26/07/2026
1997. ओरिसाची राजधानी भुवनेश्वर. राजधानीत एक वेगळाच तणाव होता. 12वीच्या बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली होती. हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य एका रात्रीत धूळीस मिळाले होते. त्याआधी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये पेपरफुटीच्या जवळपास डजनभर घटना घडल्या होत्या ओरिसात. घरोघरी बेचैनी वाढत होती. मुलांमध्ये आत्महत्येचे सिंड्रोम वाढू लागले. पण तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या दरबारात मात्र शांतता होती. काँग्रेस सरकार, मुख्यमंत्री जे.बी. पटनायक यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने पेपरफुटीकडे असे दुर्लक्ष केले होते जणू तो त्यांचा प्रॉब्लेम नव्हताच. प्रश्नपत्रिका फुटी ही ओडिशात त्या काळात नित्याची बाब बनूनही सरकार त्यावर काही उपाययोजना करत नव्हती...
एक दिवस सकाळी सचिवालयाच्या बाहेर काहीतरी वेगळे घडायला सुरुवात झाली. हातात फलक घेतलेले तरुण-तरुणी रस्त्यावर उतरले. 'विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना माफी नाही!' अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. संख्या वाढत गेली… 500… 1000… 1500… जवळपास 2000 विद्यार्थी जमले. त्यांच्या पुढे एक तरुण होता. वय फक्त सत्तावीस-अठ्ठावीस. करडी नजर, भारदस्त आवाज आणि झोपलेल्या सरकारला खडबडून जागं करायचा निर्धार! अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा तो राष्ट्रीय सचिव गोता. त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच जिद्द चमकत होती, ती म्हणजे पटनायक यांना जागं करणे!! आंदोलन तीव्र होत गेले. विद्यार्थी सचिवालयाकडे कूच करू लागले. सरकारने रॅपिड ऍक्शन फोर्स उभी केली. एकाएकी लाठीचार्ज सुरू झाला. हवेत लाठ्यांचा आवाज, विद्यार्थ्यांच्या किंकाळ्या, धूळ, रक्त…
तो तरुण सर्वात पुढे होता. सर्वात आधी लाठी त्याच्या अंगावर कोसळली. एकदा… दोनदा… अनेकदा. तीन फ्रॅक्चर झाले. शरीरावर गंभीर जखमा झाल्या. तो जमिनीवर पडला. पण उठला. पुन्हा रस्त्यावर उभा! आंदोलनाची मशाल त्याने विझू दिली नाही. दिवसेंदिवस संघर्ष तीव्र होत गेला. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सुरू झालेला हा लढा ओरिसाच्या राजकारणात चर्चेचा विषय बनला.
त्याने जे केले, त्यामुळे त्याची ओळख एका धाडसी विद्यार्थी नेत्याची झाली. त्या घटनेने त्याच्या राजकीय वाटचालीला एक वेगळी दिशा मिळाली. तो तरुण ज्याने एकेकाळी प्रश्नपत्रिका फुटीच्या विरोधात रस्त्यावर उतरून लाठ्या खाल्ल्या, फ्रॅक्चर सहन केले आणि तरीही थांबला नाही… त्याचे नाव होते धर्मेंद्र प्रधान!!
__________