब्द?