13/08/2026
पुणे : शारीरिक संबंधाचा आग्रह; विवाह ठरलेला प्रियकर देत होता गोळ्या, तरुणीचा अचानक मृत्यू, बारामती शहरात खळबळ
पुणे / बारामती: विवाह ठरलेल्या प्रियकरासोबत बाहेर गेल्यानंतर एका तरुणीचा अचानक मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना बारामती शहरात घडली आहे. या प्रकरणी संबंधित तरुणाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 106(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तरुणीच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिस तपास सुरू आहे.
संबंधित तरुणाचे नाव अथर्व राजेंद्र मेहन (वय 27, रा. बारामती) असे आहे.
तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, मृत तरुणीने बी.एससी. अॅग्रीचे शिक्षण पूर्ण केले होते आणि ऑक्टोबर 2025 पासून MPSC परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात क्लास करत होती.
नंतर तिचे अथर्वसोबत प्रेमसंबंध असल्याचे कुटुंबीयांना समजले. तरुणीने त्याच्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली होती. दोन्ही कुटुंबीयांच्या चर्चेनंतर एप्रिल 2026 मध्ये विवाहास संमती देण्यात आली होती.
मात्र, घटनेच्या 15 ते 20 दिवस आधी तरुणीच्या वागण्यात बदल जाणवत असल्याचा दावा आईने फिर्यादीत केला आहे. तिच्या एका मैत्रिणीने अथर्व तरुणीकडे शारीरिक संबंधासाठी आग्रह करत असून तिला काही गोळ्या देत असल्याचे सांगितल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. या आरोपांची सत्यता अद्याप तपासाधीन आहे.
6 ऑगस्ट रोजी अथर्व तरुणीला MBA प्रवेशाच्या कामासाठी टी.सी. कॉलेज येथे घेऊन गेला होता. दिवसभरात तरुणीचा तिच्या आईशी संपर्क होता.
फिर्यादीनुसार, एका फोन कॉलदरम्यान तरुणीने अथर्व तिला त्याच्या घरी घेऊन जाणार असून शारीरिक संबंध ठेवण्याचा आग्रह करत आहे आणि तिला गोळी देणार असल्याचे सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यावर आईने तिला त्याच्यासोबत न जाता तातडीने घरी परतण्यास सांगितले.
रात्री अथर्वने तरुणीला चक्कर आल्याचे कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर तिला विविध रुग्णालयांत नेण्यात आले. अखेर सिल्व्ह र जुबली हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या घटनेनंतर तरुणीच्या आईने तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, तिला कोणती औषधे किंवा गोळ्या देण्यात आल्या होत्या का, तसेच त्या दिवशी नेमके काय घडले, याचा पोलिसांकडून वैद्यकीय अहवाल, मोबाईल संपर्क आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.