14/02/2026
मराठी विभाग व शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत “ एकदिवसीय परिषद
दिनांक - १३ फेब्रुवारी २०२६
'मराठी साहित्यातील भटक्या विमुक्त जातीजमातींचे चित्रण' हे १९२० ते १९६० पर्यंत आणि १९६० नंतरच्या साठोत्तरी मराठी साहित्यात भटक्या-विमुक्त जातीजमातींचे चित्रण झालेले आहे, त्याचा शोध घ्यावायचा असल्यास या कालखंडातील कथा, कादंबरी, चरित्रे, आत्मचरित्रे व आत्मकथन या वाङ्मय प्रकारांचा आधार घ्यावा लागतो.
१९६० पर्यंतचे जे साहित्यिक आहेत. त्या साहित्यिकांमध्ये वा.म. जोशी, श्री.म. माटे, शंकरराव खरात, अण्णाभाऊ साठे, व्यंकटेश माडगूळकर व शंकर पाटील या साहित्यिकांच्या कृर्तीचा तर १९६० नंतरच्या साहित्यिकांमध्ये महादेव मोरे, चारूता सागर, रणजीत देसाई, दया पवार, लक्ष्मण माने, दादासाहेब मोरे, शंकरराव खरात, लक्ष्मण गायकवाड, गुलाब वाघमोडे,किशोर शांताबाई काळे, शिवाजी राठोड, अजित मिणेकर, रावजी राठोड, सौ. विमल मोरे, के.ओ.गिडे, आणि सौ.जनाबाई गिऱ्हे
या साहित्यिकांच्या साहित्यकृतींचा व त्यात आलेल्या भटक्या विमुक्तांच्या चित्रणांचा परामर्श घ्यावा लागतो." असे प्रतिपादन
एल. बी.एस.कॉलेज साताराचे उपप्रचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. अशोक तवर यांनी केले.
जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांच्या शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत " प्रमुख अग्रणी महाविद्यालय व मराठी विभाग यांचे संयुक्त विद्यमाने भटक्या विमुक्त समाजाचे मराठी साहित्यातील प्रतिबिंब व त्यांची स्थिती " याविषयावरील एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून डॉ. अशोक तवर बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही गिरी सर उपस्थित होते. यावेळी जेष्ठ पत्रकार व समाजसेवक विजय मांडके, प्रा.शेलार प्रा.अवघडे व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय पाचवडच्या प्राचार्य मंजुश्री बोबडे यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ.तवर सर आपल्या भाषणात पुढे म्हणाले," या चित्रणात त्यांच्या जीवनपध्दती, समजुती, रूढी, परंपरा, त्यांची सुख दुःखे, विसंगती त्यांच्यावरील अन्याय अत्याचार आणि त्यांची भाषा यांचा परिचय मराठी साहित्याला आणि वाचकांना करून दिला व येथूनच खऱ्या अर्थान वास्तववादी साहित्याची निर्मिती सुरू झाली.आधुनिक मराठी वाङ्मयाच्या पार्श्वभूमीचा विचार करता,१९२० नंतरच्या साहित्यिकांनी आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून दलित, ग्रामीण आणि भटक्या-विमुक्त जातीजमार्तीचे चित्रण केले. भटक्या विमुक्तांच्या चित्रणात कैकाडी, वडार, कंजारभाट, भामटा, रामोशी, बेरड या महत्त्वाच्या विमुक्त व भटक्या जातीजमाती साहित्यात आल्या."
त्यानंतर विजय मांडके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी ते म्हणाले, "विमुक्त व भटक्या जातीजमाती वर्षानुवर्षे गावकुसाच्या बाहेर, गावात जिथे प्रातर्विधी करतात, त्या ठिकाणी समूहासमूहाने राहत होत्या. यांचा हजारो लोकांचा समूह गाढवांच्या, घोड्यांच्या, गायी बैलांच्या पाठीवर बिन्हाडे टाकून 'आज इथं तर उद्या तिथं' असे जगत होता. अशा या भटकंती करणाऱ्या समाजाचे आधुनिक मराठी साहित्यातील साहित्यिकांना जसे त्यांचे दर्शन घडले, तसे त्यांनी साहित्यात मांडले. आणि येथूनच मराठी साहित्यात जातीजमातींचे चित्रण आले आहे परंतू हे चित्रण दुसरे तिसरे कुणी नाही तर भटक्या जमातितील लेखकांनीच केले आहे “
यानंतर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी सर यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या व त्यानीही आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळी ते म्हणाले “ श्री.म. माटे यांनी ज्या कथा लिहिल्या त्या कथांपैकी त्यांची 'कृष्णाकाठचा रामवंशी' ही कथा विमुक्त जातीतील 'रामोशी' समाजाचे चित्रण करणारी आहे. 'कृष्णाकाठचा रामवंशी' ही कथा 'उपेक्षितांचे अंतरंग' या कथासंग्रहातील असून या कथासंग्रहातील इतर कथा उपेक्षित जीवन जगणाऱ्या समाजाच्या आहेत. आपल्या कथांमधून माटे यांनी जे चित्रण केले ते वास्तव असून तत्कालीन समाजातील उपेक्षितांवर प्रकाश टाकणारे आहे. मराठी साहित्यातील 'अपेक्षितांचे अंतरंग' हा एकमेव आणि पहिला कथासंग्रह आहे की जो उपेक्षितांना, दलितांना आणि भटक्या-विमुक्तांना न्याय देणारा आहे. अशा या कथासंग्रहांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रकाश कुंभार म्हणतात, "दलित साहित्याची बीजे श्री. म. माटे यांच्या कथांमध्ये आढळतात.
दलितांच्या, शोषितांच्या आणि विमुक्त जातींच्या अनुषंगाने येणाऱ्या कथा 'उपेक्षितांचे अंतरंग' या कथासंग्रहात आलेल्या ओहत. तसेच १९६० नंतर उदयास आलेल्या दलित साहित्यिकांनीही हे मान्य केलेले आहे.”
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांचे शुभहस्ते दिपज्वलन करून परिषदेचे उदघाट्न करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांचा व सर्व कलाकारांचा शॉल व ग्रंथ भेट देवून सत्कार करण्यात आला.
समन्वयक प्रा. सुनील केमदारने यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.त्यानंतर सहसमन्वयक डॉ.राजेंद्र ननावरे यांनी प्रास्ताविक केले.मराठी विभाग प्रमुख प्रा. आनंद साठे यांनी बिजभाषण केले.प्रा.गायत्री जाधव यांनी सूत्रसंचालन केले.शेवटी पहिल्या सत्राचे आभार प्रा.डॉ. प्रमोद चव्हाण यांनी मानले.
यानंतर मराठी विभाग प्रमुख प्रा. आनंद साठे यांच्या " कर्मयोगी संत गाडगे महाराज " या एकपात्री नाट्यप्रयोगाच्या पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले.
द्वितीय सत्रात लोककलेचे उपासक सातारा जिल्ह्यातील लोककलाकार श्री.राजकुमार रामचंद्र धोत्रे ( भारूड ),शाहीर श्रीरंग रणदिवे ( पोवाडा )
प्रेरणा गवई ( लावणी नृत्य) तुकाराम मोहिते ( भविष्यवेत्ता ) मिलिंद भोसले ( बहुरूपी ) अशोक गायकवाड व विठ्ठल भिंगारदिवे ( पोतराज ) विठ्ठल महाराज काटेकर ( आराधी ) व तृप्ती मोहिते ( देवीचे गाणे ) या विविध कार्यक्रमांचे उत्कृष्ट सादरीकरण केले.या कार्यक्रमाचे निवेदन प्रा.आनंद साठे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी रविंद्र ओंबळे तृप्ती पवार, हर्षदा कराळे,साक्षी जंगम,मधुरा शेलार व वैष्णवी धनावडे या विध्यार्थ्यांनीतसेच विविध समितीचे प्राध्यापक सदस्य आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूपच परिश्रम घेतले. कार्यक्रमास ज्युनियर व सिनियर विभागाचे सर्व प्रद्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.शेवटी प्रा डॉ.संजय धोंडे यांनी आभार मानले व ही परिषद आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न झाली.